Wednesday, 3 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 03 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०३ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास रायगड जिल्ह्यात अलिबाग नजिक किहीमच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज आहे. समुद्र किनाऱ्यावरील ६८ गावं तसेच खाडी भागातल्या १२८ गावांमधल्या ११ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. किनारपट्टीच्या भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफ आणि अन्य सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून अलिबागमधला वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या जनतेनं काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.
****
निसर्ग चक्रीवादळाच्या परिणामी नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे, सकाळी साडे आठ वाजेपर्यंत १७ पूर्णांक ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खाडिकिनारी वसलेल्या नवी मुंबई शहरातल्या सर्व जेट्टींवर खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. ८ विभागांमध्ये नागरी निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
पालघर जिल्ह्यात काल पासून पावसाची रिपरिप सुरच आहे. पालघर, सातपाटी, बोईसर, धनानीनगर भागांत रात्री पासून पाऊस आहे.
****
सातारा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या महाबळेश्वर, जावली, वाई पाटण या तालुक्यातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयानं केल्या आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण बाधितांची संख्या १ हजार सहाशे शहाण्णव झाली आहे. यापैकी १ हजार पंच्याऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १५४ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****


No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...