Sunday, 28 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.06.2020 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
                                     आकाशवाणी औरंगाबाद             
प्रादेशिक बातम्या
दिनांक जून २०२० सकाळी ७.१० मि.
****

Ø  बँक नियमन दुरुस्ती अध्यादेश २०२०ला राष्ट्रपतींची मंजुरी; नागरी आणि बहुराज्यीय सहकारी बॅंका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित
Ø  लडाखमधील गलवान खोऱ्यातल्या घटनेला, संरक्षण मंत्र्यांचं अपयश ठरवता येणार नाही- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
Ø  राज्यात काल सर्वाधिक पाच हजार ३१८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, तर १६७ रुग्णांचा मृत्यू.
Ø  औरंगाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू तर २४४ नवे बाधित रुग्ण
Ø  नांदेडमध्ये आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोना विषाणूची लागण; लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि परभणतीत रुग्णांच्या संख्येत वाढ
 आणि
Ø  उस्मानाबाद जिल्ह्यात साडे नऊ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल बँक नियमन दुरुस्ती अध्यादेश २०२० लागू केला. यामुळे नागरी  आणि बहुराज्यीय सहकारी बॅंका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित आल्या आहेत. खातेधारकांच्या हितांचं रक्षण आणि सहकारी बँकांच्या प्रशासनामध्ये सुधारणा करण्याच्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश आहे. सहकारी बँकांसदर्भात रिझर्व बँकेच्या सध्याच्या अधिकारांचा विस्तारही याद्वारे करण्यात आला आहे.  
****

 भारतीय हद्दीत चीनच्या आक्रमणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करावा अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. सरकारनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा मुद्दा सोडवण्यासाठी त्वरित आणि कडक कृती करावी, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. ते दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधानांनी या मुद्यावर देशवासीयांना संबोधित करावं आणि भारतीय भूभाग बळकवणाऱ्या कोणालाही हुसकावून लावण्यात येईल असा विश्र्वास द्यावा, असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
****

 लडाखमधील गलवान खोऱ्यात गस्त घालताना भारतीय सैनिक सतर्क होते, चीननं चिथावणी दिल्यानं तिथं घडलेल्या घटनेला, संरक्षण मंत्र्यांचं अपयश ठरवता येणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, हे लक्षात घेत, १९६२च्या युद्धानंतर चीननं भारताचा ४५ हजार चौरस किलोमीटर भूभाग बळकवल्याचा विसर पडता कामा नये, असं पवार यांनी नमूद केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावरच्या प्रश्नाला उत्तर देताना, ज्याला जनतेनं बाजूला केलं, त्या व्यक्तीच्या विधानाची दखल कशाला घ्यायची, असं पवार म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेली विधानंही पवार यांनी फेटाळून लावली.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाची सशस्त्र दलं देशाचं संरक्षण करण्याची तसंच देश सुरक्षित ठेवण्याची क्षमता बाळगून असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज एका पत्रकार परिषदेत हे नमूद केलं.
****

      राज्यात कोविड प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक काल राज्यात दाखल झालं, या पथकानं काल ठाणे जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेतला, आणि स्थानिक प्रशासनाला कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यावर लक्ष देण्याच्या तसंच तपासण्यांचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना केल्या. या पथकात आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल, नागरी विकास विभागाचे सहसचिव कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकानं काल ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथल्या काही प्रतिबंधित भागांसह कोविड सुश्रुषा केंद्र तसंच कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
****

      गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घरगुती कामगार आणि वाहनचालकांना शासनानं प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी स्थानिक पातळीवर शासन निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या तक्रारी सभासदांकडून प्राप्त होत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या संस्थांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं तसंच शासन नियमांच्या विपरीत नियम तयार करू नयेत अशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी केल्या आहेत.
****
      
      राज्यात काल सर्वाधिक पाच हजार ३१८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ५९ हजार १३३ इतकी झाली आहे. काल १६७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या आजारानं आतापर्यंत सात हजार २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार हजार ४३० रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ८४ हजार २४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात  ६७ हजार ६००  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये भोईवाडा, बजाजनगर, इथल्या प्रत्येकी एक तर संजय नगर बायजीपुरा इथले दोन रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

      दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २४४ बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या चार हजार ७६६ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत दोन हजार ४४६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या दोन हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****

      नांदेडचे काँग्रेस पक्षाचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य बाधितांच्या संपर्कातून त्यांना या विषाणूची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आलं.

      दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. विष्णूपूरी इथं नऊ, नांदेड शहरातल्या कुबा मशिद इथं तीन, पिरबुऱ्हान नगर, चैतन्य नगर, गवळीपुरा, आणि देगलूर तालुक्यातल्या बळगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३६५ झाली आहे. तर या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सोळा आहे. नांदेड जिल्ह्यात काल पाच रूग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २७५ रूग्ण बरे झाले असून, सध्या ७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

      दरम्यान, लंगर साहेब गुरुद्वारा परिसरात आता कोणीही विषाणू बाधित नसल्यामुळे या भागातली प्रतिबंधीत क्षेत्राची बंधनं काल मागे घेण्यात आली. उद्या सोमवारपासून गुरुद्वारा सचखंड मंडळाचं कार्यालय शासकीय नियमांचं पालन करून सुरू होणार असल्याचं गुरुद्वारा प्रशासनानं सांगितलं.
****

      लातूर जिल्ह्यात काल आणखी २९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर महानगरपालिका क्षेत्रातले सात, औसा तालुक्यातले नऊ, अहमदपूर तालुक्यातले सात आणि उदगीर इथले चार रुग्ण आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३०९ झाली आहे. 

      दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १९७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये तुळजापूर तालुक्यातले चार, उस्मानाबाद दोन, तर उमरगा आणि वाशी इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २०६ झाली आहे. त्यापैकी १५९ जण बरे झाले असून, सध्या ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

 जालना जिल्ह्यात काल आणखी १५ रूग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण  रूग्णांची संख्या ४६२ झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातल्या टेभुर्णी इथले १३ तर जालना शहरातल्या बगडीयानगर आणि  बागवान मशीदी जवळील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****

      हिंगोली जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. हे दोन रुग्ण मुंबईहून औंढा इथं आले होते. तर जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २६१ झाली असून, त्यापैकी २३४ जण बरे झाले असून, सध्या २७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

      दरम्यान, कळमनुरी शहरात रुग्णांची संख्या वाढत असून उद्यापासून ते तीन जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कळमनुरीची संपूर्ण बाजारपेठ पाच दिवस बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश जारी केले.
****

      परभणी शहरात काल एका डॉक्टरला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. ते पुण्याहून आले होते. त्यामुळे परभणी जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १०५ झाली आहे. यापैकी ९० रुग्ण बरे झाले असून, सध्या ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****

      ठाणे इथल्या भाजपच्या एका नगरसेवकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या चाळीस वर्षीय नगरसेवकावर मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****

      नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा, पेठ, देवळा आणि कळवण तालुक्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ५५४ रुग्णांना लागण झाली आहे. यापैकी १ हजार ९११ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून, एक हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण  २१३ जण या विषाणू संसर्गामुळे मरण पावले असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****

      पुणे जिल्ह्यात काल ९९६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. पालघर जिल्ह्यात ४५०, रायगड जिल्ह्यात २००,सातारा १९, सांगली आठ, सिंधुदुर्ग ११, तर बुलडाणा जिल्ह्यात काल आणखी १५ रुग्ण आढळले. भंडारा जिल्ह्यात काल सात रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष अधिकारी का नियुक्त केलेला नाही, असा सवाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यात असा अधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या वेळी औरंगाबादकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन दिलं होतं, नंतर ती जबाबदारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली, मात्र औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी अद्याप कोणीही आलेलं नाही, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये दाखल कोविडग्रस्तांना बाहेरून औषध आणायला सांगितलं जात असल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे. याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात एक समिती स्थापन करून चौकशी आणि त्यानंतर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असं येळीकर यांनी म्हटलं आहे.
****

 खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोवीड - १९च्या  रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट करावं आणि या योजनेची आर्थिक मर्यादा दीड लाख रुपये करावी अशी मागणी राज्य सभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. टाळेबंदीमुळे अनेक व्यवहार बंद असून, अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थितीही खालावलेली आहे. अशात खासगी रुग्णालयांचं शुल्क भरणं शक्य होत नसल्यानं या रुग्णांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळावा, असं कराड यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****

 खाजगी कोवीड रूग्णालयात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने मदत कक्षाची स्थापना केली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ठरवून दिलेल्या मानकानुसार कमलनयन बजाज, डॉ. हेडगेवार, एम.जी.एम., आणि सेठ नंदलाल धूत रुग्णालय या चार खाजगी रुग्णालयांना समर्पित कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केलं आहे. या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्याकरता मदत कक्ष स्थापन करण्यासाठी महसूल यंत्रणेततले अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 शहरालगत नक्षत्रवाडी इथल्या छत्रपती शाहू महाविद्यालयात उद्यापासून महानगरपालिकेचं नवीन कोविड केयर सेंटर सुरु होणार आहे. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, डॉक्टर वंदना तिखे यांनी या रुग्णालयाची काल पाहणी केली. या रुग्णालयात ६९ खाटा असून, १० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे.
****

 पेट्रोलच्या दरात काल लीटरमागे २५ पैसे, तर डिझेलच्या दरात लीटरमागे २१ पैशांची वाढ झाली. सात जूनपासून हे दर सातत्यानं वाढत आहेत. सात जूनच्या आधी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ८२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कसलीही वाढ केली गेली नव्हती.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ६६ वा भाग आहे. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद हा पंतप्रधानांच्या संवादानंतर लगेचच आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारीत होईल, त्यानंतर रात्री आठ वाजता त्याचं पुनःप्रसारण होईल.
*****

      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमांचं शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल दिली. यासंदर्भात राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये तसा ठराव करण्यात आल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधल्या तिसऱ्या, पाचव्या  आणि सातव्या सत्राचं शैक्षणिक शुल्क एक रकमी न भरता तीन हप्त्यात सत्र समाप्ती परिक्षेपूर्वी भरायची सवलत दिली आहे.
****

 सदोष बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. ते काल अमरावतीत चांदूर बाजार इथं कृषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते. सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यावर संबंधित कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही तर कृषी विभागानं त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश कडू यांनी दिले.
****

      उस्मानाबाद जिल्ह्यात साडे नऊ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबवण्यात येत असलेल्या दोन योजनातल्या चार कंत्राटात साहित्य पुरवठा केल्याचं भासवून बनावट डिलिव्हरी चलनाद्वारे हा अपहार करण्यात आला. याप्रकरणी नायब तहसिलदार संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आध्या एंटरप्रायजेसचे राजेंद्र गायकवाड, तत्कालिन प्रशासन अधिकारी अभय मस्के यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला.
****

 बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं.

      परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरासह तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, तसंच लहान ओढे भरून वाहू लागले.

      हिंगोली जिल्ह्यातल्या मन्नास पिंपरी इथंही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. परिसरातल्या दोन्ही नद्यांना पूर आला. दरम्यान, औरंगाबाद शहरातही काल दुपारनंतर तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

      नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी नायगाव, नरसी, मांजरम, कासरखेडा या महसुल मंडळात जोरदार पाऊस झाला.

      बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या जनुना इथं अंगावर वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली आहे.
****

 परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फौंडेशनच्या वतीनं काल शेतकऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आलं. ऊस बेणे निवड, ऊस आंतर पिक, ऊस बेणे प्रक्रिया, एकात्मिक खत व्यवस्थापन, सेंद्रीय खते, रासायनिक खते, ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते, पाणी व्यवस्थापन आदी विषयांवर विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्यासह इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****

 अकोला ते पूर्णा या २१० किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम वेगानं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोला ते शिवनी शिवापुर रेल्वेस्थानकापर्यंत विद्युत खांब उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
****

 परभणी जिल्ह्यात तहसिल कार्यालयामार्फत जप्त केलेली अवैध रेती घरकुल योजनेच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. जिल्ह्यातले रेती धक्के सुरू न झाल्यानं ग्रामीण आणि शहरी भागात विविध शासकीय योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेसाठी रेती उपलब्ध होत नसल्यानं ही बांधकामं बंद आहेत, त्यामुळे ही जप्त केलेली रेती द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या माखणी इथल्या स्वस्त धान्य दुकानावर  लाभधारकांना प्रतिव्यक्ती किलोप्रमाणे कमी धान्य देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
****

 गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या साकुरी इथले सैनिक हुतात्मा सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकुरी इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्यदलाकडून यावेळी मोरे यांना मानवंदना देण्यात आली. गलवान इथं नदीमध्ये बुडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं.
****

      सातारा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांनी निवड झाली आहे. संस्थेच्या सचिवपदी डॉ. विठ्ठल शिवणकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री चौगुले, चेतन तुपे यांची निवड झाली.
****

 सोलापूर इथं युवा पँथरच्या कार्यकर्त्यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज्यात अनुसूचित जातींतील घटकांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.

 दरम्यान, काश्मीरमध्ये पुलवामा इथं दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले सुनील काळे यांच्या एका वारसाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. बार्शी तालुक्यातल्या पानगाव इथं काल देशमुख, टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं, त्यावेळी देशमुख यांनी ही घोषणा केली.
****

 परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एक जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत मिळावी, बँकांनी पीक कर्ज द्यावं, सोयाबिन बियाणे उगवण न झाल्याची चौकशी करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
****

      कोरोना विषाणूसंदर्भात चुकीचं वृत्त प्रसारित करुन प्रशासनाची बदनामी केल्याबद्दल औरंगाबाद इथल्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्राचे संपादक, प्रशासक आणि संबंधित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू मुळे होणारे मृत्यू, प्रशासनाचं कामकाज यासंबंधी २४ आणि २५ जून रोजी या वृत्तपत्रामध्ये बातम्या छापून आल्या होत्या. या बातम्यांमुळे जनतेत प्रशासनाविषयी संभ्रम निर्माण झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
*****

No comments: