Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2020
Time 17.50 to 18.00
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२० सायंकाळी ५.५०
****
Ø
प्रधानमंत्री गरीब कल्याण
योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
Ø
औरंगाबाद शहरात दोन कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू;
परभणी जिल्ह्यात तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण
Ø
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर
राज्यभरातल्या संतांच्या पालख्यांचं पंढरपुराकडे प्रस्थान
आणि
Ø
संपूर्ण वीज देयक एकरकमी
भरल्यास, राज्य सरकारकडून देयकात दोन टक्के सवलत
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज
देशवासियांना केलेल्या संबोधनात त्यांनी ही माहिती दिली.
आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवादरम्यान
देशातला एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी पुढचे पाच महिने प्रत्येक लाभार्थ्याला
पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना दाळ मोफत मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. एक देश एक शिधापत्रिका या योजनेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. देशभरातल्या
८० कोटी जनतेला लाभ देणाऱ्या गरीब कल्याण अन्न योजनेवर सरकार सुमारे ९० हजार कोटी रुपये
खर्च करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. प्रामाणिक करदाते तसंच शेतकऱ्यांच्या
योगदानामुळे ही योजना राबवणं शक्य झालं असून, या सर्वांना नमन करत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. टाळेबंदीनंतर आतापर्यंत २० कोटी महिलांच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये
जमा केले असून, ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खत्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले असल्याची
माहिती पंतप्रधानांनी दिली.
बदलत्या हवामानात नागरिकांनी
प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी, कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं,
उद्यापासून सुरू होणाऱ्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी
घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, आदी सूचनाही पंतप्रधानांनी केल्या.
****
दरम्यान कोरोना विषाणूवर औषध
संशोधनासंबंधीची एक आढावा बैठक आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. या बैठकीत पंतप्रधानांनी या औषधासाठीची चतु:सूत्री नमूद केली. हे औषध परवडणाऱ्या
दरात असावं, सर्वांसाठी सहज उपलब्ध असावं, अतिसंवेदनशील वर्गाचा प्राधान्यानं विचार
व्हावा, आणि या औषधाचं संशोधन तसंच उत्पादन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निश्चित कालमर्यादेत
व्हावं, हे चार मुद्दे ध्यानात ठेवून संशोधनाचं हे राष्ट्रीय कार्य करावं, असं पंतप्रधानांनी
सांगितलं आहे.
****
देशात कोविड -१९ च्या चाचणीसाठी प्रयोगशाळांच्या
संख्येत सातत्यानं वाढ केली जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
सध्या अशा एक हजार ४९ प्रयोगशाळा कोविडच्या चाचण्या घेत आहेत यात सातशे ६१ सरकारी तर
२८८ खाजगी प्रयोगशाळा आहेत. कोविड रोग्यांच्या परीक्षणातही गती येत असून गेल्या २४
तासात दोन लाख दहा हजार नमुन्याची चाचणी घेण्यात
आली तर देशात आतापर्यंत ८६ लाखाहून अधिक कोविड नमुन्याचं परीक्षण करण्यात आलं असल्याचं
मंत्रालयान म्हटलं
आहे.
****
औरंगाबाद शहरात दोन कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू
झाला आहे. यामध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५८ वर्षीय पुरुषाचा तर
जुना बाजार भागातल्या एका ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या संसर्गामुळे
२५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची
संख्या पाच हजार ५३५ झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी २५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले. यामध्ये औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या १९१ तर ग्रामीण भागातल्या ६१ रूग्णांचा
समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातले दोन हजार ६६९ कोरोना विषाणू
बाधित रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले.
यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या
११५झाली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात आज एकूण १७ नवे कोरोना बाधित रूग्ण
आढळले. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या वाढत चालली असून उत्तर
सोलापूर तालुक्यात तिऱ्हे, मार्डी, पाकणी, बाणेगाव, या ठिकाणी कोरोना विषाणूचे रूग्ण
आढळले आहेत. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातल्या जेऊरवाडी आणि बोरगाव इथंही आज नव्यानं
कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ३६१ झाली
आहे. सध्या रुग्णालयात २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांचा
मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले.
जिल्हातल्या एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता ४४१ झाली आहे. आतापर्यंत १४ जण
या आजारानं मरण पावले असून सध्या १२० रुग्णावर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
*****
उद्या
साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या संतांच्या पालख्यांनी
आज विविध ठिकाणांहून पंढरपुराकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराजांच्या
पालख्यांनी आज पुणे जिल्ह्यातून अनुक्रमे आळंदी आणि देहू इथून प्रस्थान केलं. टाळ मृदुंगाच्या
गजरात मात्र मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत या पालख्या बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ
झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
संत निवृत्तीनाथांची
पालखी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून आज सकाळी शिवशाही बसने रवाना झाली. टाळ
मृदूंगाच्या तालात हरिनामाचा जयघोष करत वीस वारकरी आणि निवृत्तीनाथ देवस्थानचे विश्वस्त
या वारीत सहभागी झाले आहेत.
रुक्मिणी
देवीची पालखी अमरावती जिल्ह्यातल्या कौंडिण्यपुरातून पंढरपूरकडे आज रवाना झाली. महिला
आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्य हस्ते यावेळी पालखीचं पूजन करण्यात आलं.
या पालखीला ४२५ वर्षांची परंपरा आहे.
पैठण
इथून संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांची पालखी आज एस टी महामंडळाच्या वातानुकूलित
बसमधून पंढरपूरकडे रवाना झाली. गेल्या दोन तारखेला प्रस्थान केल्यानंतर नाथ महाराजांची
पालखी पैठण इथं नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात विसावा घेत होती. प्रशासनाच्या निर्देशानुसार
फक्त २० वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून या बसमध्ये प्रवेश देण्यात आला. शासकीय अधिकारी
एस. एन. लाड आणि वायरलेस संचासह पोलीस कर्मचारीही या वारकऱ्यांसोबत राहणार आहेत, अशी
माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
दरम्यान,
उद्या पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी
ठाकरे यांच्या हस्ते विट्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
****
संपूर्ण
वीज देयक एकरकमी भरल्यास, राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार असल्याचं, ऊर्जा
मंत्री नीतीन राऊत यांनी जाहीर केलं आहे. ते आज वीज देयकासंदर्भात पत्रकार परिषदेत
बोलत होते. टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता, सरासरी वीज वापराच्या आधारे वीज
देयकं देण्यात आली होती, मात्र जे लोक घरांना कुलूप लावून गावी गेले होते, त्यांच्या
घरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केल जाईल, असं राऊत यांनी सांगितलं.
वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी
नमूद केलं.
****
माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो ॲपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एका ट्वीटद्वारे
त्यांनी ही मागणी केली आहे. नागरिकांच्या खासगी बाबींच्या सुरक्षेसाठी ५९ चिनी ॲपवर
बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, असं सांगत चव्हाण यांनी, नमो ॲपमधले २२ मुद्दे नागरिकांच्या
खासगी बाबी उघड करत असल्याचं या ट्वीटमध्ये नमूद केलं, असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
शिवसेना सदैव कोविड
रुग्णांवर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचं, औरंगाबाद
इथल्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास
दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ यांनी आज औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांची भेट घेतली, त्यावेळी झालेल्या
चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कोवीड संबंधित घाटीतील सर्व यंत्रणा, खाटांची
स्थिती, घाटीतील सर्व औषधांची स्थिती याविषयी त्यांनी आढावा घेतला. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून सर्व डॉक्टर,परिचारिका
तसंच इतर कर्मचारी करत असलेल्या परिश्रमाला तोड नसून या सर्वांचं मनोधर्य उंचावणे आवश्यक
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारच्या दुसऱ्या
कार्यकाळातल्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज लातूर इथं
व्हर्च्युअल रॅली आभासी सभा घेण्यात आली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या सभेला
संबोधित करताना, केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. रेल्वे बोगी प्रकल्पावर
आधारीत उद्योग याच भागात व्हावेत यासाठी रेल्वेमंत्री आणि इतर संबंधिताकडे आग्रह धरू असं आश्वासन दिलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शाखेला अन्न धान्याच्या वीस
पाकिटं प्राप्त झाले आहेत. अखिल भारतीय ग्राहक
पंचायत चे देवगिरी प्रांत अध्यक्ष तसंच राज्य अन्न सुरक्षा समितीचे सदस्य संपतराव जळके
यांच्या प्रयत्नातून हे साहित्य जमा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात ग्रामीण पेालिसांनी आज एक बालविवाह रोखला. वैजापूर तालुक्यातल्या करंजगाव
इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक
अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे पोलीस उप निरीक्षक अशोक जावळे यांनी
अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन, त्यांचं समुपदेशन केलं.
बालविवाहाला
प्रोत्साहन देणाऱ्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद
आहे. पालकांनी अल्पवयीन मुलींचा विवाह न करता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित
करण्याचं आवाहन औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
*****
No comments:
Post a Comment