Tuesday, 2 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जून  २०२० सायंकाळी ६.००
****

Ø औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दिवसभरात ६० रुग्णांची वाढ
Ø जालना जिल्ह्यातही आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग
Ø शेतमाल खरेदीसाठी केंद्र सरकारकडून जाहीर होणारा किमान आधारभूत दर कायद्यानं बंधनकारक असावा - काँग्रेस पक्षाची मागणी
आणि
Ø राज्यात ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित तर ३२२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द; औरंगाबाद विभागतल्या ७७ दुकानांवर कारवाई
****

 औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दिवसभरात ६० रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ६४७ झाली आहे. यामध्ये २७ महिला आणि ३३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यात सकाळी ५५ आणि दुपारी पाच नवीन रुग्णाची वाढ झाली आहे. यामध्ये वाळूज महानगर, तक्षशीलानगर, रहेमानिया कॉलनी, राजा बाजार आणि कोतवालपुरा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
 दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं उपचार घेत असलेल्या तीन जणांचा कोरोना विषाणू संसर्गामूळे मृत्यू झाला आहे. यात शहागंज मधील ५४ वर्षीय पुरुष, कैलास नगर इथला ५६ वर्षीय पुरुष तर गौतमनगर पिसादेवी रस्ता इथल्या ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 जालना जिल्ह्यात आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या  एकूण रुग्णांची संख्या आता १५३ झाली आहे.

 दरम्यान, शहरातल्या मोदीखाना भागातल्या एका ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे जालना जिल्ह्यात आता कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्यांची  संख्या दोन झाली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात आज सकाळी दोन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची  संख्या आता १५१ झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णात एक सात वर्षे वयाची मुलगी तर एका ४ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.
****

 अमरावती इथं चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २४९ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ६५० नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
****

 अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, आज या संसर्गाचे नवीन ११ रुग्ण आढळून आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 धुळे शहरातल्या मुख्य टपाल कार्यालयात मध्ये काम करणारे ३ कर्मचारी कोरोना मुक्त झाले आहे. आज त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयातन सुट देण्यात आली.
****

 गृह विलगीकरणात राहण्याचे निर्देश असतानाही एका लग्नसमारंभाला हजेरी लावणाऱ्या एका तरुणाविरुध्द जालना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणाच्या संपर्कातल्या काहींचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आला होता. त्यामुळे या तरुणाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
****

 कोरोना विषाणू टाळेबंदी दरम्यान मुंबईत अडकलेले स्थलांतरित नागरिक रेल्वे आणि एसटीच्या माध्यमातून स्वत:च्या घरी परतत आहेत. आतापर्यंत मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या श्रमिक रेल्वेद्वारे १८ लाख लोक आपापल्या राज्यात परतले आहे. त्यासाठी मुंबईतून पश्चिम रेल्वेने १ हजार २१६ श्रमिक रेल्वे सोडल्या. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ८ लाख स्थलांतरित मुंबईतून परतले असून त्यासाठी ६०३ श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. एस.टी.च्या माध्यमातून ५ लाख ३७ हजार लोकांना राज्यांच्या सीमेवर पोहोचवण्यात आलं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे  ४३ हजार एस.टी. बसेस  सोडण्यात आल्या. 
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 शेतमाल खरेदीसाठी केंद्र सरकारकडून जाहीर होणारा किमान आधारभूत दर कायद्यानं बंधनकारक असावा, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली. शेतमालाला बाजारात मिळणारा दर हा किमान आधारभूत दरापेक्षा कमी असल्याचं, काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी म्हटलं आहे. सरकारने हमीभाव जाहीर करूनही, शेतकऱ्यांना तो दर मिळत नसेल, तर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं पंतप्रधानांचं उद्दीष्ट कल्पनतेच राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.
****

 राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य वाटप करतांना अनियमितता तसंच नियमभंग करणाऱ्या ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ३२२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ९३ रास्त भाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. ते आज आपल्या विभागाच्या बैठकीत बोलत होते. कारवाई झालेल्या दुकानांमध्ये औरंगाबाद महसूल विभागातल्या ७१ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ६ दुकानांचा परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अनियमितता आढळली किंवा नियमभंग केल्यास कडक कारवाईचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ई-पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.
****

 नैऋत्य मोसमी पाऊस येत्या ६ तारखेपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली स्थिती पूर्ववत झाल्यानंतर मोसमी पावसाची पुढे वाटचाल होईल, पाच जूननंतर हा बदल अपेक्षित असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

 मुंबई आणि किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका पाहता, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एडीआरएफच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त सहा तुकड्या राखीव असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ उद्या रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरपासून दक्षिण गुजराथजवळ दमणपर्यंत पोहोचणार आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगितलं जात असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

 रायगड किनारपट्टीवरील ६० गावांमध्ये सुमारे १ लाख ७३ हजार नागरिक राहत आहेत. इथं  कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. एडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५ हजार ६६८ मच्छिमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे.
****

 विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नसल्याने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क परत करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क भरले होते अशा सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. जेणे करून ‘टाळेबंदीमध्ये या पैशाचा विद्यार्थी आणि त्यांचा कुटुंबीयाना आर्थिक हातभार मिळेल. यासंदर्भात त्वरीत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.  
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापुर उपजिल्हा रुग्णालयाला आमदार प्रशांत बंब यांनी आज फूट ऑपरेटिव्ह हॅंडवॉश आणि सॅनिटायझर यंत्र भेट दिलं आहे. या मध्ये हात धुण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही पायानं हे यंत्र वापरता येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि दवाखान्यात येणारे रुग्ण या यंत्रणेचा वापर करत आहेत. आमदार बंब यांनी असे दोन यंत्र रुग्णालयाला भेट दिले असल्याचं  नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी सांगितलं.
*****

 जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर एकाच व्यक्तीनं, तर तीन आणि चार चाकी वाहनांनी चालक, आणि दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलिस दंडात्मक कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे.
****

 औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या कोविड स्वयंसेवकांना आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज मार्गदर्शन केलं. उद्यापासून शहरातली सर्व दुकानं सुरू होणार असून या स्वयंसेवकांनी आपआपल्या गल्लीत, वार्डात नागरिकांमध्ये गर्दी न करणे, मास्क वापरण्याबाबत, वारंवार हात धुण्याबाबत आणि एकमेकातलं आंतर राखण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यास त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीककर्ज नोंदणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती. पीककर्जाच्या ऑनलाईन अर्जाची लिंक जालना डॉट एनआयसी डाट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आजपर्यंत एक लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी नोंदणी केली असून, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ६६ कोटी २० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप पूर्ण झालं आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याचं पीककर्ज वाटपाचं एकूण उद्दीष्ट १११५ कोटी रुपये इतकं आहे.
****

 नांदेड शहरात आज दुपारी ४ वाजता अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आणि अनेक तालुक्यात  आज दुपारी जोरदार पाऊस झाला
*****

No comments: