Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्य सरकारी
अधिकारी - कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस
कार्यालयात हजेरी बंधनकारक
Ø केंद्र सरकारकडूनही कर्मचाऱ्यांसाठी खबरदारीविषयी मार्गदर्शक
सूचना जारी
Ø लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा चार ऑक्टोबरला; गेल्या वर्षी उत्तीर्ण
उमेदवारांच्या २० जुलैपासून मुलाखती
Ø राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या
संख्येनं ८० हजाराचा टप्पा ओलांडला
Ø औरंगाबादची रुग्णसंख्या १ हजार
८४६; नांदेड १८९, उस्मानाबाद ११६, तर हिंगोलीची रुग्णसंख्या
१९२ वर
Ø आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना प्रत्येकी एक
हजार रुपये प्रोत्साहन रक्कम
आणि
Ø जागतिक पर्यावरण दिन काल सर्वत्र वृक्षारोपणासह विविध उपक्रमांनी साजरा
****
राज्य सरकारच्या सर्व
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी
लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार नाही
त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार
नाही. राज्य सरकारनं यासंदर्भातले आदेश काल प्रसिद्ध केले.
पूर्वमंजूर रजेवर
असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे. आणि काही
कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले
आहेत. त्यापैकी काही कर्मचारी काही दिवस उपस्थित असतात, तर इतर दिवशी आदेश देऊनही कार्यालयात येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची ज्या
दिवशी उपस्थित असतील त्याव्यतिरीक्त इतर दिवसांची रजा गृहित धरली जाणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातल्या
महापालिका, तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका
क्षेत्रातल्या सरकारी कार्यालयातल्या १५ टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित
राहण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. रोटेशन पद्धतीनं ही उपस्थिती ठेवायची आहे. इतर ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात
उपस्थित रहावं लागेल.
दरम्यान, राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना इमेल, व्हॉट्सअप, एसएमएसद्वारे काम करण्याची मुभा
दिली आहे. याचा अध्यादेशही काल
प्रसिद्ध करण्यात आला. या
माध्यमातून कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक काम पूर्ण करावं असा सल्ला सरकारनं दिला आहे.
*****
निसर्ग चक्रीवादळामुळे
रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानापोटी तात्पुरती मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अलिबाग आणि थळ इथल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी
ही फक्त तातडीची मदत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं देखील
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदतीचं आश्वासन दिलेलं असल्याचं ते म्हणाले. पंचनामे करण्याचं काम सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल,
त्यानंतर पुन्हा मदत केली जाईल असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट
केलं.
रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच
झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीचं २५ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं काल एका पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली.
****
केंद्र सरकारनं कार्यालयं आणि इतर ठिकाणी घ्यायच्या खबरदारीविषयी मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं आणि
प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रतिबंधित
क्षेत्रातले कर्मचारी कार्यालयात येऊ शकणार नाहीत, या व्यक्तींना
घरून काम करण्याची परवानगी द्यावी आणि हा कालावधी रजा म्हणून गृहित धरु नये असंही
सरकारनं सांगितलं आहे. भोजनकक्ष,
वाहनतळ तसंच लिफ्टमध्ये
गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आलं आहे. अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या
व्यक्तींना वरिष्ठांच्या परवानगीनेच कार्यालयात प्रवेश द्यावा, असं सांगण्यात आलं आहे.
कार्यालयात
उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं लक्षात आल्यानंतर घ्यावयाच्या
काळजीबाबतही केंद्र सरकारनं स्वतंत्र निर्देश दिले आहेत.
कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची
बाधा झाल्याचं आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारनं स्पष्ट केली आहे. अशा
व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र
खोलीत किंवा विभागात ठेवावं, तत्काळ त्यांना जवळच्या
रुग्णालयात घेऊन जावं किंवा हेल्पलाइनला फोन करावा, असा सल्ला देण्यात आला
आहे. संशयित व्यक्तीला कमी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असतील तर त्याला घरीच
विलगीकरणार ठेवता येईल, या व्यक्तीला विषाणूची
लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यावर कार्यालय निर्जंतुक करावं
आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क शोध घ्यावा असंही सरकारनं कळवलं आहे.
कार्यालयात एक किंवा दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची
लागण झाल्याचं स्पष्ट झालं असेल तर ४८ तासापूर्वीपर्यंत त्यांनी भेट दिलेली ठिकाणं
निर्जंतुक करणं पुरेसं आहे. अशा परिस्थितीत पूर्ण कार्यालय सील करणं आणि कामं बंद
करणं गरजेचं नाही. मात्र मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले असतील तर कार्यालयाचा
संबंधित भाग किंवा संबंधित मजला निर्जंतुक केल्यानंतर ४८ तासांसाठी बंद ठेवावा असा
सल्ला सरकारनं दिला आहे.
कोरोना विषाणू बाधित
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींविषयीही केंद्र सरकारनं
माहिती दिली आहे. त्यानुसार बाधित व्यक्तीने त्यापूर्वीच्या २ दिवसात भेट दिलेल्या
व्यक्ती आणि त्याला विलगीकरणात ठेवल्यानंतर पुढच्या १४ दिवसात लक्षण दिसलेल्या
व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला आहे.
****
लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा
येत्या चार ऑक्टोबरला होणार आहे. आयोगाकडून काल ही माहीती
देण्यात आली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३१ मे
रोजी होणार होती. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा
पुढे ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगानं घेतला होता.
दरम्यान,
गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती २० जुलैपासून
घेतल्या जाणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं
बरे होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक २७ शतांश टक्के एवढं झालं आहे. देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख २६ हजार ७७० झाली आहे, यापैकी
आतापर्यंत १ लाख ९ हजार ४६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित
रुग्णांच्या संख्येनं काल ८० हजाराचा टप्पा ओलांडला. काल
आणखी दोन हजार ४३६ बाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८० हजार
२२९ झाली आहे. काल या आजारानं १३९ रुग्णांचा मृत्यू झाला,
राज्यात आतापर्यंत दोन हजार ८४९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल एक हजार ४७५ रुग्णांचा उपचारानंतर बरे झाल्यानं
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३५ हजार १५६
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार २२४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये कटकट गेट भागातल्या
सदफ कॉलनीतल्या एका ३०
वर्षीय महिलेचा समावेश आहे. २८ मे रोजी या महिलेला रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं, त्याच दिवशी तिची प्रसुती झाली होती. तिच्या लाळेचे नमुनेही
त्याच दिवशी तपासणीसाठी घेण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल विषाणू बाधित असल्याचा प्राप्त झाला होता. रहेमानिया कॉलनीतल्या एका ३४ वर्षीय महिलेचा आणि
तक्षशीला नगरमधल्या एका ४८ वर्षाच्या पुरुषाचाही काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं
९५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, काल जिल्ह्यात आणखी ७७ कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या एक हजार ८४६ झाली आहे. यापैकी १ हजार १५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून जिल्ह्यात आता ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन सेवन मधल्या अयोध्या नगरात सात,
सिडको एन थ्रीमध्ये सहा, समता नगरमध्ये पाच, गारखेडा
विजय नगर, जवाहर कॉलनी, बुढीलेन,
मिल कॉर्नर आणि रहेमानिया कॉलनी भागात प्रत्येकी
तीन रुग्ण, युनूस कॉलनी, औरंगपुरा,
तसंच मोगलपुरा भागात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
भारतमाता नगर, इंदिरानगर न्यू बायजीपुरा, रोशन गेट भागातली न्यू कॉलनी,
भावसिंगपुरा, त्रिमूर्ती चौक, बेगमपुरा, चिश्तिया कॉलनी, फाझलपुरा,
गांधी नगर, जुना मोंढ्यातलं भवानी नगर,
सिडको एन सहा मधली शुभश्री कॉलनी, सिडको एन नाईन
मधलं संत ज्ञानेश्वर नगर, सिडको एन ११ मधलं मयूर नगर,
सईदा कॉलनी, गणेश कॉलनी, एसटी कॉलनी, फाजलपुरा, एन आठ सिडको
जुना मोंढा, नॅशनल कॉलनी, बारी कॉलनी राम
मंदिर, विद्यानिकेतन कॉलनी, देवडी बाजार,
सिडको एन सेवन, सिडको एन बारा, आझाद चौक, एन अकरा- टी.व्ही.
सेंटर, कैलास नगर, भोईवाडा,
चिकलठाणा, रोशन गेट परिसर, म्हाडा कॉलनी, रोजाबाग
आणि किल्लेअर्क या भागात प्रत्येकी एक कोराना विषाणू बाधित तर
अन्य भागात तीन रुग्ण आढळले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल नवे सात
कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात
एकूण रुग्णांची संख्या १८९ झाली आहे. यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन
घरी परतले आहेत. तर ५५ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
तर कोरोना विषाणू संसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल १२ जणांना कोरोना विषाणूची
लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची
संख्या ११६ झाली आहे. त्यापैकी ५८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५५ जणांवर उपचार
सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजाभाऊ
गलांडे यांनी दिली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ जण कळंब तालुक्यातल्या
शिराढोणचे आहेत, दोघे जण अंदोरा इथले तर दोन जण ढोकी इथले आहेत. ढोकीचे दोन्ही रुग्ण पुण्याहून आलेले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल सहा व्यक्तींना
कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सहा
रुग्णांमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९२ झाली आहे.
यापैकी १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर
सध्या जिल्ह्यात ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आढळलेल्या
नव्या रुग्णांमध्ये अंधारवाडी इथल्या विलगीकरण कक्षातली २८ वर्षीय महिला आणि तिचा अकरा
वर्षीय मुलगा, हिंगोलीतल्या नगर परिषद कॉलनीतला ३३ वर्षीय इसम,
तसंच एकाच कुटुंबातला तीस वर्षीय पुरुष, २७ वर्षीय
महिला आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हे सर्व
रुग्ण मुंबई तसंच पुण्यातून हिंगोलीत आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
सांगितलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई
इथं काल एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. धारुर तालुक्यातल्या अंबेवडगाव इथला हा
६५ वर्षीय रुग्ण मुंबईहून आला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं
काम प्रशासनानं सुरु केलं आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात
आतापर्यंत ३७ रूग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या जिल्हात बारा रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर शहरातल्या
भाग्य नगर इथला एक, तर औसा इथल्या
दोन रुग्णांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात
काल सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत १०० रुग्ण बरे झाले असून, चार
जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, लातूर शहरातला पहिला कंटेनमेंट झोन असलेला लेबर कॉलनी परिसर कालपासून खुला
करण्यात आला. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या परिसरातल्या
रहिवाशांची भेट घेऊन प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आरोग्य विभागानं दिलेल्या निर्देशांचं नागरिकांनी स्वयंशिस्तीनं पालन करण्याचं आवाहनही महापौरांनी यावेळी केलं.
गेल्या १४ दिवसांत महानगरपालिकेनं राबवलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांनीही
समाधान व्यक्त केलं.
*****
आशा गटप्रवर्तक तसंच
अर्धवेळ स्त्री परिचरांना प्रत्येकी एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम
देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोना विषाणू संकटाच्या काळात त्यांनी
केलेल्या योगदानाबद्दल ही मदत दिली जाणार आहे. राज्यातल्या सुमारे १३ हजार ५०० आशा
गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. या कर्मचाऱ्यांना
चालू महिन्यातच या रकमेच्या वाटपाचे निर्देश जिल्हा
परिषदांना दिले असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आता सर्व
वहितीधारक शेतकऱ्यांना आणि वहितीधारक म्हणून नोंद असलेल्या या शेतकऱ्याच्या
कुटुंबातल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे सुमारे साडेतीन
कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या किंवा
दोन अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये,
आणि एक अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
****
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी या वर्षीच्या खरीप हंगामासाठी पिक कर्ज दर ठरवण्यात आला आहे. जिल्हातांत्रिक समितीनं काल झालेल्या बैठकीत हे दर निश्चित केले. यात प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रती हेक्टरी
एक लाख वीस हजार, द्राक्ष उत्पादकांना प्रती हेक्टरी तीन लाख
वीस हजार, तर कापूस-सोयाबीनसाठी
सत्तावन्न हजार, असे दर ठरवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मागणीनुसार कर्ज मिळणार असल्याचं जिल्हा
उपनिबंधक आर.आर. बडे यांनी सांगितलं.
****
जागतिक पर्यावरण दिन काल सर्वत्र
वृक्षारोपण करुन तसंच विविध उपक्रमांनी साजरा झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
राजभवन परिसरात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं
किमान एक रोप लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात काल कुलगुरु डॉ.
अशोक ढवण यांच्या हस्ते वडाच्या झाडाची लागवड करून जागतिक पर्यावरण दिन
साजरा करण्यात आला. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीनं आपण ऐतिहासिक
वळणावर असून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे, पर्यावरण साखळीत वृक्षांचं महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठ परिसरात वड,
पिंपळ, उंबर या सारख्या वृक्षांच्या लागवडीवरही
भर देण्यात येत असल्याचं कुलगुरु म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर
तालुक्यातल्या पालखेड इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच वर्षा जाधव यांच्या उपस्थितीत
वृक्षारोपण करण्यात आलं. जाधव यांनी गावातल्या ७५७ महिलांची आरोग्य तपासणी करून वटपौर्णिमा
साजरी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात करमाड पोलिस
ठाण्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं काल सटाणा परिसरात १६ वृक्षांचं रोपण
करण्यात आलं. महिनाभरापूर्वी याच परिसरात रेल्वेखाली चिरडून
मरण पावलेल्या १६ कामगारांच्या स्मरणार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या
हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आलं. या सर्व १६ झाडांचं उत्तमरित्या
संवर्धन होईल असं नियोजन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
****
लातूर महापालिका मुख्य कार्यालयाच्या
परिसरात जिल्हाधिकारी जी श्रीकांत, महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री,
विलासराव देशमुख यांचं हे ७५वं जयंती वर्ष असून, त्यानिमित्त शंभर पट अर्थात सात हजार ५०० वृक्ष लागवड करण्याचा निर्धार महापौरांनी
यावेळी व्यक्त केला.
उदगीर तालुक्यातल्या हत्तीबेट
पर्यटन स्थळाच्या डोंगरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण राज्यमंत्री संजय
बनसोडे यांनी वृक्षारोपण केलं. हत्ती बेटावर वन विकासासह
पर्यटन विकासाची कामं तत्काळ सुरू करावीत, या पर्यटन स्थळाच्या
विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
औसा तालुक्यात आमदार अभिमन्यू पवार यांनी वृक्षारोपण करुन वनक्षेत्राची पाहणी केली. मराठवाड्यात अत्यल्प वनक्षेत्र असल्यानं, वृक्ष संवर्धन
आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
पीक कर्जासाठीच्या अर्ज नमुन्यात
शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा
घेतला आहे. याबाबत संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव
पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कर्ज घेण्यासाठी
जात विचारण्याचा प्रकार निंदनीय असून, हे थांबवावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक
अस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक
व्यक्तीची थर्मल गन आणि ऑक्सिमिटरच्या सहाय्यानं शरीराचं तापमान आणि ऑक्सिजनची पातळी
तपासून त्याची नोंद घेण्यात येत आहे. या तपासणीत
एखाद्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आढळून आली तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात
येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण
इथंही आरोग्य विभागानं कोरोना विषाणू संसर्ग तपासणी मोहीम हाती घेतली
आहे. फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री
संदीपान भुमरे यांची तपासणी करून या मोहिमेची सुरुवात काल करण्यात आली.
****
२१ जून हा दिवस जागतिक योग दिन
म्हणून साजरा होतो. यंदा मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
योगदिनी मोठा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. आयुष मंत्रालयाकडून
यानिमित्तानं ‘माय लाईफ- माय योगा’
ही स्पर्धा तसंच योग प्रशिक्षकांच्या दररोज मार्गदर्शनासह विविध उपक्रम
राबवले जाणार आहेत. नागरिकांना आपल्या योगाभ्यासाची तीन मिनिटांची
चित्रफीत तयार करून माय लाईफ माय योगा या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमावर तसंच माय
गव्ह ॲपवर पाठवायची आहे. यासाठी विविध सहा गटांमध्ये एक लाख,
पन्नास हजार आणि २५ हजार रुपयांचे प्रथम, द्वितीय
आणि तृतीय पुरस्कार दिले जाणार आहेत. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना
प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव
फुले कर्जमुक्ती योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर १८ ऑक्टोबर २०१९ पासून
योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याजाची आकारणी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी
आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसंच व्यापारी बँकांनी व्याजाची आकारणी किंवा
मागणी केल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या
विद्यार्थ्यांना पदवी आणि उच्च शिक्षणात २७ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात यावं अशी मागणी
सकल भटक्या जमाती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ.धर्मराज
चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भातलं निवेदन त्यांनी काल परभणीचे
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलं.
****
परभणी जिल्ह्यात प्रवेश बंदी
उल्लंघन करत जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या पाच जणांना
सोनपेठ न्यायालयानं सात हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. वडीलांचं
निधन झाल्याचं खोटं सांगून तीन जणांनी जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.
अन्य एका घटनेत कारमधून विना मास्क फिरणाऱ्या दोघांना दंड ठोठावण्यात
आला.
****
औरंगाबाद शहरात कालपासून बाजारपेठ
सुरु झाली. मास्क न लावता बाजारात फिरणाऱ्यांना महानगरपालिकेच्या
वतीनं पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसात ४०० नागरिकांविरुद्ध कारवाई करत महानगरपालिकेनं एक लाख ४३ हजार १०० रूपये दंड वसूल केला
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
नळदुर्गमध्ये मराष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीनं
आयोजित रक्तदान शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केलं. उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय आरोग्य विभागाला
हे रक्त पुरवण्यात आलं.
*****
No comments:
Post a Comment