Wednesday, 24 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
                                     Language Marathi                   
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** सरकारी कोविड रुग्णालयांना भारतीय बनावटीच्या पन्नास हजार वेंटीलेटरचा पुरवठा करण्यासाठी पीएम केअर्स फंड ट्रस्टरमधून दोन हजार कोटी रूपयांचा निधी
** चीनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता महाराष्ट्र सायबर विभागाकडून व्यक्त
** पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीला कोविड १९ वरच्या विकसित औषधाची जाहिरात न करण्याचे केंद्र सरकारचे आदेश
** राज्यात आणखी तीन हजार २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, काल दिवसभरात २४८ रुग्णांचा मृत्यू.
** औरंगाबादमध्ये चार वृद्ध पुरुषांचा मृत्यू तर १८० नवे रुग्ण
** जालना जिल्ह्यातही एका रुग्णाचं निधन, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणीत रुग्णांच्या संख्येत वाढ
** वीज ग्राहकांना सुलभ हप्त्यामध्ये वीज बिल भरता येणार
** गुलाबबाई संगमनेरकर यांना राज्य सरकारचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
** सोयाबीन बियाण्यांच्या उगवणाबाबतचा अभ्यास करण्यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि अधिकाऱ्यांची समिती नियुक्त
आणि
** शेतकऱ्यांना कृषी कर्ज वितरण करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
****
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी कोविड रुग्णालयांना भारतीय बनावटीच्या पन्नास हजार वेंटीलेटरचा पुरवठा करण्यासाठी पीएम केअर्स फंड ट्रस्टचमधून दोन हजार कोटी रूपये निधी देण्यात आला आहे. याशिवाय स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी सुमारे तीन हजार व्हेंटिलेटर तयार झाले असून, एक हजार तीनशे पेक्षा अधिक व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रासह सहा राज्यांना पुरवण्यात आले आहेत. या महिनाअखेरपर्यंत आणखी १४ हजार व्हेंटिलेटर्स या राज्यांना पुरवण्यात येणार आहेत. स्थलांतरित कामगारांसाठी देण्यात आलेल्या एक हजार कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राला १८१ कोटी रुपये निधी मिळणार आहे.
****
चीनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता महाराष्ट्र सायबर विभागानं वर्तवली आहे. देशाच्या माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात गेल्या पाच दिवसात चीनी हॅकर्सनी ४० हजाराहून अधिक सायबर हल्ल्यांचा प्रयत्न केल्याचं विभागानं सांगितलं आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत असून, त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन सायबर विभागानं केलं आहे. एन सी ओ व्ही २०१९ ॲट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलच्या माध्यमातून चीनी हॅकर्स काही आर्थिक प्रलोभन देऊन आपली माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असून, हा खोटा सरकारी ई मेल असल्याचं सायबर विभागानं स्पष्ट केलं आहे. अशा कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नये आणि फाईल डाऊनलोड करु नये, असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
****
राज्य सरकारनं महानगरपालिकांना कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात मदत करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई महापालिका वगळता, इतर महापालिकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळे कोविडग्रस्तांवर उपचारासाठी महापालिकांना आर्थिक मदत करणं, गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले. प्रशासन विविध उपाययोजनांचा प्रभावी वापर करत आहेत, मात्र खासगी रुग्णालयांचा पुरेसा वापर होतो की नाही, याची पडताळणी होत नसल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, टाळेबंदीच्या काळात वीज ग्राहकांना वाढीव वीज देयकं पाठवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. टाळेबंदीच्या कालावधीत वीज वितरण कंपन्यांना मीटर रिडिंग करणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यांनी ग्राहकांकडून जास्तीचं देयक वसूल केलं, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी भारतातून हज यात्रेसाठी भाविक जाणार नसल्याचं केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी आपल्याला दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत या वर्षी हज यात्रेकरूंना पाठवू नये, असं सुचवल्याचं ते म्हणाले. यंदा हज यात्रेसाठी एकूण दोन लाख १३ हजार अर्ज आले होते. यात्रेची संपूर्ण रक्कम कपात न करता यात्रेकरूंना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही नक्वी यांनी सांगितलं.
****
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीनं कोविड १९ वर औषध विकसित केल्याच्या दाव्यातली तथ्य आणि नमूद केलेल्या शास्त्रीय अभ्यासाच्या तपशीलाबाबत अद्याप काहीच माहिती नसल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. या औषधाची योग्य तपासणी होईपर्यंत पतंजलीनं जाहीरात करणं थांबवावं, असं आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. बाबा रामदेव यांनी काल या औषधाचा दावा केल्यानंतर मंत्रालयानं दाव्यांची पडताळणी करण्यासाठी पतंजली आयुर्वेद लिमिटेडला औषधांची नावं, त्यातील घटक, तसंच या औषधाचं संशोधन करण्यात आलेल्या ठिकाणाचा तपशील मागितला आहे. तसंच या औषधांच्या परवान्यांच्या प्रती आणि उत्पादनांच्या मंजुरीचा तपशील देण्याची विनंती मंत्रालयानं उत्तराखंड सरकारच्या संबंधित राज्य परवाना प्राधिकरणालाही केली आहे. मात्र औषध विकण्यासंबंधी मंत्रालयानं अद्याप कोणतीही सूचना केली नाही.
****
कोविड १९ या आजारातून बरे होण्याच्या टक्क्केवारीत राज्यात कोल्हापूर शहर प्रथम क्रमांकावर असून परभणी शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा आजारातून बरे होण्याचा दर ९० पूर्णांक चार दशांश टक्के तर परभणी जिल्ह्याचा बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक एक दशांश टक्के एवढा आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४९ पूर्णांक ८० शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
राज्यात काल आणखी तीन हजार २१४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ३९ हजार १० झाली आहे. काल या आजारानं २४८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत सहा हजार ५३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कालपर्यंत राज्यात ६९ हजार ६३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, सध्या ६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद इथं काल चार वृद्ध पुरुषांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातल्या पीरबाजार भागातल्या ८६ वर्षीय, वैजापूर तालुक्यातल्या वंजारगाव इथल्या ६६ वर्षीय वृद्धाचा तर फुलंब्री तालुक्यातल्या ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे तीव्र श्वसन विकार आणि न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं घाटी रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. औरंगाबाद तालुक्यातल्या गारखेडा गावातही एका ६६ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या २०६ एवढी झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल १८० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या तीन हजार ८३६ झाली आहे. काल आढळलेल्या १८० रुग्णांपैकी १२१ रुग्ण महापालिका क्षेत्रातले तर ५९ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. काल ९० रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानं सुटी देण्यात आली आतापर्यंत दोन हजार १३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एक हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या नूतनवाडी इथल्या एका ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीमध्ये या रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणमुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातल्या तीन, इंदेवाडी इथल्या दोन आणि भोकरदन तालुक्यातल्या नूतनवाडी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ३८४ झाली आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल दहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत, हे सर्व रुग्ण शहरातल्या भोई गल्लीतले आहेत, असं विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर विजय चिंचोलकर यांनी सांगितलं.
दरम्यान, उपचारानंतर बरे झालेल्या चार रुग्णांना काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा इथं दोन, तर नळदुर्ग इथला एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १८६ झाली आहे. यापैकी १३६ जण बरे झाले आहेत, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, परंडा इथल्या एका बाधित रुग्णाचा काल सोलापूर इथं मृत्यू झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात आठ नवीन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वसमत तालुक्यात चंदगव्हाण गावातल्या एका ३८ वर्षीय पुरूषाचा यात समावेश आहे. हा पुरुष औरंगाबादहून गावात परतला आहे. तर कळमनुरी तालुक्यात ७ व्यक्तींना लागण झाली आहे. यातल्या ५ व्यक्ती कवडा गावातल्या असून सर्व पुरूष आहेत. हे सर्वजण मुंबईहून गावाकडे परतले आहेत. तर २ किशोरवयीन मुले गुंडलवाडी गावातले रहिवासी असून त्यांचं कुटुंब ठाण्याहून इथून गावी परतलं आहे. हे सर्वजण विलगीकरण कक्षात दाखल आहेत. हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या आता २४८ वर पोहचली आहे. त्यापैकी २२३ रूग्ण बरे झाले असून २५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात काल नव्याने चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३२१ झाली आहे. काल सात रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण २४५ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण १४ रुग्ण मृत्यू पावले आहेत तर सध्या नांदेड जिल्ह्यात ६२ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना विषाणू बाधित आढळल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ९८ झाली आहे. दरम्यान, सेलू शहरातला हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केला आहे.
****
पुणे जिल्ह्यात काल आणखी ८२० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. नाशिक मध्ये १२४, यवतमाळ आणि सोलापूर प्रत्येकी १५, धुळे १३, अमरावतीमध्ये पाच, रत्नागिरी दहा, वाशिम तीन, अहमदनगर आणि सातारा इथं प्रत्येकी इथं दोन नवे रुग्ण आढळले.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल सलग १७ व्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २० पैशानं तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ पैशांनी वाढ झाली आहे. १७ दिवसानंतर पेट्रोलचा दर लिटरमागे आठ रुपये पाच पैसे, तर डिझेलचा दर लिटरमागे दहा रुपयानं वाढला आहे.
****
मराठा आरक्षण टिकले पाहिजे, हीच सर्वांची भूमिका असून, त्या अनुषंगाने सरकार सक्षमपणे काम करत असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं तयारी केली असून, प्रख्यात विधीज्ञ मुकूल रोहतगी आणि इतर ज्येष्ठ वकिल मंडळी राज्य शासनाची बाजू मांडणार असल्याचही त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या वीज ग्राहकांना सुलभ हप्त्यामध्ये वीज बिल भरता येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल केली. महावितरणसह इतर खासगी वीज कंपन्यांच्या ग्राहकांनासुद्धा ही मुभा मिळणार असल्याचं ते म्हणाले. त्यासाठी ग्राहकांना जवळच्या वीज कार्यालयात जावं लागणार असून, यासाठी कुठलंही अतिरीक्त शुल्क लागणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, मात्र केवळ दोन ते तीन टक्के ग्राहकांनीच मीटर रीडिंग पाठवल्यानं इतर ग्राहकांना सरासरी वापराच्या आधारे वीज बिल पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर प्रत्यक्ष रीडिंगच्या आधारे बिल पाठवण्यात आल्यानं जास्त बिल आलं असा गैरसमज ग्राहकांमध्ये निर्माण झाला असल्याचं राऊत यांनी सांगितलं. यासंदर्भात काही शंका असल्यास ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन शंका दूर करुन घेऊ शकतील, असं ते म्हणाले.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा दुसरा हप्ता एक जुलै रोजी देय होता, आता तो देण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असं सरकारनं सांगितलं.
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात बांदझू परिसरात काल पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे जवान सुनील काळे शहीद झाले. सोमवारी मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. यात दोन दहशतवादी ठार झाले.
****
महाराष्ट्र शासनाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार सन २०१८-१९ साठी गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****
सोयाबीन बियाण्यांच्या उगवणाबाबत अभ्यासासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातल्या अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केल्या असून, त्याची दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीनं करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी दोषी कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई  करण्याची सूचनाही कृषी मंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान, काल सांगली इथं बोलताना भुसे यांनी, महात्मा ज्योतिराव फुले कृषी कर्जमुक्ती योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याचं सांगितलं. आत्तापर्यंत खरीप हंगामातल्या ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बियाणे आणि खत शंभर टक्के उपलब्ध असून त्याची कोणतीही कमतरता नसल्याचं ते म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातही सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली. संघटनेच्या वतीनं वसमत, सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणं न उगवल्यानं निवेदनं देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयातल्या साहित्याची नासधूस केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवण न झाल्याबाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात असं आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींवर कृषी विभागानं लक्ष घालावं असं त्यांनी सूचित केलं.
****
नांदेड जिल्ह्यातही सोयाबीन बियाण्यांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा गाव शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवणीची पाहणी केली. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत असून सोयाबीनची उगवण ज्या क्षेत्रामध्ये झालीच नाही अशा शेतावर दुबार पेरणी करावी आणि अल्प प्रमाणात उगवलेल्या ठिकाणी मूग, उडीद, तूर, सूर्यफूल अशा पिकांची लागवड करावी, असं आवाहन त्यांनी शेतकर्यांना केलं आहे.
****
देशाच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या नियमात बदल करून शेतकऱ्यांना  खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा तो महत्वाचा भाग असल्याचं मत केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केलं. भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा आणि विदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या व्हर्च्युअल सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेचे प्रास्ताविक पुण्यातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दिल्लीतून या सभेचे सूत्रसंचालन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केलं. या सभेत औरंगाबादहून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉक्टर भागवत कराड, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल सावे सहभागी झाले होते, लातुरमधून पद्मश्री डॉक्टर अशोक कुकडे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
आपापल्या गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या ‘गरीब कल्याण रोजगार अभियानात मराठवाड्याचा समावेश करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर केलं आहे.
****
राज्यभरात पीक कर्जाच्या वाटपासाठी आंदोलने सुरू असताना लातूर जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज वाटप गाव पातळीवर केलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

जिल्हा बँकेच्या वतीने खरीप हंगामासाठी दहा तालुक्यातील १ लाख ४१ हजार ५२१ शेतकरी सभासदांना वाटप कर्ज केले आहेत याविषयी अधिक माहिती देताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. काकडे म्हणाले

शासनाच्या टार्गेट होतं ७३९ कोटी तर त्यात जवळ – जवळ ५६३ कर्ज वाटप केलेले आहे एकूण टार्गेट ७६ टक्के झालेले आहे आणि आम्ही शासनाचे आदेश आलेले आहेत शेतकऱ्याला कर्ज कर्जमाफी झालेली आहे कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना आमच्या संचालक मंडळ ताबडतोब १२० कोटी वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्जवाटप योग्यवेळी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यासाठी लातूर

****
शेतकऱ्यांना कृषी कर्ज वितरण करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर गुन्हेगारी खटले दाखल करण्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. काही राष्ट्रीयीकृत बँका कृषी कर्जाच्या वितरणाला नकार देत असल्याच्या तक्रारी आल्या असून, या तक्रारी सरकारनं गांभिर्यानं घेतल्या आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही त्रासाशिवाय कर्ज मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं देशमुख म्हणाले.
****
केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानाअंतर्गत महत्वाकांक्षी जिल्हा सुधारणा कार्यक्रमामध्ये उस्मानाबाद, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांची निवड झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही उन्नत भारत अभियान विभागीय समन्वयक संस्था आहे. या तिन्ही जिल्ह्यातल्या ३१ सहभागी संस्था या कार्यक्रमांमध्ये कार्य करणार असल्याचं विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या तळेगाववाडी इथं तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या पाच मुलींचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली.  मृतांमधल्या दोघी सख्ख्या बहिणी तर इतर तिघी चुलत बहिणी असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाला. बाबुर्डी गावात काल दुपारी ही घटना घडली. ही भावंडं उत्तर प्रदेशमधले असून, त्यांच्या कुटुंबातले सदस्य गुऱ्हाळावर मजुरीचं काम करतात.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, ओंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या काही गावांना काल संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. लातूर इथल्या भूकंप मापक वेधशाळेनं या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे.
****



No comments: