आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जून २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
कोरोना विषाणूचे २०१ नवे रुग्ण आढळले असून यात महापालिका क्षेत्रातले १२५ आणि ग्रामीण
भागातले ७६ रुग्ण आहेत. नव्या रुग्णांमधे ११४ पुरुष आणि ८७ महिला आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणूच्या रुग्णांची संख्या ४ हजार ७२३ झाली आहे. दोन हजार तिनशे त्र्याहत्तर रुग्ण
यातून बरे झाले असून २३४ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
****
देशात कोरोना विषाणूच्या
रुग्णांमधे काल अठरा हजार पाचशे बावन्ननं वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ
असून एकूण रुग्ण संख्या पाच लाख आठ हजार नऊशे त्रेपन्न झाली आहे.
****
केंद्र सरकारनं सूक्ष्म,
लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ३ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली
आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
पेट्रोलच्या दरात लिटरला
पंचवीस पैसे आणि डिझेलला २१ पैसे दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यांत पेट्रोल
नऊ रुपये बारा पैसे आणि डिझेल अकरा रुपये एक पैशानं महाग झालं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर
तालुक्यातल्या पार्डी, सेनी, देळूब बुद्रुक, कोंढा या भागात काल संध्याकाळी मुसळधार
पाऊस झाला तर लिंबगाव परिसरात मध्यम ते हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्यातल्या २००५ पूर्वी
नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना
जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, या मागणीसाठी काल परभणीत ऑनलाईन आंदोलन करण्यात
आलं. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी सेवा निवृत्ती हक्क समितीच्या वतीनं हे आंदोलन
राज्यभर पुकारण्यात आलं होतं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
शहरातल्या विविध सोयी-सुविधांच्या समस्या दूर करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली
आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नगरपालिकेच्या
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहरात नाल्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट याकडे
प्राधान्यानं लक्ष देण्याची मागणी केली आहे.
****
No comments:
Post a Comment