Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28
June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणूमुळे निर्माण संकटकाळातील टाळेबंदी
उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या
दोन गोष्टींवर भर द्यायला हवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी
आज आपल्या `मन की बात` उपक्रमांतर्गत सहासष्टाव्या भागात देशवासीयांना संबोधित केलं.
टाळेबंदीपेक्षा आता टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक काळजी घ्यायला हवी, असं त्यांनी
यावेळी नमुद केलं. आपली सतर्कताच कोरोना विषाणूपासून आपला बचाव करणार असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं. आपण मास्क लावणार नसू, दोन मीटरचं अंतर ठेवणार नसू किंवा अन्य आवश्यक
काळजी घेत नसू तर आपल्या बरोबरच आपण इतरांच्या विशेषतः आपली घरातली मुलं आणि ज्येष्ठांना
संकटात टाकू, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. स्थानिक वस्तूंची खरेदी, त्यांचा आग्रह
देश मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं त्यांनी या कार्यक्रमामधे स्पष्ट केलं. लडाखमधे
ज्यांनी भारतीय भूभागाकडे वक्र दृष्टी केली त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असल्याचं
पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं. या वर्षी देशाला कराव्या लागत असलेल्या विविध संकटांचा
तसंच त्यावर योजलेल्या उपायांची पंतप्रधानांनी सुमारे बत्तीस मिनिटांच्या मनोगतात माहिती
दिली. या वर्षी आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नव्या वाटा उघडत असून याच
वर्षी आपण देशाला नव्या उंचीवर पोहचवू या, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
देशात कोरोना विषाणूचे नवे
१९ हजार ९०६ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या असून एकूण रुग्ण संख्या
आता पाच लाख २८ हजार ८५९ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्या ४१० झाली आहे. यात महाराष्ट्रातील १६७ रुग्ण आहेत.
****
औरंगाबादमधे आज सकाळी कोरोना
विषाणूचे नवे २०८ रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांची संख्या आता चार हजार ९७४ झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या रुग्णांमधे ११२ पुरूष आणि ८६ महिला रुग्णांचा समावेश
आहे. यात महापालिका हद्दीतील ११५ रुग्ण तर
ग्रामीण भागातील ९३ रुग्ण आहेत. औरंगाबाद
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचे दोन हजार ४४६ रुग्ण
बरे झाले आहेत. जिल्ह्यातील २३८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे तर
दोन हजार २९० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रूग्णांची संख्या ५०३ झाली आहे.
जिल्ह्यातील ३१७ रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा
यामुळे
मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या १७४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
साताऱ्यात आज कोरोना विषाणूचे नवे ३७ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील
या रुग्णांची संख्या ९७५ झाली आहे. जिल्ह्यातील ७११ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सातारा जिल्ह्यात या विषाणू संसर्गामूळे
आतापर्यंत ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील १०
रुग्णांनी आज कोरोना विषाणूवर मात केली. यात संगमनेरचे ५, अहमदनगर महापालिकेतील २, पारनेर, अहमद नगर आणि
अकोले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अहमदनगर
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची
संख्या आता २८३ इतकी झाली असून नवे १२ रुग्ण आढळले आहेत.
****
धुळे महापालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतनमधे उपचार घेत असलेल्या २५ कोरोना
विषाणूच्या रुग्णांना काल बरे झाल्यानंतर निरोप देण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. सेनगाव
तालुक्यात ४१ मिली मीटर पाऊस झाला असून
दोन मंडळांत अतीवृष्टी झाली आहे. गोरेगाव - सेनगाव रस्त्यावरील आजेगावनजीकचा
पर्यायी पूल वाहून गेल्यानं ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड तालुक्यातील लिंबगाव
महसूल मंडळात काल रात्रभरात ६४ मिली मीटर पाऊस झाला. या
पावसामुळे नुकताच जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेला गाव तलाव तथा बंधारा पाण्यानं भरून वाहत आहे.
*****
No comments:
Post a Comment