Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
मुंबईपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या दिशेनं
प्रवास सुरू; दुपारपर्यंत धडकण्याची शक्यता
**
चक्रीवादळाच्या सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाच्या दहा तुकड्या तैनात
**
राज्यात दोन हजार २८७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; दिवसभरात १०३ रुग्णांचा मृत्यू
**
औरंगाबादमध्येही सहा रुग्णांचा मृत्यू तर ६२ नवे रूग्ण
**
जालना, उस्मानाबाद, हिंगोली बीड आणि नांदेडमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ
**
विद्यापीठ कायद्यानुसार राज्यात पदवी, पदविका, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा
व्हायला पाहिजे- राज्यपालांची भूमिका
**
निसर्ग वादळाचा परिणाम, राज्यात अनेक भागात
पाऊस
आणि
**
राज्यात आजपासून टप्प्याटप्प्यानं टाळेबंदी शिथिलतेला सुरूवात
****
निसर्ग
चक्रीवादळ आज राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास
मुंबई - कोकण महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू असून सध्या ते अलिबागच्या दक्षिण- नैऋत्य
दिशेला दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबईपासून २५० किलोमीटर अंतरावर आहे. भारतीय
हवामान विभागानं आज पहाटे दिलेल्या माहितीनुसार हे वादळ ११ किलोमीटर प्रतिघंटा या वेगानं
महाराष्ट्राच्या दिशेनं येत असल्याचं सांगितलं. दरम्यान, मुंबईतला वाऱ्याचा वेग वाढला
असून २२ किलोमीटर प्रतिघंटा या वेगानं वारं वाहत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दुपारपर्यंत हे वादळ राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
या
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सांगितलं. ते काल सामाजिक माध्यमावरुन जनतेशी संवाद साधत होते. आजपासून जरी टाळेबंदीत
शिथिलता देण्यात आली असली, तरीही किनारपट्टीच्या भागातल्या नागरिकांनी आज आणि उद्या
घराबाहेर पडू नये, या भागात सर्व व्यवहार बंदच राहतील, असं त्यांनी सांगितलं. चक्रीवादळाचा
धोका लक्षात घेता नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाला सहकार्य करावं, नागरिकांनी
अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
नागरिकांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरच्या माहितीवर लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले.
मी
आपल्याला विनंती करतोय घराबाहेर असलेल्या सैल वस्तू बांधून टाका किंवा त्यांना घरामध्ये
हलवा दस्तऐवज किंवा आपल्या काही मौल्यवान गोष्टी असतील त्या व्यवस्थित एकत्र करून ठेवा
पाऊस आणि वादळ सुरू झाल्यानंतर अनावश्यक विजेची उपकरणे वापरून नका बॅटरीवर चालणारी
उपकरणं पॉवर बँक चार्ज करुन ठेवा स्थानिक प्रशासन सगळीकडे सज्ज आहे आणि वादळ एकदा धडकल्यानंतर
पुढे आपल्या भूप्रदेशात आल्यानंतर फिरत–फिरत कसा जाईल दिशा आपल्याला समजत जाईल तसं –तसं शासनाकडे आपल्याला सुचना येत राहतील
मुंबई
आणि किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल -
एनडीआरएफच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या
व्यतिरिक्त सहा तुकड्या राखीव असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
आर्मी,
नेव्ही,एअरफोर्स या सगळ्यांना आपण सज्ज राहणाचे
इशारे दिलेले आहेत पण त्याप्रमाणे आपण एनडीआरएफच्या पंधरा तुकड्या एसडीआरच्या चार तुकड्या
अशा एकूण १९ तुकड्या जिथे– जिथे आवश्यकता आहे तिथे आपण त्यांना तैनात
केलेले आहेत अतिरिक्त मदत म्हणून आणखी पाच तुकडे आपण तयार ठेवलेल्या आहेत त्याच बरोबरीने
केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी आपल्यासोबत आहे
नागरिकांनाही
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. रायगड किनारपट्टीवरच्या ६० गावांमध्ये सुमारे एक
लाख ७३ हजार नागरिक राहत आहेत. इथं कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासन
प्रयत्नशील आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर
दुसरी अलिबागला तैनात आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या पाच हजार ६६८ मच्छिमारांना
परत बोलावून घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी,
दमण दीव, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशी चक्रीवादळासंदर्भात आणि
उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. केंद्राकडून राज्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल,
असं पंतप्रधानांनी आश्वासन दिलं.
****
या
चक्रीवादळाचा मुंबईच्या बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स- बीकेसीमधल्या कोविड उपचार केंद्रालाही
धोका असल्याची शक्यता असल्यानं या केंद्रामधल्या रुग्णांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात
आलं आहे.
दरम्यान,
या चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टी,
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही या वादळाचे परिणाम जाणवणार असून, जोरदार पावसाचा इशारा
हवामान खात्यानं दिला आहे.
****
दरम्यान,
वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या पालघर जिल्ह्यातही सर्व यंत्रणा सुरक्षेची
काळजी घेत आहे, अधिक माहिती देत आहे, आमच्या वार्ताहर
या चक्रीवादळाचा फटका पालघर
जिल्ह्यातल्या वसई,पालघर, डहाणू आणि तलासरी या चार तालुक्यातल्या समुद्र काठालगत वसलेल्या
जवळपास २२ गावांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पालघर आणि डहाणू तालुक्यात
पुण्याहून प्रत्येकी एक एनडीआरएफच्या टीमला तर वसई तालुक्यात एसडीआरच्या दोन टीमला
तैनात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले
उद्योग, दुकान, खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी
डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली आहे
चक्रीवादळामुळे
बाधित होणाऱ्या गावांमध्ये सखल भाग आणि कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित
ठिकाणी निवारा छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे
आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चौरे पालघर
****
दरम्यान,
नैऋत्य मोसमी पाऊस येत्या सहा तारखेपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान
खात्याकडून ही माहिती देण्यात आली. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण
झालेली स्थिती पूर्ववत झाल्यानंतर मोसमी पावसाची पुढे वाटचाल होईल, पाच जूननंतर हा
बदल अपेक्षित असल्याचं, हवामान खात्यानं सांगितलं आहे.
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व नागरिकांना मोफत उपचार देणाऱ्या
महात्मा फुले जन आरोग्य योजनेला राज्य मंत्रिमंडळानं काल कार्योत्तर मंजुरी दिली. राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत राज्यातल्या ८५ टक्के नागरिकांचा
या योजनेत समावेश होता. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना लागू असेल.
मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठासाठी प्रत्येकी एक विधी सेवा समिती
आणि उप समिती सचिव पदांची निर्मिती करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे
लोक न्यायालयं, पर्यायी वादनिवारण केंद्र, सर्व तालुका तसंच गावपातळीवरील विविध विषयांवरील
जनजागृती, विधी साक्षरता शिबिरं तसंच प्रशिक्षण शिबिरं असे उपक्रम राबवण्यात येऊन प्रलंबित
प्रकरणांची संख्या कमी करता येईल.
ठाणे
इथं एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास, तसंच केंद्र शासनाच्या दिल्ली-मुंबई
औद्योगिक मार्गिका प्रकल्पातल्या दिघी औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिसूचित झालेलं क्षेत्र
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकसित करण्यासही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली.
दरम्यान,
या बैठकीत कोरोना विषाणू प्रादुर्भावावर उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. मुंबईतल्या खासगी
रुग्णालयांनी राज्य शासनाच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या शासनाच्या आदेशाचं काटेकोर
पालन करावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यासाठी अशा सर्व रुग्णालयांमध्ये
पालिकेने अधिकारी नियुक्त करून नियंत्रण करावं आणि रुग्णांची हेळसांड होणार नाही याची
काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
राज्यात
काल दोन हजार २८७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातल्या एकूण
रुग्णांची संख्या ७२ हजार ३०० एवढी झाली आहे. काल दिवसभरात १०३ रुग्णांचा मृत्यू झाला,
यात मुंबईतल्या ४९ मृतांचा समावेश आहे. यामुळे राज्यातल्या एकूण मृतांची संख्या दोन
हजार ४६५ एवढी झाली आहे.
दुसरीकडे
या आजारातून मुक्त झालेल्या एक हजार २५५ रुग्णांना काल घरी सोडण्यात आलं. सध्या राज्यभरात
३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
****
औरंगाबाद
शहरात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतात चार पुरूष तर दोन
महिला रुग्ण आहेत. यामध्ये शहागंजमधील ५४ वर्षीय, कैलासनगरमधील ५६ वर्षीय, गणेश कॉलनीतला
६१ वर्षीय तर गारखेडा परीसरातल्या खिवंसरा पार्कमधील ६४ वर्षीय पुरूषाचा आणि बायजीपुऱ्यातली
५५ वर्षीय आणि गौतम नगरमधली ६९ वर्षीय महिलेचा,
समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या आजारानं ८४ जण मृत्युमुखी पडले आहेत.
दरम्यान,
काल जिल्ह्यात आणखी ६२ बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या
ही एक हजार ६४९ एवढी झाली आहे.
काल
आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन-सहा संभाजी कॉलनीतले सात, समता नगरात सहा, मुकुंदवाडी
संजय नगरमध्ये चार, जवाहर नगरमध्ये तीन, किराडपुरा, भीमनगर, शिवशंकर कॉलनी, नाथनगर,
बायजीपुरा, आणि विजय नगरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. शहा बाजार, चंपा चौक,
कटकट गेट, नारळीबाग, गणेश कॉलनी, हमालवाडी, ज्योती नगर, फाजलपुरा परिसर, मिल कॉर्नर, सिडको एन-३, एमजीएम परिसर, रोशन गेट,
गारखेडा परीसर विशालनगर, अंहिसा नगर, मुकुंदवाडी, विद्या निकेतन कॉलनी, न्याय नगर, चंपा चौक, म्हाडा कॉलनी, नेहरु नगर, जुना मोंढा
नाका परिसर, सिडको वाळूज महानगर, तक्षशील नगर, रहेमानिया कॉलनी, राजा बाजार, कोतवालपुरा
आणि भाग्यनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. याशिवाय पैठणमध्ये यशवंतनगर भागातही एक
रुग्ण आढळला आहे.
दरम्यान,
काल उपचारानंतर बरे झालेल्या आठ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत जिल्ह्यात एक
हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत.
****
जालना
जिल्ह्यात आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण रुग्णांची संख्या आता १५३ झाली आहे.
दरम्यान,
शहरातल्या मोदीखाना भागातल्या एका ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू
झाला, त्यामुळे जालना जिल्ह्यात आता कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्यांची संख्या दोन
झाली आहे.
दरम्यान,
एका कोविडग्रस्त तरुणाला गृह विलगीकरणात राहण्याचे निर्देश असतानाही त्यानं एका लग्नसमारंभाला
हजेरी लावल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या
या तरुणाच्या संपर्कातल्या काहींचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आला होता. त्यामुळे
या तरुणाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला कोरोना विषाणू संसर्ग
झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याविरुध्द जालना सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात
आला आहे
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल आणखी ११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातल्या उस्मानपुरा
भागातले आठ, कळंब इथले दोन, तर शिराढोण इथला एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या ८८ झाली आहे. आतापर्यंत ३२ जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. तर तिघांचा
मृत्यू झाला.
****
हिंगोली
शहरात रिसाला बाजार भागातल्या एका चाळीस वर्षाच्या पुरुषाला या विषाणूची लागण झाल्याचं
काल स्पष्ट झालं. तर बीड जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
बीड तालुक्यातल्या बेलापुरी आणि गेवराई तालुक्यातल्या सिरसदेवी इथले हे रुग्ण आहेत.
हे दोघेही मुंबईहून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ६५ झाली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधा झालेले दोन नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एकूण
रुग्णांची संख्या आता १५१ झाली आहे. काल आढळून आलेल्या रुग्णात एक सात वर्षे वयाची
मुलगी तर एका चार वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.
दरम्यान,
शहरातल्या करबला नगर भागातल्या सहा महिन्याच्या बाळानं काल कोरोना विषाणूवर मात केली.
या मुलीला काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
विद्यापीठ
कायद्यानुसार राज्यात पदवी, पदविका, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा व्हायला
पाहिजे, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. विद्यापीठांचे कुलपती या नात्याने
परिक्षांसदर्भातला निर्णय राज्यपाल घेतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व विद्यापीठांच्या
कुलगुरुंनी परिक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र मे महिन्यात झालेल्या बैठकीसंबंधी
कुलपतींना कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असंही राज्यपालांनी म्हटलं आहे.
****
राज्यातल्या
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबात आरोग्य विज्ञान विद्यापीठानं
तातडीन निर्णय घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप
म्हैसेकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आणि या परीक्षांबाबत असलेली अनिश्वितता लवकरात
लवकर दूर करण्यास सांगितलं आहे.
****
निसर्ग
वादळाचा परिणाम राज्यात सर्वत्र जाणवत असून काल अनेक भागात पाऊस झाला. मराठवाड्यात
अनेक ठिकाणी काल पाऊस पडला. औरंगाबाद शहरासह गंगापूर, पैठण, ढोरकीन, आडुळ, बालानगर
आणि वाळूज परीसरात काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड शहरातही हलका ते
मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही
अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणी शहरात पावसाची संततधार सुरु
होती, तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या पाटणसांगवी, बावी, धामणगाव या परिसरात
मुसळधार पाऊस झाला. सांगवी गावात नदीचा बांध फुटल्यानं या परिसरातल्या शेतातली माती
वाहून गेली. या नदीला पूर आला आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आणि अनेक तालुक्यात काल
दुपारी जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोकण किनारपट्टीवर
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.
****
राज्यात
टाळेबंदीच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया
आजपासून सुरू झाली आहे. आजपासून राज्यभरातल्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी, मॉर्निंग
वॉकसाठी, सायकल चालवण्यासाठी, धावण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
घराबाहेर पडता येईल. याशिवाय प्लंबर, इलेक्ट्रिशियन, निर्जंतुकीकरण करणारे, गॅरेज आणि
इतर तंत्रज्ञांनाही सेवा सुरू करता येतील.
****
विद्यापीठाच्या
अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नसल्यानं विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा
शुल्क परत करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी
शैक्षणिक वर्ष २०१९ - २० च्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क भरलं होतं, अशा सर्वच विद्यार्थ्यांचं
परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावं, जेणेकरून ‘टाळेबंदीमध्ये या पैशाचा विद्यार्थी
आणि त्यांचा कुटुंबीयांना आर्थिक हातभार मिळेल. यासंदर्भात त्वरीत योग्य निर्णय घ्यावा
अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाला आमदार प्रशांत बंब यांनी पायाचा उपयोग
करून हात धुण्याचे यंत्र आणि सॅनिटायझर यंत्र भेट दिलं आहे. या मध्ये हात धुण्यासाठी
नळाला हात लावण्याची गरज नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार
आहे. हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि दवाखान्यात येणारे रुग्ण
या यंत्रणेचा वापर करत आहेत. आमदार बंब यांनी अशी दोन यंत्रं रुग्णालयाला भेट दिली
असल्याचं नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी
सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरूद्ध पोलिस दंडात्मक कारवाई करत
आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर
एकाच व्यक्तीनं, तर तीन आणि चार चाकी वाहनांनी चालक, आणि दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास
परवानगी दिली आहे. मात्र, शहरात अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून
आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
****
औरंगाबाद
शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोविड स्वयंसेवकांना आयुक्त
चिरंजीव प्रसाद यांनी काल जनजागृतीबाबत मार्गदर्शन केलं. आजपासून शहरातली सर्व दुकानं
सुरू होणार असून या स्वयंसेवकांनी आपआपल्या गल्लीत, वार्डात नागरिकांमध्ये गर्दी न
करणं, मास्क वापरण्याबाबत, वारंवार हात धुण्याबाबत आणि एकमेकातलं अंतर राखण्यासाठी
ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यास सांगितलं आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीककर्ज नोंदणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती. पीककर्जाच्या ऑनलाईन अर्जाची लिंक जालना
डॉट एनआयसी डाट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७७ हजार
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी नोंदणी केली असून, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
माध्यमातून ६६ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप पूर्ण झालं आहे. खरीप हंगामासाठी
जिल्ह्याचं पीक कर्ज वाटपाचं एकूण उद्दीष्ट एक हजार ११५ कोटी रुपये इतकं आहे.
****
अमरावती
जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका मूकबधिर महिलेची आधार प्रणालीच्या माध्यमातून
ओळख पटवून तिला तिच्या मूळ गावी पाठवण्यात आलं आहे. मूकबधिर असलेल्या या कामगार महिलेची
भाषा समजत नव्हती तसंच तिला स्वतःबद्दल कोणतीही माहिती सांगता येत नव्हती. अशा परिस्थितीत
तिच्या हाताच्या बोटाच्या ठशाच्या मदतीने प्रशासनानं आधार प्रणालीवर तिची ओळख पटवण्यात
यश मिळवलं. आंध्रप्रदेशातल्या कर्नुलची ती रहिवाशी निघाली. त्यानंतर पालकमंत्री यशोमती
ठाकूर यांनी तिला तिच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली.
याविषयी
माहिती देतांना मंत्री ठाकूर म्हणाल्या..
एक
महिला ती मुक बधिर होती अमरावती मध्ये तिला उतरून दिलं की तिला मागं सोडून दिलं तिला
न बोलता येत होतं तिला न ऐकू जात होतं आणि कुठणं आलेली आहे हे कोणालाच समजत नव्हते
तर प्रशासनानं आम्हाला खूप मदत केली तिच्या बोटांच्या ठस्सावरून तिच्या आधार कार्डचा
पत्ता लागला आणि त्या आधार कार्डच्या मदतीमुळे आज तिला तिच्या गावी पाठवू शकलो
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथं राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू होतील त्या कालावधीतच संतपीठ
सुरू करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उच्च तथा तंञ शिक्षण
विभागानं पुढाकार घ्यावा, अशी मागणी वारकरी संघटनेचे दिनेश पारीख, चंद्रकांत अंबिलवादे,
विठ्ठलशास्ञी चनघटे, बाबासाहेब ढवळे आदींनी केली आहे. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात
या संतपीठसाठीची इमारत बांधून तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर शहरातल्या बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी एक दिवसाचं
वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिलं असून, या रकमेचा धनादेश त्यांनी काल तहसिलदार
सुरेश शेजुळ यांच्याकडे सुपुर्द केला.
****
परभणी
शहरात महानगर पालिकेच्या वतीनं बचत गटाच्या माध्यमातून कोरोना विषाणू प्रादुर्भावावर
प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ५०० बचत गटाद्वारे हा उपक्रम
राबवला जात आहे.
****
औरंगाबाद
इथं शिवसेनेच्या वतीनं काल २७ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी २५२ जणांनी
रक्तदान केलं.
****
लातूर
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीनं गरजुंना जीवनावश्यक आणि अन्नधान्याच्या
कीटचं वाटप काल खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
आषाढ
वारीसाठी यावर्षी पैठणहून संत एकनाथ महाराजांची पायी पालखी रद्द करण्याचा निर्णय पालखी
प्रमुख नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी यांनी घेतला आहे. प्रस्थानची परंपरा खंडित होऊ
नये यासाठी नियोजित दिवशी पालखी प्रस्थानचा कार्यक्रम होणार असून, पुढचे १८ दिवस पालखीचा
मुक्काम संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात राहणार आहे. आषाढी वारीच्या दिवशी हेलिकॉप्टर
किंवा बसने नाथांची पालखी आणि पादुका पंढरपूरला पोहोचणार असल्याचं गोसावी यांनी सांगितलं.
दरम्यान,
हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नमादेव इथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत नामदेव
महाराजांच्या पालखीसाठी प्रशासनानं वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी मंदीर विश्वस्तांनी
केली आहे. याबाबतचे निवेदन श्री संत नामदेव मंदिर संस्थाननं जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं
आहे.
****
दरम्यान
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून १५५ किलोमीटर तर मुंबईपासून
दोनशे किलोमीटर पर्यंत आले आहे १२ किलोमीटर प्रति वेगाने
ते महाराष्ट्राकडे सरकत असल्याचा हवामान विभागाने काही वेळापूर्वी जारी केलेल्या माहितीत
म्हटले आहे.
****
No comments:
Post a Comment