Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
सीबीएसई तसंच आयसीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा
रद्द
Ø
आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात दोन
हजार रुपये वाढ
Ø कोविड संसर्गाच्या
जलद निदानासाठी अँटिजेन चाचण्यांचा निर्णय
-
आरोग्य मंत्री राजेश टोपे
Ø
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांच्या
संख्येत २३० नं वाढ; जालन्यात ९, नांदेड ५ तर परभणीत एक नवीन रुग्ण
आणि
Ø
औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध गावांची पालकमंत्री
सुभाष देसाई यांच्याकडून पाहणी
****
केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळ सीबीएसई तसंच भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळ - आयसीएसईने आपल्या
दहावी तसंच बारावीच्या एक जुलैपासून नियोजित परीक्षा
रद्द केल्या आहेत. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही वर्गांच्या प्रलंबित
परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली,
त्यावेळी या दोन्ही मंडळांसह केंद्र सरकारकडून न्यायालयाला ही माहिती देण्यात आली.
या परीक्षा नंतर घेतल्या जातील, असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं. बारावीच्या विद्यार्थ्यांचं
मूल्यांकन गेल्या वर्षीच्या परीक्षेच्या आधारावर केलं जाईल, या विद्यार्थ्यांसाठी नंतर
होणारी परीक्षा देण्याचा पर्यायही खुला असेल, असं सीबीएसईने सांगितलं. याबाबत विद्यार्थ्यांसाठी
नव्याने सूचना जारी करण्याचे निर्देश न्यायालयानं मंडळाला दिले. आयसीएसईने मात्र विद्यार्थ्यांना
पुनर्परीक्षेचा पर्याय दिलेला नाही, न्यायालयात मंडळानं ही बाब स्पष्ट केली.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व
अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्याबाबतचा शासन निर्णय
निर्गमित करण्यात आला आहे. या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचं तात्पुरतं वेळापत्रक विद्यापीठानं
जाहीर केलं होतं, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने
परीक्षेचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करावं आणि दरवर्षीप्रमाणे दोन विषयांच्या परीक्षेत
एका दिवसाचं अंतर ठेवावं, ही बाब विचारात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा
मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांचं
नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितलं आहे.
****
आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात
वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आता आशा स्वयंसेविकांसह गट प्रवर्तकांना
तीन हजार रुपये महिना मानधन मिळेल. राज्यात ७१ हजार आशा स्वयंसेविकांना या निर्णयाचा
लाभ होणार आहे.
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये
सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कराच्या व्दितीय सुधारणा अध्यादेशाला राज्य
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य
व्यवसाय, व्यापार, आजिविका आणि नोकऱ्यांवरील कर अधिनियम १९७५ मध्येही सुधारणा अध्यादेशाला
राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास
मान्यता मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
२०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे
शेतकऱ्यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला
शासन हमी देण्यास मान्यता, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा
धोरण - २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं आज
झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
****
कोविड संसर्गाचं
जलद निदान होण्यासाठी अँटिजेन चाचण्या सुरू करत असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांनी सांगितलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून बोलत होते. यासाठी एक लाख किट्स
विकत घेतल्या जात असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. अवघ्या साडे चारशे रुपयात होणाऱ्या या चाचणीचा
अहवाल तासाभरात मिळत असल्याची
माहिती टोपे यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी तब्बल २३० कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली, यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४ हजार २६६
झाली आहे. या २३० रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत १२४ रुग्ण आणि ग्रामीण
भागात १०६ रुग्ण आढळले. यामध्ये ७७ महिला आणि १५३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबादमधील
एकूण रुग्णांपैकी २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून २१८ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, आता १ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना इथं आज सकाळी ९ जणांचा अहवाल कोरोना विषाणू
बाधित आला आहे. यामुळे जालना इथली रुग्णसंख्या ४०७ झाली असून यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे तर २७७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज आणखी ५ जणांना कोरोना विषाणूची
बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३३१ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज आणखीन १९ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत २६७ कोरोनाविषाणू
बाधित रूग्ण बरे झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात आज एका व्यक्तीचा अहवाल कोरोना विषाणू
बाधित आला आहे. रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. हा रुग्ण परभणी तालुक्यातला पाथरा या
गावचा असून या गावाला पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनानं जाहीर
केले आहे.
****
अमरावती मध्ये आज तीन कोरोना विषाणू बाधितांची भर
पडली, तर धुळे जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांना कोविडची बाधा झाली आहे.
****
दरम्यान, केंद्रीय
आरोग्य मंत्रालयाचं पथक उद्यापासून महाराष्ट्रासह तेलंगणा आणि गुजराथच्या दौऱ्यावर
येणार आहे. कोविड व्यवस्थापनासंदर्भात हे पथक राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करेल.
*****
औरंगाबादचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी आज जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या हनुमंतगाव, महालगाव आणि
गंगापूर तालुक्यातल्या वाहेगाव या गावांची पाहणी केली. या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी
संजिवनी प्रकल्प, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळबाग लागवड, ठिबक आणि तुषार
सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली,
तसंच शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटी दरम्यान
जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी शेतकऱ्यांनी
लाभ घेतलेल्या विविध योजनांची माहिती पालकमंत्र्यांना दिली. बांधावर खतं, बियाणे पुरवठा
या मोहिमेतंर्गत शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीलाही देसाई यांनी हिरवा
झेंडा दाखवला.
****
भारतीय जनता पक्षाचे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार
शरद पवार यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले.
धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो
आंदोलन करून पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
जालना
इथं अंबड चौफुली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पडळकर
यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह फोटोला जोडे मारा आंदोलन करून निषेध व्यक्त केला. औरंगाबाद
इथंही क्रांतीचौक परिसरात अशाप्रकारे आंदोलन करण्यात आलं.
****
पैठण इथं कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळल्यामुळे आजपासून तीन दिवस जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या
काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, भाजी बाजार आदी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
विनाकारण बाहेर दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कनेरगाव नाका इथं आज कोणतेही आदेश नसतांना
दुकानं सुरू झाली आहेत. या अनुषंगानं दुपारी हिंगोली उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे
यांनी या भागाला भेट देवून कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील केला. या भागातील
रस्त्यांवर पोलीस कर्मचारी आणि ग्रामसेवकांना पहारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या
बदनापूर तहसील कार्यालयाला आग लागून, निवडणूक विभागातील अभिलेखे, मतदार याद्या जळाल्या
तर दोन संगणक, झेरॉक्स मशीनचं नुकसान झालं. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन
दलाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली.
दरम्यान, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे यांनी बदनापूर तहसील कार्यालयास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे
खरीप पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. बदनापूर आणि अंबड तालुक्यात दुधना, सुकना, पारनदीच्या
पुराचे पाणी शेतात शिरल्याने काही ठिकाणी पिकांसह जमिनी खरडून गेल्या. विद्युत खांबही
वाकले आहेत. अंबड तालुक्यातल्या धनगरपिंप्री, रोहिलागड, जामखेड, सुखापुरी तसंच बदनापूर
तालुक्यातल्या रोषगाव, शेलगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे
झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून
केली जात आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातला
ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पातल्या बफर झोनची सफारी येत्या १ जुलै पासून पुन्हा सुरू
करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या १८ मार्चपासून बंद असलेल्या या प्रकल्पामुळं
आर्थिक अडचणीत सापडलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट, गाईड, आणि अन्य मजूरांच्या वतीने हा प्रकल्प
सुरू करण्याची मागणी अनेक संघटनांकडून वारंवार केली जात होती. या मागणीचा सकारात्मक
विचार करत कोअर झोन वगळता बफर झोनची सफारी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
****
पंढरपूर इथं विठ्ठल
रुक्मिणीच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी सुरु करण्यात आलेली वज्रलेपाची प्रक्रिया
पूर्ण झाली आहे. यामुळे मुर्तीचे मूळ रुप टिकून राहणार आहे. त्याचबरोबर आयुष्य वाढण्यास
मदत होणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment