Tuesday, 23 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.06.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  सर्व राज्यांतल्या कोविड रुग्णालयांना ५० हजार व्हेंटिलेटर्ससाठी पीएम केअर्स निधीतून २ हजार कोटी रुपये वितरित
Ø  केंद्र सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजचा गोरगरीब जनतेला  फायदा नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
Ø  राज्य सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढ्यात महानगरपालिकांना मदत करावी - देवेंद्र फडणवीस यांची मागणी
Ø  कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी भारतातून हज यात्रेसाठी भाविक जाणार नाहीत
Ø  औरंगाबाद इथं तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू; जिल्ह्याची रुग्णसंख्या ३ हजार ८१९
आणि
Ø  हिंगोलीत ८, नांदेड ४ तर परभणीत कोविड बाधेचे दोन नवे रुग्ण
****

 सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड रुग्णालयांना भारतीय बनावटीची ५० हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यासाठी पीएम केअर्स निधीतून २ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर तयार झाले असून, एक हजार तीनशे पेक्षा अधिक व्हँटिलेटर्स महाराष्ट्रासह सहा राज्यांना पुरवण्यात आले आहेत. या महिनाअखेरपर्यंत आणखी १४ हजार व्हँटिलेटर्स या राज्यांना पुरवण्यात येणार आहेत. स्थलांतरित कामगारांसाठी राज्यांना एक हजार कोटी रुपये देण्यात आले असून, यापैकी महाराष्ट्राला १८१ कोटी रुपये निधी दिला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजचा गोरगरीब जनतेला काहीही फायदा होत नसल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मांडला तसंच टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत करण्याची मागणी केली, असंही पवार यांनी सांगितलं. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावं, यासाठी सरकारनं बँकांना हमी दिली असल्याची माहिती पवार यांनी दिली.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. कोविड काळात राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं बाधित, उपेक्षित घटक आणि आरोग्यसेवकांसाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. स्वयंसेवी संस्था म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचं यापुढेही मदतकार्य सुरु राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गाचं संकट खूप मोठं असल्यामुळे अधिक काम करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी ट्रस्टला अर्थसहाय्य करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****

 टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेला जुलै ते सप्टेंबर पर्यंत अशी आणखी तीन महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या संदर्भात चर्चा करावी यासाठी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ आणि प्रतीशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे.
****

 राज्य सरकारनं महानगरपालिकांना कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई महापालिका वगळता, इतर महापालिकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळे कोविडग्रस्तांवर उपचारासाठी महापालिकांना आर्थिक मदत करणं, गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले. प्रशासन विविध उपाययोजनांचा प्रभावी वापर करत आहेत, मात्र खासगी रुग्णालयांचा पुरेसा वापर होतो की नाही, याची पडताळणी होत नसल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.

 दरम्यान, टाळेबंदीच्या काळात वीज ग्राहकांना वाढीव वीज देयकं पाठवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. टाळेबंदीच्या कालावधीत वीज वितरण कंपन्यांना मीटर रिडिंग करणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यांनी ग्राहकांकडून जास्तीचं देयक वसूल केलं, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे. टाळेबंदीमुळं अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून अनेकांना वेतन कपातीचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ग्राहक मोठ्या रकमेची वीज बिलं एकदम भरू शकणार नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****

 महाराष्ट्रात सध्या १०३ प्रयोगशाळांमधून कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचण्या केल्या जात आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यापैकी साठ प्रयोगशाळा सरकारी तर ४३ प्रयोगशाळा खासगी असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात या प्रयोगशाळांची संख्या ९९२ झाली आहे. यापैकी ७२६ सरकारी तर २६६ खासगी प्रयोगशाळा आहेत.
*****

 कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी भारतातून हज यात्रेसाठी भाविक जाणार नाहीत, केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ही माहिती दिली. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी आपल्याला दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत या वर्षी हज यात्रेकरूंना पाठवू नये, असं सुचवल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा हज यात्रेसाठी एकूण दोन लाख १३ हजार अर्ज आले होते. यात्रेची संपूर्ण रक्कम कपात न करता यात्रेकरूना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही नक्वी यांनी सांगितलं.
****

 वीज महानिर्मिती कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यास, कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.             महानिर्मितीमध्ये विविध कंत्राटदारामार्फत बाह्यस्त्रोताव्दारे कार्यरत असणारे कंत्राटी कामगार तसेच सुरक्षारक्षक यांचा मृत्यू या आजारामुळे झाल्यास त्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे अनुदान सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचे  राऊत यांनी सांगितलं.
****

 औरंगाबाद इथं आज तीन वृद्ध पुरुषांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातल्या पीरबाजार इथल्या ८६ वर्षीय, वैजापूर तालुक्यातल्या वंजारगाव इथल्या ६६ वर्षीय वृद्धाचा तर फुलंब्री तालुक्यातल्या ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे तीव्र श्वसन विकार आणि न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं घाटी रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. जिल्ह्यात कोविड-१९ संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता २०६ झाली आहे.

 दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज १६३ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या तीन हजार ८१९ झाली आहे. आज आढळलेल्या १६३ रुग्णांपैकी ११२ रुग्ण महापालिका क्षेत्रातले तर ५१ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. यापैकी दोन हजार ४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एक हजार ५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यात ८ नवीन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वसमत तालुक्यात चंदगव्हाण गावातल्या एका ३८ वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. हा पुरुष औरंगाबादहून गावात परतला आहे. तर कळमनुरी तालुक्यात ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यातल्या ५ व्यक्ती कवडा गावातल्या असून सर्व पुरूष आहेत. हे सर्वजण मुंबईहून गावाकडे परतले आहेत. तर २ किशोरवयीन मुले गुंडलवाडी गावातले रहिवासी असून त्यांचं कुटुंब ठाणे इथून गावी परतलं आहे. हे सर्वजण विलगीकरण कक्षात  दाखल आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधितांची एकूण संख्या आता २४८ वर पोहचली आहे. त्यापैकी २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
****

 नांदेड जिल्ह्यात आज नव्याने ४ कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ३२१ झाली आहे. जिल्ह्यात आज ७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण २४५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण १४ रुग्ण मृत्यू पावले आहेत तर सध्या नांदेड जिल्हयात ६२ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
****

 परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना विषाणू बाधित आढळल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ९८ झाली आहे.

 दरम्यान, सेलू शहरातला हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केला आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यात आज अकरा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर अमरावतीमध्ये आज नवीन पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.
****

 हिंगोली जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली. संघटनेच्या वतीनं वसमत, सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणं न उगवल्यानं निवेदनं देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयातल्या साहित्याची नासधूस केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. ते आज सांगली इथं क़ृषी आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आत्तापर्यंत खरीप हंगामातील ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी सांगितलं.
*****

No comments: