Sunday, 28 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28 JUNE 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२० सायंकाळी ६.००
****
 ** कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
* कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्यांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
* कोरोना विषाणू चाचणीसाठी अकरा नव्या प्रयोगशाळा सुरू
आणि
* कोकणातील रेवस - रेडी सागरी महामार्गाचं काम नोव्हेंबरमध्ये सुरू होणार- खासदार तटकरे यांची माहिती
****
कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबईत यशस्वी झालेली योजना आता राज्यभर राबवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून राज्याला संबोधित केलं. ते म्हणाले...

पण ही रुग्णांची संख्या वाढत असताना आपण Test ची संख्या सुद्धा वाढवली आहे म्हणून आता रुग्ण येण्याची वाट न बघता आपण वायरस पोहोचायच्या आत आपण तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो Chase The Virus तेव्हा एक नवीन संकल्पना मुंबईत सुरू केली असून राज्यभरात आपण राबवत आहोत Chase The Virus त्याच्यासाठी रुग्णांची संख्या वाढत असली तरी आपल्याकडे आरोग्य सुविधाही आपण वाढवत आहोत औषधांचे सुद्धा टंचाई होणार नाही औषधोपचार ते सुद्धा वाढवत आहोत.
राज्यात गरिबांना अल्प दरात अन्न धान्य वितरण सुरू ठेवता यावं यासाठी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अभियान योजना पुढंही सुरू ठेवावी या करता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवलं असल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
****
देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांपेक्षा यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, या दोन्ही संख्यांमधलं अंतर ९६ हजारांपेक्षा अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल दिवसभरात देशभरात १३ हजार ९४० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले. यामुळे देशभरात यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ६३६ झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे १ लाख ८९ हजार आहे. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सध्या ५८ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोरोना विषाणूच्या चाचण्यांसाठी देशभरात काल दिवसभरात ११ नव्या प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता देशात कोरोना विषाणू चाचण्यांसाठी १ हजार १६ प्रयोगशाळा उपलब्ध झाल्या आहेत. यातल्या ७३७ शासकीय तर २७९ खाजगी प्रयोगशाळा आहेत. देशभरात काल दिवसभरात २ लाख १५ हजारांहून अधिक, तर आत्तापर्यंत एकूण ७७ लाखांहून अधिक संबंधित चाचण्या केल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे चार नवे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. यात परभणी शहरातील गंगापुत्र कॉलनी आणि गव्हाणे चौकातील प्रत्येकी एक तर जिंतूर शहरातील बामणी प्लॉट भागातील एक आणि सोनपेठ शहरातील राजगल्लीतील एका रुग्णाचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
अकोला जिल्हा कारागृहातील ५० बंदी तसंच इथले अन्य २८ अशा ७८ जणांना  कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इथं जिल्हा कारागृहात तिनशे बंदी आहेत. गेल्या चोवीस तारखेला इथल्या १८ बंदींना याची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे दोन नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता ३६७ झाली आहे. जिल्ह्यातील २७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नांदेड जिल्ह्यात १६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचे ४२ नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता ५०४ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधे रेहमानगंजमधले पंधरा आणि दाना बाजारमधले दहा तर खडकपुरा भागातील पाच रुग्ण आहेत.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेच्या कामाची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आज पाहणी केली. प्रयोगशाळा उभारणीचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
****
`कोरोनील` या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष मंत्रालय तसंच भारतीय वैद्यकीय संशोधक परिषद -आयसीएमआर- यांनी अद्याप नाहरकत पत्र दिलेलं नसल्यानं या औषधांचा साठा राज्यात कुठंही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ते कोरोना विषाणू आढावा बैठकी नंतर सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंढरपूर इथं आषाढी वारीच्या वेळी शासकीय महापूजा करायची की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. नागपूर इथं कार्यकर्त्याच्या हत्ये प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूची रोगराई आटोक्यात आल्यानंतर राज्यात पोलीस भरती केली जाईल असं गृहमंत्री देशमुख यावेळी म्हणाले.
****
कोकणातील रेवस-रेडी या सागरी महामार्गासाठी सरकारनं चार हजार पाचशे कोटी रूपये मंजूर केले असून या महामार्गाचं काम येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते काल अलिबागमधे पत्रकारांशी बोलत होते. कोरोना विषाणूमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असली तरी या महामार्गानं कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्यानं या महामार्गाला प्राधान्यानं मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रेवस-करंजा-अलिबाग-नांदगाव-मुरूड-शेखाडी मार्गे पुढे हा महामार्ग रेडीला जाणार असून हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार असल्याचं खासदार तटकरे यावेळी म्हणाले.
****
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी बँक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना या मुद्दावर पत्र पाठवण्यात आलं आहे. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून बँकांना या संदर्भात स्पष्ट निर्देश मिळावेत, त्या अभावी या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता येत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, असं या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यासह अन्य तालुक्यांत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड विविध ठिकाणी भेट देत आहेत. नेर, दारव्हा नंतर त्यांनी दिग्रस इथं प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. इथल्या कोरोना रुग्णालयात तसंच आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात विलगीकरणात असलेल्यांशी पालकमंत्री राठोड यांनी संवाद साधला.
****
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात काल संध्याकाळी कोरोना विषाणूचे सहा  रुग्ण आढळले असून रात्री उशिरा गडचांदूर इथं औरंगाबादहून परतलेला एक २७ वर्षीय युवकाला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात  कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ८१ झाली असून ५१ रुग्ण बरे झाले आहेत तर ३० रुग्ण उपचार घेत आहेत.
****
कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील केश कर्तनालयं आज तीन महिन्यांच्या खंडानंतर सुरू झाली. सुरक्षिततेसाठी सरकारनं घातलेल्या नव्या अटी आणि नियमांचं पालन करत ही दालनं सुरू झाली आहेत. लातूर शहरात ५१८ केश कर्तनालयं आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या सुमारे तेराशे कारागिरांचा रोजगार नव्यानं झाल्याचं आज पहायला मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शिक्षक, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय पालघर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काल तीन हजार ९३० होती.
****


No comments: