Friday, 26 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.06.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 २६ जून २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज अनुक्रमे २१ पैसे आणि १७ पैसे प्रतिलीटर वाढ झाली. गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोलचे दर लीटरमागे ८ रुपये ८७ पैसे तर डिझेलचे दर लीटरमागे १० रुपये ८० पैशांनी वाढले आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. काल संध्याकाळपासून सुरक्षा दलांनी या परिसरात वेढा देऊन शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान आज सकाळी झालेल्या चकमकीत हा अतिरेकी ठार झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ४९२ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी १०२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ९१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार नऊशे ६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या आता ४२५ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यत २८७ रुग्ण बरे झाले असून, सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

कोविड विषयक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक आजपासून महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या तीन राज्यांचा दौरा करणार आहे. कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत हे पथक राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. 

****

नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातल्या तीनही महसूल मंडळात आज पावसाची सरासरी नोंद झाली. मात्र, जिल्ह्यातल्या इतर महसूल मंडळात पेरणी होऊन ऊगवलेले कोंभ पावसा अभावी कोमेजत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: