Friday, 26 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.06.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 June 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जून २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ५० कोटी रूपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या प्रस्तावांना महा-परवाना देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ.

·      राज्यात येत्या रविवारपासून केशकर्तनालय सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी; रेल्वेसेवा १२ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय.

·      केंद्रीय माध्यमिक शिक्षण आणि भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाची नियोजित दहावी तसंच बारावीची परीक्षा रद्द.

·      कोविड १९च्या संसर्गाचं जलद निदान करण्यासाठी अँटिजेन चाचण्या सुरू करण्याचा निर्णय- आरोग्य मंत्री राजेश टोपे.

·      राज्यात आणखी चार हजार ८४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात १९२ रुग्णांचा मृत्यू. 

·      औरंगाबाद जिल्ह्यातही १४ बाधितांचा मृत्यू तर २६३ नवे रुग्ण.

·      जालन्यात एका महिलेचा मृत्यू, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणीत रुग्णांच्या संख्येत वाढ.

·      औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू परिस्थितीची नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

आणि

·      राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू पुरस्कार तर औरंगाबादच्या एमजीएम अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुधीर गव्हाणे यांना इंटरनॅशनल ॲकॅडमी पुरस्कार जाहीर.

****

कोविड -19च्या परिस्थितीनंतर राज्यातल्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विविध उपाययोजनांना राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

राज्यात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीच्या आणि ५० कोटी आणि त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीच्या औद्योगिक प्रस्तावांना बांधकाम आणि उत्पादन सुरु करण्यासंदर्भात शासनाचं आश्वासनपत्र म्हणून महा-परवाना देण्यात येईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निश्चित केलेल्या हरीत आणि केशरी प्रवर्गातल्या उद्योगांचा यात समावेश आहे. या उद्योगांना पूर्व उभारणी, बांधकाम चालू करणं, उत्पादन सुरु करण्यासाठी लागणारे विविध परवाने मैत्री कक्षाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या उद्योगांना परिपूर्ण ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यापासून ४८ तासांत महापरवाना देण्यात येईल.

कोविड-19 महामारीच्या परिणामस्वरुप कामगारांच्या स्थलांतरणामुळे उद्योग घटकांना आवश्यक मनुष्यबळ प्राप्त करणं तसंच राज्यातल्या स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरता औद्योगिक कामगार सुविधा पोर्टल स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.



आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल दोन हजार रुपयापर्यंत तर गट प्रवर्तकांना तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी १७० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात असून, एक जुलैपासून ही वाढ लागू होईल. 

शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे वेळेत देण्यासाठी कापूस पणन महासंघाच्या कर्जास शासन हमी देण्याचा, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहायभूत सेवा धोरण-२०१५ चा कालावधी वाढवण्यासही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातल्या शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खाजगीकरणाच्या धोरणास तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे.

****

राज्यातले केशकर्तनालय येत्या रविवारपासून उघडण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल ही माहिती दिली. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं पालन करुन सलून उघडण्यास परवानगी दिल्याचं ते म्हणाले. सलूनमध्ये न्हावी आणि ग्राहकांना सॅनिटायझर आणि मास्क वापरणं बंधनकारक असेल, तसंच एक नॅपकिन एकाच ग्राहकासाठी वापरावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

रेल्वे विभागानं १२ ऑगस्टपर्यंत मेल, एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वेसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र १२ मे पासून सुरु झालेली विशेष राजधानी आणि एक जून पासून सुरु झालेल्या काही रेल्वे गाड्या सुरु राहणार आहेत. एक जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना तिकीटाचं पूर्ण शुल्क परत केलं जाणार असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई तसंच भारतीय शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळ-आयसीएसईने आपल्या दहावी तसंच बारावीच्या एक जुलैपासून नियोजित परीक्षा रद्द केल्या आहेत. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही वर्गांच्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी या दोन्ही मंडळांसह केंद्र सरकारकडून न्यायालयाला ही माहिती देण्यात आली. या परीक्षा नंतर घेतल्या जातील, असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं.

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आहे. या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचं तात्पुरतं वेळापत्रक विद्यापीठानं जाहीर केलं होतं, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशानं परीक्षेचं वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करावं, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सूचित केलं होतं. दरवर्षीप्रमाणे दोन विषयांच्या परीक्षेत एका दिवसाचं अंतर ठेवावं, ही बाब विचारात घेऊन हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

****

कोविड विषयक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक आजपासून महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या तीन राज्यांचा दौरा करणार आहे. कोविड-19च्या प्रसाराला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत हे पथक राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. 

****

कोविड-19च्या संसर्गाचं जलद निदान होण्यासाठी अँटिजेन चाचण्या सुरू करत असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून बोलत होते. यासाठी एक लाख किट्स विकत घेतल्या जात असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. अवघ्या साडे चारशे रुपयात होणाऱ्या या चाचणीचा अहवाल तासाभरात मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले -

या टेस्टला आपल्याला १ तास लागतो आणि साधारणपणे अर्धा ते एक तासामधे आपल्याला रिपोर्ट मिळतो. ४५० रुपयांमधे ही टेस्ट होते. हेल्थ वर्कर असतील, अत्यावश्यक सेवेतील वर्कर असतील, किंवा पोलीसकर्मी असतील किंवा कंटेनमेंट एरियातले सुध्दा काही लोक आपल्याला घ्यायचे असतील या सगळ्यांच्या दृष्टीकोनातून हे अँटीजेन टेस्ट महत्वाचे आहे.



कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार रेमडेसीवीर आणि फॅविपीरावीर यासारख्या प्रतिजैविक औषधींची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे. ही औषधी महाग असल्यामुळे राज्य सरकार स्वतः खरेदी करत असल्याचं टोपे म्हणाले.

याशिवाय कोविड रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका मनमानी रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याची दखल सरकारनं घेतली असून रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,

RTOकडे प्रत्येक जिल्ह्यामधे एक यादी असते ज्याच्यात किती ambulances registered आहेत. त्यातून ज्या चांगल्या ambulances असतात त्या requisition करायच्या. त्याचं भाडं ठरवायचं. आणि त्या मोफत पध्दतीनं कोविडच्या पेशंटस्‍ला वहन करण्यासाठी वापरायचे. जे लोक खाजगी चालवतीलच त्या लोकांनीसुध्दा कोणताही दर लावून चालणार नाही. Ambulances ला सुध्दा Per Kilo Meter चा दर त्या त्या जिल्ह्यामधे जे काही असेल ते कलेक्टर आणि कमिशनर ठरवतील तो दर त्या ambulance साठी पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांनी द्यायचाय.

****

राज्यात काल आणखी चार हजार ८४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ७४१ इतकी झाली आहे. काल १९२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं सहा हजार ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात तीन हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत ७७ हजार ४५३ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रहेमानिया कॉलनी, छावणी, कटकट गेट, नूतन कॉलनी, सईदा कॉलनी, भारत नगर, नॅशनल कॉलनी, मुजीब कॉलनी, रोशन गेट, देवळाई, मदनी चौक, फाजलपुरा आणि खुलताबाद इथल्या दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २६३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये औरंगाबाद शहरातले १४९ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले ११४ रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या चार हजार २९९ झाली आहे.

काल दिवसभरात ७६ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार २९३ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ७७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

जालना शहरातल्या सदर बाजार परिसरातल्या ५५ वर्षीय महिलेचा काल कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या आता ४०७ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यत २८७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या केंद्रा खुर्द इथल्या २१ वर्षीय तरुणीचा काल कोरोना विषाणू संसर्गानं अकोला इथं मृत्यू झाला. या मुलीच्या संपर्कातल्या व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २५१ झाली आहे. त्यापैकी २२९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

लातूर जिल्ह्यात काल आणखी १५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर शहरातल्या वाल्मिकी नगर इथं चार, माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. धानोरा इथले दोन, सारोळा, रावणगाव, नई आबादी आणि चौबुरा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल १२ बाधित रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत १८५ रुग्ण बरे झाले असून, सध्या ६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात काल आणखी पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३३१ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल १९ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत २६७ कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे झाले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. सलगरा इथं दोन, तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा आणि वानेगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १९४ झाली आहे. त्यापैकी १४४ रुग्ण बरे झाले असून, नऊ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

परभणी जिल्ह्यात काल एका व्यक्तीचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. हा रुग्ण परभणी तालुक्यातला पाथरा गावचा असून या गावाला पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनानं जाहीर केले आहे.

****

मुंबईत काल आणखी एक हजार ३६५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७२५ नवे रुग्ण, तर १६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात २२० नवे रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला. सोलापूर ८३, धुळे ५९, नंदुरबार ४७, अहमदनगर २६, सातारा २२ आणि अमरावती जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. वाशिम जिल्ह्यात काल सहा बाधित रुग्ण बरे झाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्वतोपरी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे औरंगाबाद इथले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी औरंगाबादमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील तसंच सर्व आमदारांनी विविध सूचना करत प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं सांगितलं. खासगी रुग्णालयाकडून कोरोना विषाणू बाधित रुग्णांकडून जास्तीची रक्कम आकारली जात असेल, तर त्याबाबत परीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेनं स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दरम्यान, पालकमंत्री देसाई यांनीही काल औरंगाबाद इथं कोरोना विषाणू परिस्थितीसंबंधी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे वाढत्या संसर्गातही चांगलं आहे. याच पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसंच वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची, ऑक्सिजनची, डॉक्टर्स आणि इतर पूरक गोष्टींची तयारी ठेवण्याबाबत देसाई यांनी संबंधितांना निर्देश दिले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातल्या वाहेगाव या गावांची पाहणी केली. या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळबाग लागवड, ठिबक आणि तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतल्या कामांची पाहणी केली, तसंच शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या विविध योजनांची माहिती पालकमंत्र्यांना दिली. बांधावर खतं, बियाणे पुरवठा या मोहिमेतंर्गत शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीलाही देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवला.

****

लातूर जिल्ह्यात सोयाबीन उगवण न झाल्याबाबतच्या तक्रारी येत असून, यासंदर्भात कृषी विभागानं पंचनामे करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. उदगीर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर गावी जाऊन सोयाबीनच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

परभणी शहरास पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन बंद करून लवकरच नवीन पाईपलाईनवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नवीन पाईपलाईनवर अधिकृतपणे नळ जोडणी करून घ्यावी, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

****

परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना विषाणू चाचणीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे आता अवघ्या चार तासात संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त होत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ही सुविधा नसल्यामुळे नांदेडवर अवलंबून राहावे लागत होते. नांदेडहून अहवाल येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागत असे.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे काल राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

जालना इथं अंबड चौफुली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह फोटोला जोडे मारा आंदोलन करून निषेध व्यक्त केला. औरंगाबाद इथंही क्रांतीचौक परिसरात अशाप्रकारे आंदोलन करण्यात आलं.

****

कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा ३५वा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक आणि ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल ही घोषणा केली.

****

औरंगाबादच्या एमजीएम अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ सुधीर गव्हाणे यांना शिक्षण क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल ‘इंटरनॅशनल ॲकॅडमी पुरस्कार’ घोषित झाला आहे. युनिकॅरेबियन बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ द कॉमनवेल्थ कॅरेबियनतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यामुळे तीन दिवस जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कालपासून सुरू झालेल्या या संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं, भाजी बाजार आदी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विनाकारण बाहेर दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातलं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कनेरगाव नाका इथं कोणतेही आदेश नसतांना काल दुकानं सुरू करण्यात आली होती. हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी या भागाला भेट देवून कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित केला. या भागातील रस्त्यांवर पोलीस कर्मचारी आणि ग्रामसेवकांना पहारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तहसील कार्यालयाला आग लागून, निवडणूक विभागातले अभिलेखे, मतदार याद्या जळाल्या तर दोन संगणक, झेरॉक्स मशीनचं नुकसान झालं. काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली. दरम्यान, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी बदनापूर तहसील कार्यालयास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातल्या वरिष्ठ विभागातल्या प्राध्यापकांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस दिला आहे. दोन लाख १७ हजार रुपयांचा धनादेश काल तहसिलदारांकडे सुपूर्द करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं. बदनापूर आणि अंबड तालुक्यात दुधना, सुकना, पारनदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यानं काही ठिकाणी पिकांसह जमिनी खरडून गेल्या. विद्युत खांबही वाकले आहेत. अंबड तालुक्यातल्या धनगरपिंप्री, रोहिलागड, जामखेड, सुखापुरी तसंच बदनापूर तालुक्यातल्या रोषगाव, शेलगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

****

नांदेड जिल्ह्यात ८० महसूल मंडळापैकी ११ महसूल मंडळात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. या पावसामुळे त्या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या शिरूरअनंतपाळ तालुक्यातल्या शेंद दक्षिण इथं वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. अभिजीत मोरे आणि सालगडी गौतम कांबळे हे काल शेतात काम करत असताना संध्याकाळी ही दुर्घटना घडली.

****

No comments: