Thursday, 25 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.06.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 June 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जून २०२० दुपारी १.०० वा.

****

देशातल्या कोविडग्रस्त रुग्णांचा बरे होण्याचा दर ५७ पूर्णांक ४३ शतांश टक्क्यांवर पोहोचला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात गेल्या चोवीस तासात १३ हजार १२ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत २ लाख ७१ हजार ६९७ एवढी झाली आहे.  देशात गेल्या २४ तासात १६ हजार ९२२ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून देशातल्या रुग्णसंख्येचा आकडा ४ लाख ७३ हजार १०५ झाला आहे. काल या आजारामुळे ४१८ लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात १४ हजार ८९४ व्यक्तींचा कोविड संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी तब्बल २३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४ हजार २६६ झाली आहे. आज सकाळी आढळून आलेल्या २३० रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेले रुग्ण १२४ आणि ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण १०६ आहेत. यामध्ये ७७ महिला आणि १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादमधील एकूण रुग्णांपैकी २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून २१८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता १ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना इथं आज सकाळी ९ जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामुळे जालना इथली रुग्णसंख्या ४०७ झाली असून यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २७७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणू संसर्गाचे १२ नवे रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे.

****

औरंगाबाद शहर परिसरात काल रात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. पहाटेपर्यंत चाललेल्या या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. काळा दरवाजा परिसरात एका घराजवळची भिंतही कोसळली.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. या भागातल्या शेतांमध्ये पाणी साचलं असून पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे तर जालना-अंबड मार्गावरील पारनदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. या नदीवरील पुलाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहनांसाठी केलेला वळण रस्ता खचला असून यामार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती.

****

नांदेड जिल्ह्यात ८० महसूल मंडळापैकी ११ महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. या पावसामुळे त्या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

मुंबईत आज बहारीन आणि कुवैत बँकेच्या इमारतीला आग लागली. नरीमन पॉईंट परिसरात असलेली ही संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाचे पाच बंब तसंच चार टँकर ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या इमारतीत कोणीही अडकलेलं किंवा जखमी झालेलं नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

१९७५ मध्ये देशात लागू केलेल्या आणीबाणीला आज ४५ वर्ष झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत केलेल्या एका ट्विटमध्ये राष्ट्रीय हिताकडे डोळेझाक करून देशावर आणीबाणी लादण्यात आली होती, संपूर्ण देशच तुरुंग झाला होता, पत्रकारिता-न्यायालयं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर अंकुश लावण्यात आला होता, असं म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत दिलेल्या ट्विट संदेशात, एका कुटुंबाला वाचवण्यासाठी आणीबाणी लावलेला काँग्रेस पक्ष आजही एका कुटुंबाला वाचवण्यासाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे.

****

नांदेड इथं वनविभागाच्या वतीनं वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत काल अटल आनंदवन घनवन, मियावाकी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश महाजन यांनी अटल आनंदवन घनवन वृक्षलागवडीचं तंत्रज्ञान समजाजून सांगितलं. मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून पर्यावरणालाही हातभार लावावा, तालुका पातळीवर बैठका घेऊन त्या-त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थांना यात सहभाग करुन घ्यावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केलं आहे.

****

भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात एका भारतीय सैनिकाला वीरमरण आलं. सचिन विक्रम मोरे असं या सैनिकाचं नाव असून, ते नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या साकुरी झाप इथले रहिवासी आहेत. गलवान नदीत वाहून जाणाऱ्या दोन सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: