Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
खरीप हंगामातल्या सतरा पिकांचं किमान आधारभूत मूल्य ५० ते ८३ टक्क्यांनं
वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पीक कर्ज परतफेडीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
**
आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य
**
अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज
**
राज्यात दोन हजार ३६१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; ७६ जणांचा मृत्यू
**
औरंगाबाद शहरातही सहा रुग्णांचा मृत्यू, तर ४५ नवे रूग्ण.
**
हिंगोली, जालना, परभणी उस्मानाबाद आणि नांदेडमध्येही रुग्णांच्या
संख्येत वाढ
आणि
**एक दिवसाआड एका बाजूची व्यापारी प्रतिष्ठानं उघडी ठेवण्याच्या राज्य शासनाच्या
निर्णयाला औरंगाबाद व्यापारी महासंघाचा विरोध
****
येत्या
खरीप हंगामातल्या एकूण
सतरा पिकांचं किमान आधारभूत मूल्य
काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं. यामध्ये ५० ते ८३
टक्क्यांनं वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक ८३ टक्के वाढ ही बाजरीच्या किमान आधारभूत किमतीत करण्यात आली आहे. त्यानंतर उडीद
६४, तूर ५८, आणि मक्याच्या
किंमतीत
प्रतिक्विंटल ५३ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे. इतर १३ धान्याच्या भावातही ५० टक्क्यानं
वाढ करण्यात आली आहे. साधारण भात पिकासाठी प्रति क्विंटल एक हजार आठशे अडुसष्ट ते एक हजार आठशे अठ्ठ्यांऐशी रुपये, संकरित ज्वारीसाठी दोन हजार ६२० आणि मालदांडी वाणासाठी दोन हजार ६४०
रुपये, बाजरीसाठी दोन हजार एकशे पन्नास रुपये, रागीसाठी तीन हजार
२९५, मका एक हजार आठशे पन्नास, उडीद आणि
तुरीसाठी सहा हजार रूपये, मूग सात हजार १९६, भुईमूग पाच हजार २७५, सुर्यफूल पाच हजार ८८५,
सोयाबिन तीन हजार ८८०, तीळ ६ हजार ८५५,
कुळीथ सहा हजार ६९५, मध्यम धाग्याच्या कापसासाठी
पाच हजार ५१५ आणि लांब धाग्याच्या कापसासाठी पाच हजार ८२५ प्रतिक्विंटल याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत.
पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत
वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन
टक्के आणि तीन लाख रूपयांपर्यंतच्या अल्पकालीन कर्जावर देण्यात
आलेली दोन टक्के व्याज सवलत अशी एकूण पाच टक्क्यांची व्याजमाफी शेतकऱ्यांना मिळणार
आहे.
फेरीवाल्यांसाठी 'पीएम स्वनिधी' ही विशेष सूक्ष्म कर्ज योजना स्थापन
करण्यास आणि यातून या विक्रेत्यांना व्यवसायासाठी दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सात
टक्के व्याज सवलतीचे हे कर्ज
वर्षभरात मासिक हप्त्यात परत करावे लागणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग - एम एस
एम ईच्या व्याखेत बदल करत या योजनेतल्या
निकषांचा विस्तार
करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. लघु
उद्योगासाठी १० कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ५० कोटी रूपयांची उलाढाल तर मध्यम उद्योगासाठी
५० कोटी रुपयांची
गुंतवणूक आणि
२५० कोटी
रुपयांची उलाढाल असे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
****
आगामी
शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात
आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक शालेय शिक्षण
विभागानं काल जारी केलं. ज्या शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार
नाहीत, त्यांची मान्यता राज्य सरकार काढून घेईल, असं या आदेशात म्हटलं आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनात मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई, भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद - आयसीएसई, आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ - आयबी तसंच केंब्रिजसारख्या
आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. यावर्षी पहिली ते सहावीच्या इयत्तांना हा नियम लागू असेल.
****
विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत
११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एकोणाविस किलोच्या
सिलिंडरमध्ये दहा रुपये वाढ होऊन त्याची किंमत एक हजार ३३९ रुपये ५० पैसे इतकी झाली
आहे. हवाई इंधनाच्या किमतीतही सुमारे ५६
टक्क्यांनी वाढ झाली आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळचा
बहुतांश भाग मोसमी पावसानं व्यापला असल्याचं, हवामान
खात्यानं सांगितलं. देशात यंदा वेळेवर दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे या पावसाळ्यात सरासरी १०२
टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा काल ताशी १३ किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला
सरकला आहे. आज त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून उद्या हे निसर्ग चक्रीवादळ
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. यामुळे पुढचे दोन दिवस राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस
पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला मोठा तडाखा बसण्याची भीती वर्तवण्यात
येत आहे. सुमारे सव्वाशे किलोमीटर प्रतितास वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या
किनारपट्टीवरून दमणकडे जाण्याचा अंदाज आहे. राज्यात इतर जिल्ह्यातही या चक्रीवादळाच्या परीणामामुळे मध्यम
ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
गृह मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला.
हे चक्री वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरही धडक देण्याची शक्यता लक्षात
घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी काल रत्नागिरीत दाखल झाली. एनडीआरएफची एक तुकडी चिपळूण इथंही तैनात करण्यात आली आहे.
****
देशात कोविडग्रस्त रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक १९ शतांश टक्के एवढं झालं आहे. देशात या आजाराची लागण झालेल्यांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली आहे, यापैकी ९१ हजार
८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या ९३ हजार ३२२ रुग्णांवर देशात
उपचार सुरू आहेत. पाच हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला
आहे. देशातला या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर दोन
पूर्णांक ८३ शतांश टक्के एवढा असल्याचं, आरोग्य मंत्रालयानं
सांगितलं.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण सुमारे साडेतीन पटीनं
वाढून ४३ पुर्णांक ३५ टक्के एवढे झालं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे महिन्यात सर्वाधिक
रुग्ण बरे झाले असून, राज्यातला रुग्ण दुपटीचा कालावधी ११ दिवसांवरून
साडे सतरा दिवसांवर गेला असल्याचं ते म्हणाले. राज्य शासनानं हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेली
टाळेबंदी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे
परिश्रम त्यासोबतच केंद्र शासनानं रूग्णांना घरी सोडण्याचं जाहीर
केलेलं सुधारीत धोरण, यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचं टोपे
यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं ७० हजाराचा टप्पा पार केला आहे. काल दोन
हजार ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं राज्यातली एकूण रुग्णसंख्या ७० हजार १३ झाली
आहे. काल या आजारानं ७६ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात आतापर्यंत दोन हजार ३६२ कोरोना
विषाणू बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर काल ७७९ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३० हजार १०८ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद शहरात काल आणखी सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये
बायजीपुरा भागातला ६० वर्षीय पुरूष, मूळची
जळगाव जिल्ह्यातली यावलची पण सध्या एकनाथ नगरमध्ये
राहणारी ६६ वर्षीय महिला, बारी कॉलनीतला,
६३ वर्षीय पुरूष, बेगमपुऱ्यातली ६४ वर्षीय महिला, भाग्य नगरमधील ८० वर्षीय आणि समता नगरारमधील ७२
वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या आजारामुळे औरंगाबाद शहरात मृतांची संख्या ७८
झाली आहे.
दरम्यान,
जिल्ह्यात काल आणखी ४४ नवे विषाणू बाधित रुग्ण आढळले, यामध्ये भवानी
नगर आणि आझम कॉलनीत प्रत्येकी चार, नवी
वस्ती जुना बाजार आणि शिवशंकर कॉलनीत प्रत्येकी तीन, अहिंसा नगर, उल्का नगरी,
चिश्तिया कॉलनी, सिडको एन-आठ आणि एन-सहा, मुकुंदवाडी आणि नारेगावमध्ये प्रत्येकी दोन तर
रहेमनिया कॉलनी, उस्मानपुरा, कैलास नगर गल्ली नंबर तीन, पुंडलिक नगर, संजयनगर
गल्ली नंबर चार, युनूस
कॉलनी, शाह बाजार, एमजीएम हॉस्पिटल परिसर, बारी कॉलनी, टाऊन
हॉल, मिल कॉर्नर, मिसरवाडी परिसर,
हर्सुल परिसरातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. वैजापूरमध्येही काल दोन रूग्ण आढळून आले. जिल्ह्यात या आजाराचे आता
एकूण एक हजार ५८७ रुग्ण झाले आहेत. यापैकी
एक हजार ४९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. कालही १५ रुग्ण बरे होऊन घरी
परतले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल नवीन दोन कोरोना विषाणू
बाधित रुग्ण आढळले. यात मुंबईहून औंढा इथं आलेल्या १७ वर्षीय तरुणाचा तर वसमत
इथं विलगीकरण कक्षात असलेल्या १२ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. आतापर्यंत
हिंगोली जिल्ह्यात एकशे ब्याऐंशी रुग्ण आढळले असून त्यापैकी एकशे पाच रुग्णांना बरे
झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या
७७ रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.
****
जालना आणि अंबड शहरात काल प्रत्येकी एक कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एकशे अठ्ठावीस झाली आहे. जालना शहरातल्या मोदीखाना परिसरातली ३६ वर्षीय महिला
आणि मुंबईहून परतलेली अंबड इथली २१ वर्षीय गर्भवती महिला अंबड इथं न जाता जिल्हा रुग्णालयात
दाखल झाली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात चार जणांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल बाधित
असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ७७ वर
पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला असून २७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी
देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली
आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल चार विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये
मानवत तालुक्यातले तिघे जण तर एक जण जिंतूर तालुक्यातल्या डोंगरतळाचा रहिवाशी आहे.
जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ८६ झाली आहे.
***
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी तीन जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यामुळं जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या १४९ झाली आहे. तर कोरोना विषाणुची बाधा झालेल्या १६ रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी
देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत आठ
रुग्णांचा मृत्यू झाला असून १२० रुग्ण बरे होऊन
घरी गेले आहेत.
****
सोलापूर जिल्ह्यात काल ४३ नवे रूग्ण आढळून आले.
त्यामुळे जिल्ह्यात आता
एकूण ९९२ रूग्ण झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातही काल नव्यानं ४० जण
विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं.
****
नाशिक शहरात काल दिवसभरात २० नवे बाधित
रुग्ण आढळले. यामुळे एकूण शहरातली एकूण बधितांची संख्या २३४ झाली आहे. तर जिल्ह्यातली बधितांची संख्या एक
हजार २५५ झाली आहे.
दरम्यान,
वडाळा भागातल्या एका ट्रकचालकाचा यवतमाळमध्ये
मृत्यू झाला. हा ट्रक चालक रविवारी नाशिकहून यवतमाळला खत घेऊन गेला होता. त्याचा काल सकाळी मृत्यू झाला.
मृत्यूनंतर त्याचा अहवाल बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात
काल आठ नवीन
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सिंदखेडराजा
तालुक्यातल्या साखरखेर्डा इथं एक, मलकापूर शहरात चार धरणगाव इथं एक, तसंच
मोताळा तालुक्यातल्या शेलापूर खुर्द इथं दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली
आहे.
****
वर्धा शहरातल्या एका नागरिकानं ई-पास सेवेचा गैरफायदा
घेत २३ वेळा अर्ज केला. एकच व्यक्ती वारंवार अर्ज करून
बेकायदेशीरपणे रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात जात असल्याचं लक्षात येताच
त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात
ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं गृह विलगीकरण करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या
घरी पाच वैयक्तीक सुरक्षा किटस् पाठवण्याचा निर्णय नवी मुंबई
महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे. त्यामुळे
मृत कोविड रूग्णाच्या नातेवाईकांना अंत्यदर्शन घेता येणं शक्य होणार असून कोरोना संसर्गाच्या
धोक्यापासून त्यांचं संरक्षणही होणार आहे.
****
विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे
घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने
केली आहे. हा निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाला धरून नसल्याचं,
अभाविपने म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुण देणं आणि परिस्थिती निवळल्यानंतर
विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी एक संधी देण्याची घोषणा करणं, हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानदायक असल्याचं, अभाविपनं म्हटलं आहे.
****
राज्यात अद्याप परराज्यातले ३० हजार मजूर असून आठवडाभरात तेही आपापल्या राज्यात पोहचतील, अशी माहिती राज्याचे
अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली. यासाठी साधारण तीस
श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मे महिन्यात ७८१ विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांच्या
माध्यमातून ११ लाख ४० हजार मजूर आणि कामगार त्यांच्या राज्यात परतले असल्याचं करीर यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातल्या
४२ डॉक्टरांचा संघ मुंबईत आरोग्य सेवेसाठी दाखल झाला आहे. पुढचे १५ दिवस डॉक्टरांचा हा संघ मुंबईतल्या सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णसेवा
देणार आहे. कोविडग्रस्तांचं वाढतं प्रमाण पाहता, डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी राज्यातल्या
सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून काही डॉक्टर तसंच परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर मुंबईत
पाठवण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार हा संघ मुंबईत दाखल
झाला आहे.
****
येत्या पाच जून पासून एक दिवसाआड एका बाजूची व्यापारी प्रतिष्ठानं उघडी ठेवण्याच्या
राज्य शासनाच्या निर्णयाला औरंगाबाद व्यापारी महासंघानं विरोध केला आहे. काल व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहराची व्यापारी पेठ ही विखुरलेली असून ती मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक प्रमाणे सुनियोजित
नसल्यानं ग्राहकांना कोणत्या बाजूला कोणते दुकान आहे हे कळणे अवघड जाणार असून ते गैरसोयीचे
असेल असं व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे. प्रशासनानं हा निर्णय
जर व्यापाऱ्यांवर लादला तर विरोध करण्याचा आणि आवश्यकता भासल्यास आंदोलन करण्याचा निर्णय
या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, शहरातल्या सर्व आस्थापनांना थर्मलगन आणि ऑक्सिमीटर
ठेवणं आणि दुकानात येणाऱ्या नागरिकांची नियमित तपासणी करणं आवश्यक
करणयात आलं आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश महानगरपालिका
आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.
****
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये दिले आहेत. जिंतूरचे
तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे त्यांनी या निधीचा धनादेश सुपूर्द
केला.
दरम्यान खासदार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना यांच्या संयुक्त
विद्यमानं महारक्तदान शिबीर घेण्यात आलं. यावेळी ५००
जणांनी रक्तदान केलं. उस्मानाबाद इथंही भारतीय जनता पक्षाच्या
कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर
घेतलं.
****
नांदेड शहरात दुध केंद्र आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्या बालाजी
बैनवाड आणि अर्चना बैनवाड या पती पत्नींनी
आपल्या कमाईतून ५१ हजार रूपये मुख्यमंत्री सहायत्ता निधी साठी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्याकडे त्यांनी
हा धनादेश सुपुर्द केला.
****
परभणी शहरात गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ काल सुरू झाली. सकाळी ७ ते २ या वेळेत अत्यावश्यक सामानाच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात
मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं यावेळी दिसून आलं. यागर्दीत अनेक नागरिक मास्क न लावता फिरत
होते, तसंच सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन होतांना दिसत नव्हतं.
****
लातूर जिल्ह्यात काल रात्री जोरदार वादळी वारे आणि
विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल
रात्रभर संततधार सुरू होती. औरंगाबाद शहरातही काल तुरळक ठिकाणी पाऊस
पडला.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून लागू केलेल्या टाळेबंदीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून,
ब्यूटी पार्लर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी २२ मे पासून या व्यवसायांना परवानगी देण्यात आली होती.
अत्यंविधीस जास्तीत जास्त २० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं उदगीर तालुक्यातल्या
करडखेल इथं “मीच माझा रक्षक” या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद
अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाला. यावेळी
केंद्रे यांनी गावात परीसर स्वच्छता, वैयक्तिक
स्वच्छता, हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून
अंतर राखून काम करणे या नियमांचे पालन केले पाहिजे असं सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या कळका भागात ठिबक
सिंचनाद्वारे शेतजमिनीला पाणी देऊन नंतर हळद लागवडीला सुरूवात झाली आहे. हिंगोली
जिल्ह्यातही कळमनुरी तालुक्यात काल झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी हळद लावणीला
सुरूवात केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात काल दोन भावांचा पाण्यात
बुडून मृत्यू झाला. वझर इथं ही दुर्घटना घडली. काल सकाळी हे दोघे भाऊ धरणाजवळच्या
पाण्यात पोहण्यासाठी गेले असताना, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातही
किनवट तालुक्यात पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत, जामखेड तालुक्यांना कुकडी कालव्यातून उन्हाळी
आवर्तन मिळावं, यासाठी माजी जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे
यांनी काल कर्जत तहसील कचेरीसमोर उपोषण केलं. उन्हाळा संपून आता
पावसाळा तोंडावर आला, मात्र दुष्काळी असलेल्या या भागाला अद्यापही
उन्हाळी आवर्तन मिळालेलं नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.
कुकडी कालव्याचे अभियंता हेमंत धुमाळ यांनी ६ जूनला
या डाव्या कालव्यातून पाणी सोडलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.
****
नांदेड - अमृतसर ही विशेष सचखंड एक्सप्रेस काल सकाळी साडे दहा वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून साडे चारशे
प्रवासी घेऊन अमृतसरकडे रवाना झाली. टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या या पहिल्या रेल्वे गाडीत दक्षिण
मध्य रेल्वे विभागातून ९०० प्रवासी प्रवास करत आहेत. नांदेडच्या गुरुद्वारा लंगर साहेबमध्ये अडकून
पडलेले ६५ यात्रेकरू तीन महिन्यानंतर या रेल्वेतून घरी परत जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, परभणी इथून
६२ प्रवासी सचखंड रेल्वेनं काल रवाना झाले, येत्या दहा तारखेपर्यंत सचखंड रेल्वेनं परभणी तसंच पूर्णा
रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाला
सहकार्य करावं, असं आवाहन परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती
सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
सामाजिक वनीकरण विभागानं प्रत्येक गावात, शिवारात वृक्ष लागवड ही योजना राबवून रोजगार निर्मितीचे प्रयत्न करावेत असे
निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. लातूर
तालुका आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते काल बोलत होते.
महिला बचत गटातल्या सदस्यांना रोपवाटिका व्यवसाय
करण्याकरता प्रशिक्षण देण्यात यावं अशी सूचनाही त्यांनी
यावेळी केली.
****
हिंगोली जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या
पाच शासकिय आदिवासी आश्रमशाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात
आली आहे. कळमनुरी तालुक्यात गोटेवाडी, बोथी,
जामगव्हाण तर औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी आणि शिरडशहापूर इथल्या
आश्रमशाळांचा यात समावेश आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली
आहे.
****
मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने स्थलांतरित मजूरांना आणि बेघर व्यक्तींच्या
रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी ६० लाख २५ हज़ार अन्न पाकिटांचे मोफत वाटप टाळेबंदी
सुरु झाल्यापासून केलं जात होते. पालिकेसह विविध सामाजिक
संस्था, संघटना, राजकीय पक्ष, दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत अन्नाची पाकिटे तसेच अन्नधान्य याचेच वाटप अजूनही
केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टाळेबंदीनंतर देशातंर्गत विमानसेवेला प्रारंभ झाल्यावर हैदराबाद ते शिर्डी हे पहिलं
विमान काल शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं. या विमानातून ४१ प्रवाशांचे आगमन झाले. हे प्रवासी नाशिक,
औरंगाबाद आणि अहमदनगर
जिल्ह्यातले रहिवासी आहेत. विमानतळावर उतरल्यावर सर्व प्रवाशांना सॅनिटायझर पुरवण्यात आलं तसंच त्यांच्या बॅगा आणि इतर सामानाचं निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाचशे दहा ग्रामपंचायतींमध्ये महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत बारा हजार २५१ मजुर
काम करत आहे. कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या शासन निर्णयानुसार या मजुरांना काम देण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment