Saturday, 27 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  गृह निर्माण संस्थांनी कामगारांना प्रवेश नाकारू नये- सहकार मंत्र्यांचं आवाहन
Ø  `वंदे भारत` अभियानांतर्गत २२ हजार २५१ प्रवासी राज्यात दाखल
Ø  नांदेडच्या आमदारांना कोरोना विषाणूची लागण
 आणि
Ø  पावसाळा देशभर सक्रीय
****

 कोरोना विषाणूचा संसर्ग  टाळण्यासाठी राज्य शासनानं अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार आणि वाहनचालकांना शासनानं प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना,  कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं तसंच शासन नियमांच्या  विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत शा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी केल्या आहेत.
****

 `वंदे भारत` अभियानातून परदेशात अडकलेल्या नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याची आणि त्यांचं विलगीकरण करण्याची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. आतापर्यंत १४५ विमानांनी तब्बल २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईच्या प्रवाशांची संख्या ८०७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७ हजार ६८६ आणि इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ६ हजार ४९५ इतकी आहे. येत्या एक जुलै पर्यंत आणखी २६ विमानांनी प्रवासी मुंबईत येणं अपेक्षित असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे.
****

 कोरोना विषाणूच्या संकटकालीन परिस्थीतीमधे कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे धैर्य मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उद्योग आणि खाजगी देणगीदारांकडून ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचं गरजुंना वाटप करण्यात आलं असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या मदत साहित्यात सुमारे ८ लाख विशेष मास्क, कृत्रीम श्वासोच्छवास देणारी ६ यंत्र, ८५ हजार वैयक्तिक संरक्षण संच, २ लाख २५ हजार एन ९५ मास्क, ३८ हजार लिटर निर्जंतुकीकरण आदी साहित्याचा यात समावेश आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात आज कोरना  बाधित  आठ नवे रुग्ण आढळले. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातल्या भोसी इथल्या २२ वर्षीय गरोदर महिलेसह कळमनुरी तालुक्यातल्या  सात जणांचा  समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २५९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाले असून २२९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
****

 ांदेड इथल्या काँग्रेसच्या एका आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आज सकाळी ही बाब स्पष्ट झाली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हवाल्यानं पीटीआयनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून बरे झाल्यानंतर काही दिवसांतच या आमदारांना लागण झाली आहे. प्रादूर्भाव झालेल्या आमदारांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून चव्हाण यांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाल्याचं या वृत्तात सूचित करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ३४९ झाली आहे. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सोळा आहे. नांदेड जिल्ह्यातील २७५ रुग्ण बरे झाले असून ६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 ठाणे इथल्या भाजपच्या एका नगरसेवकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. या चाळीस वर्षीय नगरसेवकाला याची लागण झाल्याचं दोन दिवसांपुर्वी कळालं असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, पेठ, देवळा आणि कळवण तालुक्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५५४ रुग्णांना लागण झाली आहे. यापैकी १ हजार ९११ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून, १ ह्जार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण  २१३ जण या विषाणुमुळे मरण पावले असल्याचं पवार यांनी सांगितलं.
*****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या भारतीय हद्दीतील आक्रमणाचा जाहीर निषेध करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. सरकारनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मुद्दा सोडवण्यासाठी त्वरित आणि कडक कृती करावी, असं पक्षानं आज म्हटलं आहे. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर देशवासीयांना संबोधित करावं आणि भारतीय भूभाग बळकवणाऱ्या कोणालाही हुसकावून लावण्यात येईल असा विश्र्वास द्यावा, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
****

 चीनच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसदरम्यान सुरू आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्र्वभूमीवर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. या बरोबरच १९६२च्या युद्धानंतर चीननं भारताचा ४५ हजार चौरस किलोमीटर भूभाग बळकवल्याचा विसर पडता कामा नये, असं त्यांनी सातारा इथं पत्रकार परिषदेत या संदर्भातील एका प्रश्र्नाच्या उत्तरात नमुद केलं. लडाखमधील गलवान खोऱ्यात गस्त घालताना भारतीय सैनिक सतर्क होते, चीननं चिथावणी दिल्यानं तिथल्या घटनेला लगेचच संरक्षण मंत्र्यांचं अपयश ठरवता येणार नाही, असं पवार यांनी यावेळी नमुद केलं.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ६६ वा भाग आहे.
****

 मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी युसूफ मेमन याच्या मृतदेहाचं आज धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. त्याचा मृतदेह काल रात्री धुळ्यात आणण्यात आला होता. रुग्णालयात या पार्श्र्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त होता. मेमनचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. तो ५८ वर्षांचा होता. मुंबई साखळी बाँबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी टायगर मेमन याचा युसूफ भाऊ होता.
****

 रायगड जिल्ह्यात चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पाहणी केली. मुरूड तालुक्यातल्या नांदगाव इथं त्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना पत्र्याचं वाटप करण्यात आलं. खासदार सुनील तटकरे, खासदार  अमोल कोल्हे, पालकमंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होते.
****

 धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा शहरात चीनी उत्पादनांच्या विक्रीवर बंदीचा ठराव सर्व साधारण सभेत एक मतानं मंजूर करण्यात आला आहे. या सामानावर बंदी घालणारी दोंडाईचा ही पहिलीच नगर परिषद आहे. दोंडाईचा प्रमाणेच अन्य नगरपालिकांनी असा ठराव मंजूर करावा, असं आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केलं आहे.
****

 सोलापूर इथं युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनाचं ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज्यात अनुसूचित जातींतील घटकांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलन प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****

 या मोसमातील पाऊस देशाच्या सर्व भागात पोचल्याचं  भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पावसाळा साधारणपणे ८ जुलैला देशात सर्वत्र पोचतो. यंदा मात्र पावसाळा १२ दिवस आधीच देशात सर्वत्र दाखल झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पाऊस या पुर्वी २०१३ मधे वेळेआधी म्हणजे १६ जूनला देशात सर्वत्र पोचला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो पुढं वायव्य तसंच मध्याकडे सरकल्यानं सर्वत्र पावसाचं आगमन झाल्याचंही भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस झाला.
****

बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होत असून संग्रामपूर तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला   असून   जनजिवन  विस्कळेत झाल्याचं आमच्यावार्ताहरानं कळवलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्यावतीनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी यावेळी केली.
****

 अकोला ते पूर्णा या २१० किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम वेगानं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोला ते शिवनी शिवापुर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होऊन या मार्गावर डिझेल ऐवजी विजेवर चालणारे रेल्वे इंजिन लवकरच धावण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
*****

No comments: