Thursday, 25 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.06.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 June 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जून २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरातल्या सर्व नागरी तसंच बहु राज्य सहकारी बँका भारतीय रिजर्व्ह बँकेच्या अधिन आणण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिशु कर्जाच्या व्याजदरातही दोन टक्के सूट देण्याचा निर्णय

·      भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाला प्रलंबित परीक्षा जुलैमध्ये घेण्यास परवानगी नाही- राज्य सरकार

·      राज्यात आणखी तीन हजार २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात २४८ रुग्णांचा मृत्यू

·      औरंगाबाद जिल्ह्यात १२ बाधितांचा मृत्यू तर दोनशे नवे रुग्ण

·      जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोलीतही रुग्णांच्या संख्येत वाढ

आणि

·      राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त

****

केंद्रीय मंत्रीमंडळानं काल बँकिंग, अंतराळ आणि पशुपालन क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 

देशभरातल्या सर्व नागरी तसंच बहु राज्य - मल्टी स्टेट सहकारी बँका भारतीय रिजर्व्ह बँकेच्या अधिन आणण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल. देशभरातल्या दीड हजारावर सहकारी बँकांमध्ये साडेआठ कोटींहून अधिक खातेदार असून, सुमारे चार लाख ८४ हजार कोटीं रूपयांपर्यंत या खात्यांची उलाढाल आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खातेदारांचा विश्वास वाढेल आणि त्यांचे पैसे सुरक्षित राहतील असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिशु कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला. ५० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा या श्रेणीत अंतर्भाव होतो. एक जून २०२० ते ३१ मे २०२१ दरम्यान ही सूट लागू असेल. इतर मागासवर्गीय आयोगाला ३१ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ, पधुधन विकासासाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद, आदी निर्णयांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

अंतराळ क्षेत्रात खासगी भागीदारी वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय अणु ऊर्जा मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. अंतराळ तंत्रज्ञानाचा सामाजिक तसंच आर्थिक विकासासाठी योग्य वापर करण्यासाठी राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकार केंद्र - इन स्पेसची स्थापना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला.

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बुद्ध सर्कीट जोडण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी हा निर्णय घेण्यात आला.       

****

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं २०२० -२१ या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - एन सी ई आर टी करता एक कार्य प्रणाली तयार केली आहे. याअंतर्गत मंत्रालयानं यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांसाठी आणि पुढच्या वर्षी मार्चपासून बारावीच्या वर्गासाठी प्रत्येक विषय शिकवण्याकरता इन्फोग्राफिक्स, पोस्टर आणि सादरीकरण तयार करण्यास सांगितलं आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना, आणि जून २०२१ पर्यंत सहावी ते बारावीच्या वर्गांसाठी शिक्षकांकरता ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत. 

****

राज्यात कोविड-19 मुळे होणारा संसर्ग टाळण्याकरता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना आणि नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधीसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय कृतिदलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतुकीशी संबंधित बाबींमुळे होणारा परिणाम, वाहतूक व्यवस्थेत येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून उपाय योजना करणं आणि परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

****

सध्याच्या कोविड-19 स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा - आयसीएसई मंडळाला राज्यात दहावी -बारावीच्या प्रलंबित परीक्षा जुलैमध्ये घेण्यास परवानगी देता येणार नाही, असं राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. या महामारीमुळे राज्यानं स्वतःच्या विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षादेखील न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी सांगितलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारच्यावतीनं न्यायालयाला ही माहिती दिली. मंडळानं २ ते १२ जुलैदरम्यान, प्रलंबित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या एका नागरिकानं मंडळाच्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं.

****

देशात कोविडग्रस्तांचं बरं होण्याचं प्रमाण छपन्न दशांश सात टक्के इतकं झालं असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या चार लाख छपन्न हजार एकशे त्र्याऐंशी झाली असून, चौदा हजार चारशे शहात्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी रुग्ण बरे झाले असून सध्या एक लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

राज्यात काल आणखी तीन हजार २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ३९ हजार १० इतकी झाली आहे. काल या आजारानं २४८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत सहा हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६९ हजार ६३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चेलिपुरा पोलिस स्टेशन परिसर, चिकलठाणा, जुना मोंढा, बारी कॉलनी, उस्मानपुरा, अजब नगर, बारुदनगरनाला, जयसिंगपुरा, सिल्ल मिल कॉलनी आणि गंगापूर तालुक्यातल्या गज गावातल्या रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गामुळे २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं चार हजाराचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात आणखी २०० रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या चार हजार ३६ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातले ११२ तर ग्रामीण भागातले ८८ रुग्ण आहेत.  ग्रामीण भागात बजाज नगर मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ३३, गंगापूर इथं १२, पैठण सहा, सिल्लोड आणि वैजापूर इथं प्रत्येकी पाच, मांडकी चार, हिवरा दोन, पळशी, कन्नड इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. काल ८१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २१७ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जालना जिल्ह्यात काल आणखी १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण वाढले. यामध्ये जालना शहरातले अकरा, भोकरदन आणि गोंदी इथं प्रत्येकी दोन, तर राज्य राखीव पोलिस दलातल्या एका जवानाचा समावेश आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४०० झाली आहे. त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला असून, २७७ रुग्ण बरे झाले आहेत.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं उपचार घेत असलेल्या एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल बाधित असा आला. 

दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या एका डॉक्टरचा समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २४९ झाली आहे. लातूर जिल्ह्यात सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या तीनशे सव्वीस झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ रुणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून, २४८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. भूम तालुक्यातले तीन, तर उस्मानाबाद आणि निलंगा तालुक्यातला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १९१ झाली आहे. त्यापैकी १४० जण बरे झाले असून, आठ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं शंभरचा आकडा पार केला. काल आणखी चार रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १०२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नव्वद रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात सध्या नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महसूल प्रशासनानं काल रात्री १२ वाजेपासून ते २७ जून शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका हद्द आणि पाच किलोमीटरच्या परिसरात ही संचारबंदी लागू असेल, असं जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जाहीर केलं आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांनाच मुभा राहील.

****

हिंगोली जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. हे तिघेही अंधारवाडी इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २५१ झाली आहे. काल तीन रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत २२९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

पुणे जिल्ह्यात काल ८२० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात १२४, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३२१, जळगाव जिल्ह्यात काल १७० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. रायगड - १४२, धुळे ८१, अहमदनगर जिल्ह्यात २४, नंदुरबार १८, सांगली १६, सातारा १४, सिंधुदुर्ग आठ, तर बुलडाणा जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.

****

कोविडग्रस्तांचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब असून, कोविड प्रतिबंधाबाबत मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याची टीका विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल सोलापूर इथं कोविडग्रस्तांवर उपचार आणि अन्य स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळाव्यतिरिक्त अन्य लोकप्रतिनिधींना कोविड प्रतिबंधाच्या युद्धात विचारात घेतलं जात नसल्याचं, फडणवीस यांनी नमूद केलं.

खासगी दवाखान्यांमध्ये बाधित रुग्णांवर उपचाराच्या कमाल शुल्काच्या नियमाचं पालन होत नाही. वैद्यकीय साधनांचे भरमसाठ शुल्क आकारलं जात असल्यानं मध्यमवर्गीयांना त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका आक्षेपार्ह विधानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांबद्दल बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत, असं मत व्यक्त केलं.

****

राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आाहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. तर अजोय मेहता हे एक जुलै पासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

****

राज्य शासनाचा या वर्षीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०१८-१९ या वर्षाचं मूळ आणि सुधारीत कर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत तसंच २०१९- २० या वर्षाचं विवरण पत्र दाखल करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना येणाऱ्या अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लघु आणि मध्यम वर्गातल्या करदात्यांना दिलासा देण्यासाठी एक लाख रूपयांच्या मर्यादेपर्यंत स्वयंमूल्यमापन कर भरण्यासदेखील ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१९- २० या वर्षात आयकराच्या कलम ८० सी अंतर्गत सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी विविध प्रकारची गुंतवूणक करण्यासाठीची मुदतही ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅन आणि आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदतही ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे.

****

डिझेलच्या दरात काल सलग अठराव्या दिवशी ४८ पैशांनी वाढ झाली. मात्र पेट्रोलचे दर स्थिर होते.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला.

जालना शहरासह परिसरात आज पहाटे पाच वाजता पाऊण तास जोरदार पाऊस झाला. पावसाची संततधार अद्याप सुरूच आहे.

परभणी आणि मानवत शहर परिसरात काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातही काल चांगला पाऊस झाला.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वात काल शहरातल्या सर्व बँकांसमोर आंदोलन करण्यात आलं. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं, बँकेने कर्ज वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी नियमानुसार दर्शनी भागावर स्केल ऑफ फायनान्सचा फलक लावावा इत्यादी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

****

सोयाबीनचं बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, तसंच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे पुरवली जातील, असं आश्वासन नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिलं आहे. नांदेड तालुक्यातल्या राहटी शिवाराची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

****

राज्यात विक्रीचा परवाना न घेता सोयाबिनचे बियाणे विक्री केल्याबद्दल परराज्यातल्या दोन कंपन्या आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातल्या मंदसौरची सालासर कृषि ॲग्रो आणि उत्तराखंडमधली हरिद्वारची पतंजली बायो रिसर्च इन्स्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड अशी या कंपन्यांची तर तेर इथले कृष्णाई शेती विकास केंद्र, आणि उस्मानाबादचे श्रीनिवास कृषि सेवा केंद्र अशी स्थानिक विक्रेत्यांची नावं आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकानं ही कारवाई केली.

****

वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यात प्रत्येक नागरिकानं योगदान द्यावं, असं आवाहन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात वसुंधरा प्रतिष्ठान आणि संगम हायटेक नर्सरी यांच्या वतीनं काल ‘वसुंधरा वृक्ष संवर्धन’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. वृक्षारोपणात येणाऱ्या सर्व अडचणी या हेल्पलाईन द्वारे सोडवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात विविध योजने अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वाटप करण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, तसंच काही अपरिहार्य कारणास्तव पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास २९ आणि ३० जूनला तालुकास्‍तरावर आयोजित होणाऱ्या विशेष अन्नधान्य वाटपाचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावावर काल लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीला खासदार इम्तियाज जलील, खासदार भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट आणि आमदार अतुल सावे उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तीन सक्षम अधिकारी द्यावा, अशी मागणी आमदार जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शहरातले सर्वपक्षीय प्रतिनिधी आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

****

नांदेड जिल्ह्यात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण न झाल्याचा प्रकार गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांनी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागितली आहे. शेतकऱ्यांनी वेळ न घालवता पर्यायी पिकांचं नियोजन करावं, असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथं अहिल्यादेवी होळकर चौकातल्या वैश्य नागरी सहकारी बँकेचं शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी रोकड पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेत प्रवेश करुन कागदपत्रांची नासधूस केली, मात्र रोकड त्यांच्या हाती लागली नाही. 

****

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आलेले सोलापूर जिल्ह्यातले सैनिक सुनील काळे यांच्या पार्थिवावर काल बार्शी तालुक्यात पानगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सरपंच सखुबाई गुजले, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह अनेकांनी यावेळी सुनील काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामस्थांनी शोकाकूल वातावरणात हुतात्मा सैनिकाला अखेरचा निरोप दिला.

****

औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मूत्रपिंड विकारानं करिना वाघिणीचा काल पहाटे मृत्यू झाला. साडे सहा वर्ष वय असलेल्या या वाघिणीचा याच उद्यानातल्या प्राणी संग्रहालयात जन्म झाला होता. कोरोना संसर्ग चाचणीसाठी या वाघिणीच्या स्रावाचे नमुनेही घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल आखाडा बाळापूर इथं भरलेल्या आठवडी बाजारात प्रचंड गर्दी दिसून आली. कोणत्याही नियमांचं पालन न करता नागरिक बाजारात फिरत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांची तर शहराध्यक्षपदी मोहमद हिशाम उस्मानी यांची नियुक्ती झाली आहे. लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल्य उटगे यांची तर लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पक्षानं ठाणे, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातले पदाधिकारीही बदलले आहेत.   

****

परभणी शहरात काल मास्क न लावता फिरणाऱ्या ३८ नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये दंड आकारण्यात आला. महानगरपालिकेच्या पथकानं ही कारवाई केली.

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातल्या अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १६ जुलैपासून घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाकडून तात्पुरत्या स्वरुपाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेता त्या- त्या परिस्थितीनुसार आणि शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंतिम निश्चित वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. 

****

No comments: