Monday, 22 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  ओडिशातल्या पुरी इथं जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
Ø  कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्याशाखांच्या सामायिक प्रवेश परीक्षा तुर्तास स्थगित
Ø  औरंगाबाद जिल्ह्यात आज १०६ तर जालन्यात १७ नवे कोरोनाविषाणू बाधित रुग्ण
Ø  नांदेड इथं पाच कोविडग्रस्तांना रुग्णालयातून सुटी; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेही संसर्गमुक्त
आणि
Ø  शेतकरी कर्जमाफी तसंच पीक कर्जाच्या मागण्यांसाठी भाजपचं आज राज्यभरात आंदोलन
****

 ओडिशातल्या पुरी इथं जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. राज्य सरकार आणि जगन्नाथ देवस्थानाच्या सहकार्यातून नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन रथयात्रेचं आयोजन करता येऊ शकतं, असं केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं फक्त पुरी इथं यात्रेला परवानगी दिली आहे, अन्यत्र कोठेही जगन्नाथ यात्रा आयोजित करता येणार नाही. केंद्र सरकार, राज्यसरकार आणि जगन्नाथ देवस्थळाच्या मंडळानं सारासार विवेकाने यात्रेतल्या धार्मिक विधींचं सुक्ष्म नियोजन करावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. उद्या २३ तारखेपासून या रथयात्रेला प्रारंभ होणार आहे.
****

 उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या विविध विद्याशाखांच्या सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसंच पालकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं, सामंत यांनी सांगितलं. या सीईटीच्या तारखा नव्यानं जाहीर करण्यात येतील, असं सामंत यांनी स्पष्ट केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण १०६ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यापैकी १०४ रुग्ण सकाळच्या सत्रात तर चार रुग्ण दुपारच्या सत्रात आढळून आले. जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या ३ हजार ६३६ झाली आहे. यापैकी १ हजार ९६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू असून १९१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****

 जालना जिल्ह्यात आज १७ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ झाली आहे. आतापर्यंत ११ जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये टेंभूर्णी इथं ९, मंगल बाजार, वाल्मिक नगर इथं प्रत्येकी २, हाकिम मोहल्ला, नाथ बाबा गल्ली, राज्य राखीव पोलिस दल तसंच अंबड इथल्या एका रुग्णांचा समावेश आहे.
****

 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड इथल्या उप जिल्हा ग्रामीण रूग्णालय कोविड सुश्रुषा केंद्रातून आज पाच कोरोनाविषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानं घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत या रुग्णालयात २२ कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. नागेश लखमावार यांनी दिली आहे.
****

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गेल्या अकरा दिवसांपासून या रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेले मुंडे हे कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असल्याचं, दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुसऱ्या चाचणीतून स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर तसंच सुश्रुषा करणाऱ्या परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
****

 राज्य शासनानं चिनी कंपन्यांसोबत केलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या करारांना स्थगिती दिली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. या महिन्याच्या पंधरा तारखेला चीनमधल्या तीन कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले होते. भारत आणि चीन दरम्यान सीमेवर वाढता तणाव पाहता हा, हे करार स्थगित केलेले आहेत, मात्र ते रद्द केलेले नाहीत, असं देसाई यांनी स्पष्ट केलं. एकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून धोरण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे.
*****

शेतकरी कर्जमाफी आणि पीक कर्ज या दोन मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षानं आज राज्यभरात आंदोलन केलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून या आंदोलनाचं नेतृत्व केलं. मोसमी पाऊस दाखल झाला आहे, पेरण्या संपत आल्या आहेत, मात्र तरीही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं. प्रति हेक्टर २५ हजार ते ५० हजार रुपये भरपाई दिली जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येतं, प्रत्यक्षात मात्र काहीही मदत मिळालेली नसल्याचा दावा पाटील यांनी केला. ७० टक्के शेतकऱ्यांचं सुमारे ११ हजार कोटी रुपये कर्ज अजूनही थकीत असल्यानं, बँका नव्याने पीक कर्ज देत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं.
****

 औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी तसंच नांदेड इथं भाजप कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी आंदोलन केलं.

औरंगाबाद इथं पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात भाजपच्या औरंगाबाद ग्रामीण शाखेच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

 नांदेड शहरात तसंच जिल्ह्यात मुदखेड इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नव्याने पीककर्ज वाटप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 बीड जिल्ह्यात परळी इथं भाजप कार्यकर्त्यांनी बँकांबाहेर निदर्शने केली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड इथं राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.

 दरम्यान मंत्री भुसे यांनी मंत्रालयातील सचिवांशी तत्काळ संपर्क साधून पीक विमा कंपनीच्या नियुक्ती बाबत निर्देश दिले असून इतर मागण्या बाबत लवकरच कार्यवाही करू असं आश्वासन दिलं आहे.

 लातूर इथं शेतकरी संघटनेनं लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्यातील आघाडी सरकारने केली होती. मात्र हे अनुदान मिळत नसल्यानं १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.

 परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शन करुन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीककर्ज वाटप आणि कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं.
****

 जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीची ही मुदत संपल्यानंतर आज पुन्हा शहरातील रस्त्यांवर लोकांनी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी शहरातील काझी मोहल्ला इथं कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्हाधिकारी ह्यांनी हा परिसर नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून विनाकारण घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यातील ७ हजार ९६५ शेतकऱ्यांना ८८ हजार ६७० क्विंटल खते आणि २ हजार ७८४ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात आलं आहे. आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी आज ही माहिती दिली. एकूण ३६ हजार ३२४ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते वितरित केली जातील असंही त्यांनी सांगितलं.
****

 लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडगाव एक्की इथं जिल्ह्याचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी अशोक सोपान कदम या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बैल अथवा ट्रॅक्टर वापरण शक्य नसल्यानं या शेतकऱ्यानं आपल्या दिव्यांग मुलगा आणि पत्नीच्या सहाय्याने पेरणी केल्याचं कळल्यानंतर खासदार श्रृंगारे यांनी मदत केली आहे.
****

 हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाणांसंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत, तसंच संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधिक्षक यांना दिले आहेत़. तसंच शेतकऱ्यांना खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या आहेत.
****

 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारकऱ्यांचा पंढरपूरच्या वारीत खंड पडणार आहे. तरीही प्रत्येक वारकऱ्यानं वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत वचनाप्रमाणे आपल्या घरासमोर वृक्षाची लागवड करावी असं आवाहन सिने अभिनेते आणि सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केलं आहे.
****

 राज्यातल्या विविध शासकीय कार्यालयामध्ये पदभरतीत दिव्यांग अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संवेदना संस्था तसेच सक्षम संघटनेच्या शिष्टमंडळानं देशमुख यांची भेट घेतली, यावेळी सरकारी नोकरीतला दिव्यांगांचा अनुशेष भरावा यासह दिव्यांग प्रवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर देशमुख यांनी हे आश्वासन दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****

No comments: