Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26
June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षांचे निकाल १५
जुलैला जाहीर होणार आहेत. मंडळाकडून आज ही घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी
यापूर्वीच्या तीन परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर प्रलंबित
परीक्षेसाठी गुणांकन केलं जाणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना
श्रेणीसुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल, मात्र त्या
परीक्षेत मिळालेले गुण अंतिम असतील. दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र
पुनर्परीक्षेचा पर्याय नसेल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज स्वावलंबी उत्तरप्रदेश रोजगार अभियानाला प्रारंभ केला.
रोजगाराच्या अधिकाधिक संधी निमार्ण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक
संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. दूरदृष्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी उत्तर
प्रदेशातल्या सहा जिल्ह्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. सुविधा केंद्र तसंच
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे ग्रामस्थ या कार्यक्रमात सहभागी झाले.
****
राज्यात
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते आज एका वृत्तवाहिनीला
दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतल्या
काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी पक्षांचं पूर्ण सहकार्य असून,
कोविड विरुद्धच्या लढ्यात तीनही पक्ष एकजुटीने काम करत असल्याचं पवार यांनी नमूद
केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या सरकारवर आपला अंकुश असल्याच्या
आरोपांचं पवार यांनी खंडन करत, मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्रिमंडळातल्या त्यांचे
सहकारी राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या किमतीत आज अनुक्रमे २१ पैसे आणि १७ पैसे प्रतिलीटर वाढ झाली. गेल्या
वीस दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अवघ्या तीन
आठवड्यांच्या कालावधीत पेट्रोलचे दर लीटरमागे ८ रुपये ८७ पैसे तर डिझेलचे दर
लीटरमागे १० रुपये ८० पैशांनी वाढले आहेत.
****
देशात
आज १७ हजार २९६ नवे कोरोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळले त्यामुळे देशातल्या या
रुग्णांची संख्या आता ४ लाख नव्वद हजार चारशे एक झाली आहे. देशात कोरोना
विषाणुबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठावन्न पूर्णांक २४ शतांश टक्के एवढं
झालं आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत १५ हजार ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या
देशभरात एक लाख एकोण नव्वद हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य
विभागानं दिली आहे.
****
राज्यात
काल आणखी चार हजार ८४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी १९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४९२ झाली आहे. आज वाढलेल्या
रुग्णांपैकी १०२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
यापैकी २ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २३२ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार नऊशे ६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं
कळवलं आहे.
****
जालना
जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातली
एकूण बाधितांची संख्या आता ४२५ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या
दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यत २८७ रुग्ण
बरे झाले असून, सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यात काल रात्री विविध भागात जोरदार पाऊस झाला. आज सकाळी घेतलेल्या
नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी २८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातल्या
तीन मंडळांमध्ये तसचं सेनगाव तालुक्यात गोरेगाव आजेगाव तर औंढा तालुक्यात येहळेगाव
येळेगाव या परिसरात अतिवृष्टी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत
आहे. परभणी इथं जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी शाहू महाराजांच्या
प्रतिमेलापुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
No comments:
Post a Comment