Saturday, 27 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.06.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      मास्क आणि सुरक्षित अंतर हाच कोविड प्रतिबंधावरचा उपाय - पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      राज्यात काल एका दिवसभरात पाच हजार २४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण.

·      औरंगाबाद जिल्ह्यात नव्या २२३ रुग्णांची नोंद; जिल्ह्याची रुग्णसंख्या साडे चार हजारावर.

·      जालना ४०, नांदेड १७, लातूर १४, हिंगोली ८ तर उस्मानाबाद आणि बीड इथे प्रत्येकी दोन नवे रुग्ण.

·      राज्यात पुन्हा टाळेबंदी लागणार नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे.

·      औरंगाबाद जिल्ह्यात कोविड नियंत्रणात कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश.

·      यंदाच्या गणेशोत्सवात कमाल चार फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन करण्यावर राज्यातल्या सर्व गणेश मंडळांनी सहमती.

आणि

·      राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन.

****

कोविड-19 साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क आणि सुरक्षित अंतर हाच कोविड प्रतिबंधावरचा उपाय आहे असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल स्वावलंबी उत्तर प्रदेश रोजगार अभियान सुरु करताना बोलत होते. रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. उत्तर प्रदेश सरकारनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.

****

देशात कोविडग्रस्तांचा बरे होण्याचा दर ५८ पूर्णांक ४२ शतांश टक्के झाला आहे. देशात काल १७ हजार २९६ नवे कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळले. त्यामुळे देशातल्या या रुग्णांची संख्या आता ४ लाख नव्वद हजार चारशे एक झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण अठ्ठावन्न पूर्णांक २४ शतांश टक्के एवढं झालं आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत १५ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात एक लाख एकोण नव्वद हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

****

राज्यात काल एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक पाच हजार २४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ५२ हजार ७६५ झाली आहे. काल १७५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं सात हजार १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात दोन हजार ३६२ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ७९ हजार ८१५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ६५ हजार ८४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या चार हजार ५२२ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातले १२७ तर ग्रामीण भागातले ९६ रुग्ण आहेत.

दरम्यान, काल जिल्ह्यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोशनगेट परिसरातला ६८ वर्षीय आणि वैजापूर इथल्या ४३ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गानं २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ८० रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत दोन हजार ३७३ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ९१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जालना इथं काल चाळीस जणांचे अहवाल बाधित आले, त्यामुळे जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता ४४७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत तीनशे एक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रूग्णांची नोंद झाली. पीरबुऱ्हाण नगर इथं तीन, उमर कॉलनी दोन, तर लेबर कॉलनी, शिवनगर, बिलाल नगर, बोर्बन फॅक्टरी परिसर, शिवाजीनगर, गोकुळ नगर, भगतसिंघ रोड, नाथ नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्याचबरोबर नायगाव तालुक्यातल्या टाकबीड आणि कंधार इथलेही दोन रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३४८ झाली आहे.

दरम्यान, नांदेड शहरातल्या गुलजार बाग इथला ६५ वर्षीय आणि उमर कॉलनीतल्या ५४ वर्षीय रुग्णांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १६ झाली आहे. तर काल तीन रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात एकूण १७० विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून, सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातल्या दयाराम रोड इथले पाच, शाम नगर इथले तीन, नारायण नगर, मजगे नगर, इथले प्रत्येकी दोन, एमआयडीसी परिसरातला एक रुग्ण आहे. उदगीर इथलेही दोन रुग्ण काल बाधित आढळून आले. त्यामुळे लातूर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २८० झाली आहे.

दरम्यान, औसा तालुक्यातल्या भेटा इथल्या एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात काल पाच रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत १९० रुग्ण बरे झाले असून, सध्या ७३ रुग्णांवर जिल्हाभरात उपचार सुरु आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. कळमनुरी तालुक्यातले सात, तर औंढा नागनाथ तालुक्यातल्या भोसी इथल्या २२ वर्षीय गर्भवतीचा यात समावेश आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २५९ झाली आहे. त्यापैकी २२९ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. दोन्ही रुग्ण भूम तालुक्यातल्या नाळी वडगाव इथले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १९८ झाली आहे. त्यापैकी १५२ रुग्ण बरे झाले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. भूम आणि बीड इथल्या रुग्णांचा यात समावेश आहे. बीड जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ११८ झाली आहे. त्यापैकी चार जणांचा मृत्यू, तर ८६ रुग्ण बरे झाले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात सध्या दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ९० जण बरे झाले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

मुंबईत काल आणखी एक हजार २९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ११७ रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७८७ नवे रुग्ण ते १९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ११५ नवे रुग्ण आढळले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात १७०, धुळे १२३, अहमदनगर २८, तर नंदुरबार, सातारा आणि अमरावती जिल्ह्यात काल प्रत्येकी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.

****

राज्यात पुन्हा टाळेबंदी होणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. पुढच्या दोन महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो. त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं. खासगी तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी तसेच उपचार शुल्क आणि सुविधांच्या दर आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली. कोविडग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण मोठं आहे, मात्र त्यासाठी लवकर निदान होणं आवश्यक आहे. त्यामुळे संशयित रुग्णांनी लक्षणं न लपवता, लवकर तपासणी करुन घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड नियंत्रणात कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. रुग्णांची वाढती संख्या तसंच अधिकाऱ्यांमधला समन्वयाचा अभाव यासंदर्भातल्या वृत्तांची दखल घेऊन न्यायालयानं स्वत: याचिका दाखल करून घेत, हे निर्देश दिले. कोरोना विषाणूचे रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणारे खासगी दवाखाने आणि प्रयोगशाळांविरुद्धही कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत असून, प्रत्येक पातळीवर हेळसांड होत असल्यानेच कोरोना विषाणूचा प्रसार वाढला, असं खंडपीठानं म्हटलं आहे. या याचिकेवर पुढची सुनावणी येत्या तीन जुलैला होणार आहे.

****

मध्यम स्तरावरचा रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्ती आता वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यास पात्र असतील. यासाठी मोटार वाहन कायद्यात सुधारणेबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अनेक विनंती पत्रांनंतर विशेषज्ञांच्या सल्ल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. मात्र रंगांधळेपणाची तीव्रता अधिक असलेल्या व्यक्ती परवाना घेण्यास पात्र नसतील, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.  

****

राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना सूचित करावं अशी मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीचं एक पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. सध्याची कोविड प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती ही कोणत्याही परीक्षा किंवा वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांना परीक्षा न घेण्याचे निर्देश द्यावेत आणि तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी जारी कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांचे निकाल १५ जुलैला जाहीर होणार आहेत. मंडळाकडून काल ही घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या तीन परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर प्रलंबित परीक्षेसाठी गुणांकन केलं जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल, मात्र त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम असतील. दहावीच्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेचा पर्याय नसेल, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी पक्षांचं पूर्ण सहकार्य असून, कोविड विरुद्धच्या लढ्यात तीनही पक्ष एकजुटीने काम करत असल्याचं पवार यांनी नमूद केलं. या सरकारवर आपला अंकुश असल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन करत, मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं.

****

स्वावलंबित्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याच्या दृष्टीने महिलांनी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ते काल नागपूर मधून संबोधित करत होते. ग्रामीण भागात तसंच गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांना रोजगार मिळेल असे उद्योग सुरु करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं.

****

यंदाच्या गणेशोत्सवात कमाल चार फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन करण्यावर राज्यातल्या सर्व गणेश मंडळांनी सहमती दर्शवली आहे. राज्यातल्या सर्व गणेश मंडळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळी मूर्तीची उंची नव्हे तर भक्ती महत्त्वाची असं सांगून, गर्दी टाळत सामाजिक भान राखून गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्व मंडळांचं एकमत झालं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येत्या सोमवारपासून दोन जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रमुख पालख्या आणि त्यासोबतच्या मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर वारकऱ्यांना पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कोणीही या दिवसांत पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

शैक्षणिक शुल्क वाढीला प्रतिबंध करणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी यंदा शुल्क वाढ करू नये, तसंच गेल्या वर्षातलं शुल्क एकरकमी वसूल न करता, टप्प्याटप्प्यानं वसूल करावं, यासाठीचा अध्यादेश राज्य सरकारनं जारी केला होता. हा अध्यादेश मागे घेण्याची मागणी संस्था चालकांनी एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती. हा अध्यादेश शिक्षण संस्था चालकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा आहे, तसंच शुल्क वाढ न केल्यास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या निर्माण होईल, असंही याचिकाकर्त्यांनी या याचिकेत म्हटलं होतं. त्यावर न्यायालयानं, या अध्यादेशाला स्थगिती दिली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक असल्याचं, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पडळकर यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, असं आठवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

चीननं भारताचा भू भाग बळकावला आहे का, याबाबत पंतप्रधानांनी जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. चीननं भारतीय हद्दीत प्रवेश केला नसल्याचं पंतप्रधान सांगत आहेत, मात्र उपग्रहानं घेतलेल्या छायाचित्रातून तीन ठिकाणी चीननं घुसखोरी केली असल्याचं दिसतं, असं गांधी यांनी म्हटलं आहे. ‘शहिदों को सलाम दिवस’ या काँग्रेस पक्षाच्या अभियानांतर्गत एका चित्रफितीत गांधी यांनी, चीनच्या घुसखोरीनंतरही आपले पंतप्रधान असं विधान करत असतील, तर ते चीनसाठी लाभदायक ठरेल, असं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल देशभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ अंतर्गत हुतात्मा सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षानं गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना अभिवादन केलं.

लातूर जिल्हा आणि शहर कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. आमदार धीरज देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काल अनुक्रमे २१ पैसे आणि १७ पैसे प्रतिलीटर वाढ झाली. गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अवघ्या तीन आठवड्यांच्या कालावधीत पेट्रोलचे दर लीटरमागे ८ रुपये ८७ पैसे तर डिझेलचे दर लीटरमागे १० रुपये ८० पैशांनी वाढले आहेत.

****

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेला युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्यानं काल मृत्यू झाला. मेमन याला २०१८ मध्ये औरंगाबाद कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं.

****

वीज ग्राहकांनी वीज देयकाबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि देयकं अदा करून महावितरणला सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केलं आहे. टाळेबंदीदरम्यानच्या काळातल्या वीज देयकांबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी गणेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब स्पष्ट केली. मीटर रिडींग बंद असल्यानं, ग्राहकांना सरासरी वीजदेयक पाठवण्यात आलं आहे, टाळेबंदी उठवल्यानंतर मीटर रिडींग घेऊन एप्रिल-मे आणि जून महिन्यात वापरलेल्या वीजेचं नियमानुसार देयक आकारल्याचं गणेशकर यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात देयकाचा भरणा केलेल्या ग्राहकांची रक्कम समायोजित केली जात असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी औरंगाबाद परिमंडळात महावितरणच्या प्रत्येक उपविभाग कार्यालयात लवकरच ग्राहक मेळावे घेणार असल्याची माहितीही गणेशकर यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नाही, त्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ - महाबीजकडून आतापर्यंत ११० क्विंटल बियाणं बदलून देण्यात आलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्याही लेखी तक्रारी आल्यास त्यांची तालुकस्तरीय समितीकडून पाहणी करून त्या-त्या शेतकऱ्यांना बियाणं बदलून देण्यात येईल, असं महाबीजकडून सांगण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात आरोग्य क्षेत्रातल्या २५ हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली असून, सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे, असं ते म्हणाले. गरज भासल्यास खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिकृत करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, देशमुख यांनी काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंही कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात आढावा बैठक घेतली. राज्यात लवकरच प्लाझ्मा थेरपी बँकिंग सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात आणखी २६० खाटांना तत्वत: मंजुरी दिल्याचं देशमुख यांनी यावेळी जाहीर केलं.

****

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल महानगरपालिकेअंतर्गत अनेक कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त रविंद्र निकम आणि इतर अधिकारी उपस्थित होते. हर्सुल इथं घनकचरा प्रक्रिया केंद्र सुरू करुन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅसचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. मिटमिटा इथं प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरता शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. समांतर पाणी पुरवठा योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर यांच्या हस्ते विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

लातूर इथं आमदार धीरज देशमुख यांनी कॉंग्रेस भवनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

उदगीर इथं उदयगिरी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षात ‘शिक्षक योद्धा’ म्हणून कार्य करावं, असं आवाहन केलं.

परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी एक जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाच्या अनुषंगानं राज्यात ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.

****

राज्यातल्या ज्या सरपंच आणि उपसरपंचांनी त्यांचं मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही त्यांनी प्रस्तुत प्रणालीवर नोंद करावी, असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. राज्य शासनानं राज्यातल्या ग्रामपंचायतीत पात्र आणि कार्यरत सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत केली आहे.

****

No comments: