Tuesday, 30 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२० दुपारी १.०० वा.

****

देशातला कोविड रूग्णांचा बरे होण्याचा दर ५९ पूर्णांक शून्य सहा शतांश टक्यांवर पोहोचला असून आतापर्यंत तीन लाख ३४ हजार ८२२ लोक कोरोना संक्रमणातून पूर्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात १३ हजार ९९ लोक या आजारानं बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १८ हजार ५२२ नव्या कोविड रूग्णांची नोंद झाली असून आता देशातली एकूण कोविड रूग्णांची संख्या पाच लाख ६६ हजार ८४० झाली आहे. गेल्या २४ तासात ४१८ जण या आजारानं मरण पावले असून एकूण मृतांची संख्या १६ हजार ८९३ झाली असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या पाच हजार ५३५ झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी २५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या १९१ तर ग्रामीण भागातल्या ६१ रूग्णांचा समावेश आहे. शहरात काल एका खाजगी रुग्णालयात एका ५८ वर्षीय पुरुषाचा तर जुना बाजार भागातल्या एका ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात २५९जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ६६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात आज तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले. यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ११५ झाली आहे.

****

जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात १७० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात जळगाव शहरातले २३, तर जिल्ह्यातल्या तालुक्यासह ग्रामीण भागातल्या १४७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या तीन हजार ४३८ झाली आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत १९ ने भर पडली असून आता जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ५९९ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी दापोली तालुक्यातल्या आडे या एकाच गावातले १० जण असून आणखी ६ जण दापोली तालुक्यातले आहेत, इतर तीन जण रत्नागिरी तालुक्यातले आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ४३७ असून पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये १२५ जण उपचार घेत आहेत

****

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची टीका, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. ते उस्मानाबाद इथं बोलत होते. रुग्णांसाठी सोयीसुविधा, पुरेशा खाटा आणि रुग्णवाहिका पुरवण्या ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनता, मजूर आणि गोरगरिबांवर अन्याय केल्याची टीका भोसले यांनी केली.

****

आषाढी एकादशीचा उत्सव उद्या साजरा होत आहे. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फक्त मानाच्या पालख्यांना आणि मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते उद्या पहाटे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.

****

राज्यात “शिवभोजन” योजनेअंतर्गत २६ जानेवारी पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झालं आहे. गरीब जनतेसाठी ही योजना वरदान ठरत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यात शिवभोजन योजनेची ८४८ केंद्रं कार्यरत असून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर टाळेबंदीच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे या योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्यानं मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार दिल्याने, मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचं सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याबद्दल सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचं, तसंच शिवभोजन केंद्राच्या चालकांचं कौतुक केलं आहे.

****

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं मुंबईतल्या डबेवाल्यांच्या कुटुंबियांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. १०० डबेवाल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी १० किलो जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

****

पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमध्ये नौगाव सेक्टरमध्ये गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. उखळी तोफांसह इतर शस्त्रांच्या सहाय्याने पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचं, सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली

****

No comments: