Wednesday, 3 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ जून  २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, दिवेआगर इथं धडकून उरणच्या दिशेने अग्रेसर
Ø  जीवनावश्यक वस्तू कायद्यात शेतकरी हितानुसार बदल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंधनातून शेतकरी मुक्त
Ø  देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या दोन लाखावर; औरंगाबाद जिल्ह्यात नवीन ५१ तर नांदेड जिल्ह्यात २१ नवे रुग्ण
आणि
Ø  निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अखंडित वीज पुरवठा करण्याची महावितरण कंपनीकडून अभियंत्यांना सूचना
****

 निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी २ वाजेच्या सुमारास रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, दिवेआगर इथं धडकलं. यावेळी चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परीघ ६० किलोमीटर तर वाऱ्यांचा वेग ताशी १०० किलोमीटर होता. चक्रीवादळ त्यानंतर उरणच्या दिशेने अग्रेसर झालं. हे वादळ धडकल्यानंतर  किनारपट्टीलगची अनेक झाडं उन्मळून पडली. अलिबाग परिसरातल्या अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले. मुंबई गोवा महामार्गावरही अनेक झाडं उन्मळून पडल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. रेवदंडा आणि मुरूडला जोडणारा साळाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात थळ बाजार मधल्या दीड हजार मच्छिमारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.. अलिबागमध्ये जोराचा पाऊस कोसळत आहे.

 दरम्यान, निसर्ग चक्रीवादळापासून बचावासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सुमारे चाळीस हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौरांनी आज सकाळी सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.

 या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून त्यांना कामावर बोलवण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात दुपारनंतर ३५ ते ४० किलो मीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असून हा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वणी इथं घाट मार्गावर दरड कोसळल्याचं वृत्त आहे.
****

 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागांना देखील या चक्रीवादळाच्या पार्श्वभमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विधिज्ञ के.सी पाडवी यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.
****

 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. जीवनावश्यक वस्तू कायद्यात शेतकरी हितानुसार बदल करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या कायद्यातून अनेक जिन्नस वगळण्यात आले आहेत, याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यावेळी उपस्थित होते. शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विकण्याच्या बंधनातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या संदर्भातल्या अध्यादेशांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल चांगल्या दराने विकण्याचा पर्याय खुला होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्या कायम राहतील, मात्र या समित्यांच्या क्षेत्राबाहेर शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येणार आहे. या व्यवहारांवर कोणतंही कायदेशीर बंधन नसेल, तसंच कोणताही कर आकारला जाणार नाही.

 शेतकऱ्यांची क्रय शक्ती तसंच उत्पादन शक्ती वाढावी, तसंच पणन आणि शेतमाल विक्रीतही शेतकरी सक्षम व्हावा यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी देशभरात दहा हजार नवीन शेतकरी उत्पादक संघटना- FPO उभारल्या जाणार असल्याची माहिती तोमर यांनी दिली.

 दरम्यान, सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग - एमएसएमई उद्योगांच्या निकषांच्या विस्ताराबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारने आज जारी केला.
****

 जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे तिघे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं समजतं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्र तसंच दारुगोळा हस्तगत करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****

 देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या दोन लाखावर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणू बाधा झालेले आठ हजार ९०९ नवे रुग्ण आढळले. यापैकी एक लाखापेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे देशात कोविडग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासांत देशात २१७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या पाच हजार ८१५ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी चार नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये करीम कॉलनी, इंदिरा नगर, कोहिनूर कॉलनी आणि रहीम नगर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज दिवसभरात ५१ नवीन रुग्णांची वाढ झाल्यानं, जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता एक हजार सातशे वर गेली आहे.

 दरम्यान, शहरातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये एका ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी  उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ८५ कोरोना विषाणू बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एक हजार ८५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ५२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 नांदेड इथं आज आणखीन २१ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७५ झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातल्या देगलूर नाका भागातले ११, शिवाजीनगर नई आबादी भागातले ९ आणि देगलूर तालुक्यातल्या अमदापूर इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्हयात ४१ रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. आता पर्यंत नांदेड जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनाविषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****

 अमरावती इथं आज आणखी जणांना, तर सांगली, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
****

 निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात महावितरण यंत्रणेने सतर्क राहून वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरळित आणि अखंडित वीज पुरवठा करण्याच्या सूचना महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांनी अधिक्षक अभियंता यांना दिल्या आहेत. त्यांनी आज मराठवाड्यातल्या सर्व अधिक्षक अभियंत्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त साहित्य उपलब्ध केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या वादळी वारा आणि पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागानं खरीप हंगामासाठी पाच लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केलं आहे. त्या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना अंमलबजावणी करून पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातल्या १ हजार सहासष्ठ शेतकरी गटांमार्फत एक हजार नऊशे तीस मेट्रिक टन खत आणि १ हजार दोनशे बेचाळीस क्विंटल बियाणे गावात बांधावर उपलब्ध करून देण्यात आल आहेत.
****

 शेतकरी संघटनेनं एचटी बीटी कापूस लागवड आंदोलनाला सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात मुरगाव इथं संघटनेचे तालुका अध्यक्ष खुशाल हिवरकर यांनी त्यांच्या शेतात एचटी बीटीची लागवड करून प्रतिकात्मक आंदोलनाला सुरुवात केली. मराठवाड्यातही मृगाचा पाऊस झाल्यावर एचटीबीटी कापसाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा प्रमुख कैलास तवार आणि प्रवक्ते श्रीकांत उमरीकर यांनी दिली.
****

 परभणी मध्ये वारंवार जुगार खेळणाऱ्या व्यक्तीच्या गुन्ह्याचं रेकार्ड तयार करून त्यांच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. परभणी जिल्ह्यात टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या २४ मार्च ते ३१ मे दरम्यान विविध पोलिस स्थानकं तसंच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाच्या माध्यमातून जुगार खेळणाऱ्या व्यक्तीं विरूध्द छापे टाकून ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यात ३६६ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
*****
***

No comments: