आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२5 जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
तब्बल २३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ४ हजार २६६ झाली आहे. आज सकाळी आढळून आलेल्या २३० रुग्णांमध्ये औरंगाबाद
मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रुग्ण १२४ आणि ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण १०६ आहेत.
यामध्ये ७७ महिला आणि १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादमधील एकूण रुग्णांपैकी
२ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून २१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं
आता १ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना इथं आज सकाळी ९ जणांचा
अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामुळे जालना इथली रुग्णसंख्या ४०७ झाली असून यापैकी
१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २७७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
****
औरंगाबाद शहर परिसरात काल
रात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. पहाटेपर्यंत चाललेल्या या पावसामुळे शहरातल्या सखल भागात
पाणी साचलं. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. काळा दरवाजा
एका घराजवळची भिंतही कोसळली.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर
तालुक्यात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. या
भागातल्या शेतांमध्ये पाणी साचलं असून पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे तर
जालना-अंबड मार्गावरील पारनदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. या नदीवरील पुलाचे काम सध्या
सुरु आहे. त्यामुळे वाहनांसाठी केलेला वळण रस्ता खचला असून यामार्गावरील वाहतूकही काही
काळ बंद होती.
****
नांदेड जिल्ह्यात ८० महसूल
मंडळापैकी ११ महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. या पावसामुळे त्या भागातले शेतकरी
समाधान व्यक्त करत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ते आज वैजापूर तालुक्यात हणमंतगाव
आणि महालगावला भेट देऊन विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत.
****
No comments:
Post a Comment