Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२० सायंकाळी ६.००
****
**
राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी
**
मध्यम स्तरावरचा रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्ती आता वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यास
पात्र
**
देशात कोविडग्रस्तांचा बरे होण्याचा दर ५८ पूर्णांक ४२ शतांश टक्के
**
औरंगाबाद जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या साडे ४ हजार; नांदेड इथं दोन रुग्णाचा मृत्यू
**
वीजदेयकाबाबत कोणताही संभ्रम न बाळगता देयकं अदा करावीत - वीज महावितरणचं आवाहन
आणि
**
उस्मानाबाद इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू
****
राष्ट्रीय
संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात
राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना सूचित करावं अशी मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीचं एक पत्र मुख्यमंत्र्यांनी
पंतप्रधानांना पाठवलं आहे. सध्याची कोविड प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती ही
कोणत्याही परीक्षा किंवा वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील
शैक्षणिक संस्थांना परीक्षा न घेण्याचे निर्देश द्यावेत आणि तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी
निर्गमित कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे. राज्यात अव्यावसायिक
अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं यापूर्वीच
घेतला आहे.
****
मध्यम
स्तरावरचा रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्ती आता वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यास पात्र
असतील. यासाठी मोटार वाहन कायद्यात सुधारणेबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली
आहे. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अनेक विनंती पत्रांनंतर विशेषज्ञांच्या सल्ल्यानं
हा निर्णय घेण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र रंगांधळेपणाची तीव्रता
अधिक असलेल्या व्यक्ती परवाना घेण्यास पात्र नसतील, असंही या बाबतमीत स्पष्ट करण्यात
आलं आहे.
****
देशात
कोविडग्रस्तांचा बरे होण्याचा दर ५८ पूर्णांक ४२ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात
या आजाराचे एक लाख एकोणनव्वद हजारावर रुग्ण उपचार घेत असून, दोन लाख ८५ हजारावर रुग्ण
उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४९२ झाली आहे. आज दिवसभरात
१९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, या नवीन रुग्णांपैकी १०२ रुग्ण औरंगाबाद
शहर परिसरातले तर ९१ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार
२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या एक हजार नऊशे ६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड
इथं आज दोन कोरोनाविषाणू बाधीत रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे रुग्ण गुलजार
बाग तसंच उमर कॉलनी भागातले रहिवासी होते.
जिल्ह्यात
आतापर्यंत कोरोनाविषाणू संसर्गाच्या बाधेमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता
१६ झाली आहे. तर तीन रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७० रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ४५ रुग्ण उपचार घेत
आहेत.
****
धुळे
जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२३ नवे कोरोना विषाणू बाधीत रुग्ण वाढले त्यामुळे जिल्ह्यातील
एकूण रुग्णांची संख्या आठशे एकोणपन्नास झाली आहे. आज एका ७० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाल्यानं जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृतांची संख्या एकावन्न झाली
असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
***
अमरावती
इथं आज तीन नवे कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची
एकूण संख्या ४७५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तीनशे सदोतीस जण उपचारानंतर बरे होऊन घरी
गेले आहेत. सध्या ११५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
चीनने
भारताचा भू भाग बळकावला आहे का, याबाबत पंतप्रधानांनी जनतेला सत्य सांगावं, असं आवाहन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. चीनने भारतीय हद्दीत प्रवेश केला नसल्याचं
पंतप्रधान सांगत आहेत, मात्र उपग्रहानं घेतलेल्या छायाचित्रातून तीन ठिकाणी चीननं घुसखोरी
केली असल्याचं दिसतं, असं गांधी यांनी म्हटलं आहे. शहिदों को सलाम दिवस या काँग्रेस
पक्षाच्या अभियानांतर्गत एका चित्रफितीत गांधी यांनी, चीनच्या घुसखोरीनंतरही आपले पंतप्रधान
असं विधान करत असतील, तर ते चीनसाठी लाभदायक ठरेल, असं म्हटल्याचं, पीटीआयच्या बातमीत
म्हटलं आहे.
दरम्यान,
काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज देशभरात शहिदों को सलाम दिवस अंतर्गत हुतात्मा सैनिकांना
अभिवादन केलं. मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेस
पक्षानं गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना अभिवादन केलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
लातुर
जिल्हा आणि शहर कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ
हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. आमदार धीरज देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी
उपस्थित होते.
****
वीजग्राहकांनी
वीजदेयकाबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि देयकं अदा करून महावितरणला सहकार्य करावं,
असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केलं
आहे. टाळेबंदीदरम्यानच्या काळातल्या वीज देयकांबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी गणेशकर
यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब स्पष्ट केली. मीटर रिडींग बंद असल्यानं, ग्राहकांना
सरासरी वीजदेयक पाठवण्यात आलं आहे, टाळेबंदी उठवल्यानंतर मीटर रिडींग घेऊन एप्रिल-मे-
आणि जून महिन्यात वापरलेल्या वीजेचं नियमानुसार देयक आकारल्याचं गणेशकर यांनी सांगितलं.
दरम्यानच्या काळात देयकाचा भरणा केलेल्या ग्राहकांची रक्कम समायोजित केली जात असल्याचं,
गणेशकर यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी औरंगाबाद परिमंडळात
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग कार्यालयात लवकरच ग्राहक मेळावे घेणार असल्याची माहितीही
गणेशकर यांनी दिली.
****
उस्मानाबाद
इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची
माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. ते आज उस्मानाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात आरोग्य क्षेत्रातील २५ हजार रिक्त पदांची भरती
प्रक्रिया सुरू केली असून सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
संकटातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे, असं ते म्हणाले. गरज भासल्यास खासगी
डॉक्टरांच्या सेवा अधिकृत करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादचे
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज महानगरपालिकेअंतर्गत अनेक कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र
निकम आणि इतर अधिकारी उपस्थित होते. हर्सुल इथे घनकचरा प्रक्रिया केंद्र सुरू करुन
कचऱ्यापासून बायोमिथेन गॅसचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
मिटमिटा इथं प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त
जागेकरता शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती देसाई यांनी दिली. समांतर पाणी पुरवठा
योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना
आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.
****
राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शाहू महाराजांचा राज्यकारभार आजच्या आव्हानात्मक
परिस्थितीत मार्गदर्शक असल्याचं ते म्हणाले. तसचं सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छाही
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.
नांदेड
इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात परिसरात सामाजिक न्याय
दिनानिमित्त न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर यांच्या हस्ते विविध प्रजातीच्या वृक्षांची
लागवड करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment