Monday, 29 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जून २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात आज १९ हजार ४५९ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातली बाधितांची एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ झाली आहे. या संसर्गातून आतापर्यंत ३ लाख २१ हजार ७२२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत, त्यामुळे देशात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ५८ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत देशात १६ हजार ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील सर्वाधिक १५६ मृत्यू महाराष्ट्रातील आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या ५ हजार २३९ झाली आहे. यापैकी २ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज सकाळी आढळलेल्या २०२ रुग्णांपैकी ११४ रुग्ण मनपा हद्दीतील असून यामधे भाग्य नगर तसंच नारेगाव इथं सर्वाधिक प्रत्येकी ७, एन दोन-सिडको इथं ६, नागेश्वरवाडी, पहाडसिंगपुरा, बालाजी नगर इथं प्रत्येकी ५, जामा मशीद परिसर, जय भवानी नगर, शिवशंकर कॉलनी इथं प्रत्येकी ४ रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागात आज सकाळी ८८ रुग्ण आढळले असून यामधे सर्वाधिक वैजापूर इथं १२, वरुडकाझी, करमाड, इंद्रप्रस्थ कॉलनी- बजाज नगर इथं प्रत्येकी ६ रुग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमधे १२३ पुरूष आणि ७९ महिला असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

****

जालना जिल्ह्यात १७ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या ५२१ झाली आहे. यापैकी ३३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

अमरावती जिल्ह्यात आज ३५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामधे जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ४ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड बाधितांची एकूण संख्या ५४३ झाली आहे. यापैकी ३८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १३१ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोविड प्रादुर्भाव आणि टाळेबंदीचा राज्यातल्या साखर उद्योगालाही फटका बसला आहे. जानेवारी ते जून दरम्यानच्या काळात यंदा फक्त ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली, गेल्या वर्षाच्या आधारे यंदा या काळात ६० लाख टन साखरेची निर्यात करण्याचं उद्दीष्ट निर्धारित होतं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यंदाच्या गाळप हंगामात काळात १४४ साखर कारखान्यांमधून सुमारे ५७० लाख टन ऊसाचं गाळप झालं, त्यातून ६३ लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. यापैकी फक्त ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली असून, आणखी सहा लाख टन साखरेचा साठा निर्यातीसाठी गोदामाजून रवाना झाला असल्याचं दांडेगावकर यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी केलेल्या कारवाईत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. खुल चोहर या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं नाकेबंदी करत शोधमोहीम सुरु केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात ३ दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांकडून १ ए के ४७ रायफल आणि २ बंदुका हस्तगत करण्यात आल्या असून अद्यापही शोध मोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

जम्मू काश्मीरमधला फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी याने हुर्रियत कौन्फ्रन्स या फुटीरतावादी संघटनेच्या प्रमुख पदावरून पायउतार होत असल्याचं सांगितलं आहे. गिलानी याने एक पत्र तसंच चित्रफितीतून हा निर्णय जाहीर केला. त्याच्या या निर्णयामागे असलेल्या कारणांमध्ये संघटनेत नेतृत्वाविरोधात बंडखोरी हे प्रमुख कारण असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धुळे तालुक्यातील झोडगे गावाजवळचा कोल्हापूरी बंधारा ओसंडून वाहत आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं या बंधाऱ्यातलं पाणी गावात शिरलं तसंच मुंबई आग्रा महामार्गावर वाहात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलचे दर महागले आहेत. पेट्रोलच्या दरामधे लीटरमागे पाच पैसे तर डिझेलच्या दरामधे लीटरमागे १३ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या तेवीस दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...