Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
देशभरातल्या सहकारी बँका रिजर्व्ह
बँकेच्या अधीन आणण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कर्जाच्या व्याजदरात दोन
टक्के सूट
Ø
आयसीएसई मंडळाला दहावी बारावीच्या
प्रलंबित परीक्षा घेण्याची परवानगी नाही -राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती
Ø
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या
तीन हजार नऊशे एकसष्ट
आणि
Ø
कोविड प्रतिबंधाबाबत मुख्यमंत्री,
मंत्री आणि प्रशासनात समन्वय नाही - देवेंद्र फडणवीस यांची टीका
****
देशभरातल्या सहकारी बँका रिजर्व्ह
बँकेच्या अधीन आणण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली असल्याची
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल. देशभरातल्या दीड हजारावर सहकारी बँकांमध्ये
साडेआठ कोटींहून अधिक खातेदार असून, सुमारे ४ लाख ८४ हजार कोटींपर्यंत या खात्यांची
उलाढाल आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खातेदारांचा विश्वास वाढेल आणि त्यांचे
पैसे सुरक्षित राहतील असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.
मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या
शिशु कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज
घेतला. ५० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा या श्रेणीत अंतर्भाव होतो. एक जून २०२० ते
३१ मे २०२१ दरम्यान ही सूट लागू राहणार आहे. इतर मागासवर्गीय आयोगाला ३१ जानेवारी २०२१
पर्यंत मुदतवाढ, पशूधन विकासासाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद, आदी निर्णयांनाही
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
अंतराळ क्षेत्रात खासगी भागीदारी
वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय अणूऊर्जा मंत्री जीतेंद्र सिंह
यांनी ही माहिती दिली. अंतराळ तंत्रज्ञानाचा सामाजिक तसंच आर्थिक विकासासाठी योग्य
वापर करण्यासाठी राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकार केंद्राची स्थापना करण्याचा
निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला आहे.
****
भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा
- आयसीएसई मंडळाला दहावी बारावीच्या प्रलंबित परीक्षा घेण्याची परवानगी देऊ शकत नाही,
असं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे. या संदर्भात न्यायालयात दाखल
एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, राज्यसरकारकडून महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही
भूमिका स्पष्ट केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विद्यापीठांच्या
परीक्षाही रद्द केल्या असल्याची माहितीही कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. राज्याच्या
आपत्ती व्यवस्थापन विभागाने काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत
आयसीएसई मंडळाला परीक्षा घेण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे. मंडळानं येत्या २ जुलैपासून दहावी तसंच बारावीच्या प्रलंबित परीक्षा
घेण्याचं नियोजन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी एकशे पंचवीस कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार नऊशे एकसष्ट झाली
आहे. यापैकी दोन हजार एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एक हजार सहाशे एकोणीस रुग्णांवर
रुग्णालयांत उपचार सुरू आहे. तर दोनशे सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं
प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज पाच कोरोनाविषाणू
बाधीत रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या तीनशे सव्वीस
झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ रुणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून, २४५ रुग्ण
बरे झाले आहेत. सध्या ६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात आजपर्यंत नव्वद कोरोना विषाणू बाधित
रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या पाच बाधित रुग्ण
उपचार घेत असून आतापर्यंत तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज २४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण
सापडले, यामुळे जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या ३२८ इतकी झाली आहे. यापैकी २५४
रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ६२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती नोडल अधिकारी
डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
****
वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत १२५ विमानांद्वारे
१९ हजार ६०४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी सात हजार दोनशे अठरा प्रवासी मुंबईतले
तर सहा हजार सहाशे एक्याऐंशी प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातले आहेत तर इतर राज्यातील
प्रवाशांची संख्या ५ हजार ७०५ इतकी आहे. १ जुलै पर्यंत आणखी ४५ विमानांमधून प्रवासी
मुंबईत येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
*****
राज्यात कोरोना संसर्गामुळे निधन
झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ५१ झाली आहे. यामध्ये मुंबईतल्या ३४ पोलीस कर्मचारी
तसंच दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजारावर पोलीस अधिकारी
कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. यापैकी तीन हजार रुग्ण बरे होऊन
घरी परतले आहेत. सध्या ९९८ पोलिसांवर राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
असून, यापैकी १०४ पोलीस अधिकारी असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविडग्रस्तांचा वाढता मृत्यूदर
ही चिंतेची बाब असून, कोविड प्रतिबंधाबाबत मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासन यांच्यात
समन्वय नसल्याची टीका विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ते आज सोलापूर इथं कोविडग्रस्तांचे उपचार आणि अन्य स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी
बोलत होते. मंत्रिमंडळाव्यतिरिक्त अन्य लोकप्रतिनिधींना कोविड प्रतिबंधाच्या युद्धात
विचारात घेतलं जात नसल्याचं, फडणवीस यांनी नमूद केलं.
खासगी दवाखान्यांमध्ये कोविड
ग्रस्तांवरच्या उपचाराच्या कमाल शुल्काच्या नियमाचं पालन होत नाही. वैद्यकीय साधनांचे
भरमसाठ शुल्क आकारलं जात असल्यानं मध्यमवर्गीयांना त्रास होत असल्याकडे फडणवीस यांनी
लक्ष वेधलं. अशा प्रकारे वाढीव शुल्क घेण्याच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू
करावी, महात्मा फुले जनारोग्य योजनेत फक्त गंभीर रुग्णांवर मोफत उपचार होतात, सामान्य
रुग्णांना त्याचा लाभ होत नाही, ही विसंगती दूर करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांचं
महसुलातून होणारं उत्पन्न थांबलेलं असल्यानं, कोविडग्रस्तांवर उपचारासाठीचा निधी ४८
तासांत मिळावा, बनावट बियाणांसंदर्भातल्या कायद्याची सक्तीनं अंमलबजावणी करावी, आदी
मागण्या फडणवीस यांनी मांडल्या. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका आक्षेपार्ह विधानाबाबत
विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, सगळ्याच पक्षातल्या नेत्यांनी दुसऱ्या
पक्षातल्या नेत्यांबद्दल बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत, असं मत व्यक्त केलं.
****
परभणी जिल्ह्यात पुर्णा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना
पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष
कदम यांच्या नेतृत्वात आज शहरातल्या सर्व बँकांसमोर आंदोलन करण्यात आलं.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात
पेरणीसाठी तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं, बँकेने कर्ज वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी
नियमानुसार दर्शनी भागावर स्केल ऑफ फायनान्सचा फलक लावावा इत्यादी मागण्या या निवेदनात
करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन
उगवले नसून असे बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात योग्य ती कारवाई केली
जाईल, तसंच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे पुरवली जातील, असं आश्वासन
आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी दिलं आहे. कल्याणकर यांनी आज नांदेड तालुक्यातल्या
राहठी शिवाराची पाहणी केली, त्यानंतर हे आश्वासन दिलं.
****
टाळेबंदीच्या काळातली जादा वीज देयकं आकारणी रद्द
करून वीज देयकं माफ करण्यात यावी यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अहमदनगर
जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात
आलं. महावितरणने चालू महिन्यात टाळेबंदीच्या काळातील रिडींग न घेता तीन महिन्याचे सरसकट
सरासरी वाढीव रकमेची वीज देयकं ग्राहकांना पाठवली असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात
आला आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला
अकरा विषयांमध्ये एमडी आणि एमएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भारतीय आर्युविज्ञान परिषद-एमसीआयने
मान्यता दिली आहे. ४६ विद्यार्थ्यांची प्रवेशमर्यादा असलेल्या या अभ्यासक्रमात जीवरसायन
शास्त्र, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, आदी उपचार
शास्त्राचा समावेश करण्यात आला आहे.
*****
No comments:
Post a Comment