Saturday, 27 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.06.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२० दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज बँक नियमन दुरुस्ती अध्यादेश २०२० लागू केला आहे. देशभरातल्या बँक ग्राहकांची खाती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. खातेधारकांच्या हितांचं रक्षण आणि सहकारी बँकांच्या प्रशासानमधे सुधारणा करण्याच्या तरतुदींचा या अध्यादेशात समावेश आहे. सहकारी बँकांसदर्भात रिझर्व बँकेच्या सध्याच्या अधिकारांचा विस्तार या अधिनियमाद्वारे करण्यात आला आहे. 

****

देशाची घटना हीच सरकारची मार्गदर्शिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त केरळमधील पथनमथीत्ता इथं आयोजित समारंभात दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते. एकशे तीस कोटी देशवासियांचं सबलीकरण करण्याच्या ध्येय्यानं आपलं सरकार प्रेरीत असल्याचं तसंच धर्म, लिंग, जात, पंथ किंवा भाषावार भेदभाव करत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्या सरकारनं नवी दिल्लीतील कार्यालयात बसून नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

****

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली याचं भारताला प्रत्यार्पण करता येणार नाही पण या कटात सहभागी तहव्वूर राणा याला प्रत्यार्पणाला सामोरं जावं लागणार आहे. अमेरिकेतील वकिलांनी तिथल्या न्यायालयात राणाच्या जामीन अर्जाला विरोध करताना ही माहिती दिली आहे. राणाचं प्रत्यार्पण करावं, अशी भारतानं विनंती केल्यानंतर गेल्या दहा जून रोजी लॉस एंजल्स इथं त्याला फेरअटक करण्यात आली आहे.

****

देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमधे काल अठरा हजार पाचशे बावन्ननं वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून एकूण रुग्ण संख्या पाच लाख आठ हजार नऊशे त्रेपन्न झाली आहे. दोन लाख ९५ हजार ८८० रुग्ण यातून बरे झाले असून एक लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५८ पूर्णांक १३ टक्के आहे.

या विषाणूमुळे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे ३८४ रुग्ण मरण पावले असून यामधे महाराष्ट्रातील सर्वाधिक १७५ रुग्ण असल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एकूण १५ हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

कोरोना विषाणूमुळे निर्माण परिस्थितीवर उपाययोजनां संबंधी चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय मंत्रीगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री, हवाई वाहतुक मंत्री, गृहमंत्री तसंच संरक्षण दल प्रमुख आदी उपस्थित राहतील.

****

औरंगाबाद शहरातल्या गजानन नगर भागात आज कोरोना विषाणू बाधित सर्वाधिक १० रुग्ण आढळले. तर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वाळूज परिसरात ८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज सकाळी २०१ रुग्णांची वाढ झाल्यानं जिल्ह्यातली रुग्ण संख्या ४ हजार ७२३ झाली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे जिल्ह्यात २३४ जण मरण पावले आहेत.

****

ठाणे पोलीस आयुक्तालयातील चारशे कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून यातील तिनशे तेरा पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. एकशे एक जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या विषाणूमुळे तीन जमादारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना अतिरिक्त काळजी घ्यावी, असं आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे.

****

अमरावती जिल्ह्यात आज नवे १५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ५०९ झाली आहे.

****

सातारा जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधित २८ नवे रुग्ण आढळले. यासह जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या ९१९ झाली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यातले सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता जिल्ह्यातले सांगोला, मंगळवेढा, माढा आणि पंढरपूर हे तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

****

गलवान इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या साकुरी इथले सैनिक हुतात्मा सचिन मोरे यांच्या पार्थिवावर साकुरी इथं आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्यदलाकडून यावेळी मानवंदना देण्यात आली. गलवान इथं नदीमध्ये बुडणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवतांना मोरे यांना वीरमरण आलं.

****

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. खामगाव, शेगाव, संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. संग्रामपूर तालुक्यात नदी-ओढे तुडुंब भरले आहेत. तालुक्यातलं वानखेड गाव पूर्णपणे पाण्यानं वेढलं गेलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: