Monday, 29 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  राज्यात एक जुलैपासून मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा; पहिल्या टप्पातले बहुतांश नियम या टप्प्यातही कायम
Ø  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५ हजार २३९
Ø  जालन्यात १७ तर परभणीत तीन नवे रुग्ण
Ø  लातूर इथं मास्क न वापरणाऱ्या तसंच नियमभंग करणाऱ्या ५२ नागरिकांवर कारवाई
Ø  वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार
Ø  आणि
Ø  पेट्रोल आणि डिजेल दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन
****

 राज्यात मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा एक जुलैपासून सुरू होणार आहे. याबाबतचा आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज जाहीर केला. ३१ जुलैपर्यंत हा दुसरा टप्पा लागू असेल. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्पातले बहुतांश नियम या टप्प्यातही कायम असतील. लग्न समारंभ, आंतर जिल्हा प्रवास, सार्वजनिक वाहुतक, याबाबतच्या नियमांतही कोणताही बदल करण्यात आलेला नसून, मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्प्यातले नियम या दुसऱ्या टप्प्यातही कायम राहतील. स्थानिक पातळीवर नियम अधिक कडक करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, वैयक्तिक स्वच्छता, या बाबींचं काटेकोर पालन करण्यासह खरेदी आणि इतर कारणांसाठी नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावरही नियंत्रण ठेवण्याबाबत या आदेशत सांगण्यात आलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५ हजार २३९ झाली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात २०२ नवे रुग्ण आढळले, यापैकी ११४ रुग्ण मनपा हद्दीतले तर ८८ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत.

 दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****

 जालना जिल्ह्यात १७ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या ५२१ झाली आहे. यापैकी ३३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून,  सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
 बीड जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधेचे नवे पाच रुग्ण आढळून आले. यापैकी तीन रूग्ण हे आष्टी तालुक्यातले आहेत तर दोन रूग्ण हे बीड शहरातल्या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले आहेत.

 नांदेड जिल्ह्यात आज आणखी ४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. देगलूर नाका, नवीन कौठा, बाफना परिसर आणि मुखेड इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ३७१ झाली आहे. तर आज २ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत जिल्ह्यात २८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****

 परभणी तालुक्यातील झरी इथल्या एका कुटुंबातील विलगीकरणात असलेल्या तिघांना कोरोनाविषाणूची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ११२ झाली आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यात आज ३१ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या ३४४ झाली आहे. यापैकी १३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****

 चंद्रपूर जिल्ह्यात आज ५ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या ८७ झाली आहे. यापैकी  ५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****

 लातूर शहरात आज मास्क न वापरणाऱ्या तसंच ग्राहकांना हॉटेल मध्ये बसवल्याप्रकरणी अशा एकूण ५२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नंदी स्टॉप आणि अंबाजोगाई रोड या भागात महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली.
****

 बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वंयसेवी संस्थांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘मिलकर डॉट केट्टो डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. या व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्यात प्लॅटिना प्लाझमा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, जगातली सर्वात मोठी प्लाझमा बँक म्हणून हे केंद्र काम करेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****

 पंढरपूर इथं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून २ जुलैच्या  रात्री  १२ वाजे पर्यंत कडक संचार बंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि १० किमी अंतरावरील गावात ही संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांनी तसंच वारकऱ्यांनी पंढरपूरला येवू नये अशी विनंतीवजा आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार आहे. ऊर्जा मंत्री नीतीन राऊत यांनी ही माहिती दिली. राऊत यांनी आज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नागपुरातल्या उर्जा अतिथी गृहातून दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. केंद्र सरकारला लवकरच याबाबत एक लिहिणार असल्याचं ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. घरगुती वीज ग्राहकांचे विद्युत शुल्क, वीज देयकाचे हफ्ते तथा कालावधी, वीज देयकाचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलत, वीज देयकाच्या हफ्त्यावरचं व्याज तसंच इतर राज्यांनी केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून महावितरणने स्वयंपूर्ण प्रस्ताव दोन दिवसात सादर करावा असे निर्देश राऊत यांनी दिले. टाळेबंदीमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये तसंच त्यांना वीज देयक भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल. यादृष्टीने पावलं उचलावीत, अशा सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी केल्या.
****

 पेट्रोल आणि डिजेल दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. टाळेबंदीमुळे आर्थिक स्थिती नाजुक असलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर थोरात तसंच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. थोरात यांनी पुण्यातही या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

 नाशिक, सातारा, धुळे, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर तसंच परभणी, इथंही कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

 सातारा इथं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर धुळे इथं जिल्हा माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणारी भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नाशिक इथं कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं. चंद्रपूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

 परभणी इथं शहर आणि जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आलं.
****

 राज्यातल्या कापूस उत्पादकांचा प्रश्न सोडविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केला आहे. ते आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोनाविषाणूचा वाढत्या संक्रमणाचा यावेळी त्यांनी आढावा घेऊन विभागीय आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या. खासदार नवनीत राणा यांच्या निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या ४ रुग्णवाहिकांचं माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी लोर्कापण करण्यात आलं.
****

 लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण आणि संस्कृती कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. शहरात शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात राष्ट्रीय महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सुमारे ६५ किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गापैकी ३० किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी मे पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊन वापरण्यासाठी सुरू होईल असे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितलं.
****

 औरंगाबाद शहरात दिव्य मराठी या दैनिकाचे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध म्हणून उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला निवेदन सादर करण्यात आलं. पत्रकारांना आता घटनाकारांनीच न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली.
****

 लातूर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १९ पूर्णांक ४५ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज पर्यंत झालेला पाऊस  हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या  २६ पुर्णांक ३९ शतांश टक्के झाला असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
****

 परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा परीसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला आहे. जून महिन्यात होणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत आत्तापर्यंत १८१ टक्के पाऊस झाला असून ८० टक्के पेरण्या झाल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्हा पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मुख्यमंत्री मदत  निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुंढे-मुधोळ यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
*****

No comments: