Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात टाळेबंदी शिथिलतेचा
दुसरा टप्पा आजपासून सुरु, सर्व प्रकारची दुकानं
एक दिवसाआड उघडता येणार. टॅक्सी, कॅब, रिक्षा वाहतुकीलाही परवानगी
** निसर्ग चक्रीवादळाचा जोर
ओसरला, नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
** महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठाच्या १५ जुलैपासून परीक्षा घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजुरी
** राज्यात आणखी दोन हजार
९३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, १२३ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद जिल्ह्यात चार
जणांचा मृत्यू तर नवे ६५ रुग्ण.
** जालन्यातही एकाचा मृत्यू
तर उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणीत रुग्णांच्या संख्येत वाढ
** राज्यात १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या
निवडणुका स्थगित तर मुदत संपलेल्या एक हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा
निर्णय
आणि
** प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
बासू चॅटर्जी यांचं निधन
****
राज्यात टाळेबंदी शिथिलतेचा
दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. त्यानुसार सर्व प्रकारची दुकानं एक दिवसाआड एका
बाजूची यानुसार सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. याशिवाय
टॅक्सी, कॅब, रिक्षा वाहतुकही आजपासून सुरु होईल.
औरंगाबाद जिल्ह्यातही आजपासून
व्यापारी प्रतिष्ठानं सुरु होत आहेत. याविषयांच्या नियमांची जिल्हाधिकारी उदय चौधरी
यांनी माहिती दिली. ते म्हणाले.
जे काय मार्केट आहे त्यामध्ये मॉल सुरु होणार नाही सिनेमा थेटर
सुरू होणार नाही किंवा मोठ्या बाजारपेठांमध्ये कॉम्प्लेक्स ते कॉम्प्लेक्स च्या ठिकाणी
सुरु होणार नाही आणि या सेवा सकाळी नऊ संध्याकाळी पाच पर्यंत सुरू राहतील आणि या ठिकाणी
गर्दी होऊ नये याकरिता शासनाने सांगितलेला आहे की आपण एक नियम करून घ्यायला पाहिजे
आपण स्वतःवर बंधन घालायला पाहिजे जेणेकरून अचानक एका मार्केटमध्ये गर्दी होणार नाही
एका लाईन चे दुकान लेफ्ट हँड साईडचे एका दिवशी ५०% सुरू ठेवा आणि ते राईट हँड साईट
चे दुकान आहेत ५०% ते एका दिवशी सुरू ठेवा
तर अशा पद्धतीने जे आहे ते दुकान सुरू करू शकतो
दरम्यान, राज्य शासनाच्या
या निर्णयाला औरंगाबाद व्यापारी महासंघानं विरोध दर्शवला आहे. औरंगाबाद शहराची व्यापारी
पेठ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक प्रमाणे सुनियोजित नसल्यानं, कोणत्या बाजूचं दुकान
सुरू आहे, हे ग्राहकाला नेमकं कळणं अवघड जाणार असून ते गैरसोयीचे ठरेल असं व्यापारी
महासंघाचं म्हणणं आहे. प्रशासनानं हा निर्णय व्यापाऱ्यांवर लादला तर त्याला विरोध करण्याचा
आणि आवश्यकता भासल्यास आंदोलन करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
दरम्यान, या अनुषंगानं पोलिस
आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल शहरातल्या पुंडलीकनगर आणि जवाहर कॉलनी परिसरातल्या
नागरिकांची बैठक घेतली. शासनाच्या नियम आणि अटींना अधीन राहूनच दुकाने सुरु करावीत,
असं आवाहन त्यांनी यावेळी व्यापाऱ्यांना केलं.
****
राज्यातून मध्यप्रदेशात गेलेल्या
निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. मध्यप्रदेशच्या दक्षिण भागात काल ते पोहोचलं. त्यामुळे
या भागात तसंच महाराष्ट्रात विदर्भ भागात पावसाचं प्रमाण वाढलं आहे.
दरम्यान, या चक्रीवादळामुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना
तातडीनं मदत करता येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी
काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा
घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब
पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा, त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचं
मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा श्रीवर्धन,
हरिहरेश्वर भागातल्या आंब्यांच्या बागांना मोठा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण
तालुक्यातही या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं. विजेचे खांब कोसळल्यानं खंडीत झालेला
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू असल्याचं, अधीक्षक अभियंता विनोद
पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा येत्या १५ जुलैपासून
घेण्यात येणार आहेत. परिक्षेसंदर्भात विद्यापीठानं सादर केलेल्या आराखड्याला राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी
काल राज्यपालांची भेट घेऊन विद्यापीठ परिक्षा घेण्यास अनुकूल असल्याचं सांगितलं. विद्यापीठाकडून
परिक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असं देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम.एस.
पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या आणि तत्सम सर्व पदवी विद्याशाखांच्या
परीक्षा घेण्यात येणार आहेत.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल जारी केल्या. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये
कोविड संसर्गाला प्रतिबंध करणं, हा या मागचा उद्देश आहे.
****
देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं
बरे होण्याचं प्रमाण ४७ पूर्णांक ९९ शतांश टक्के एवढं झालं आहे. देशातली या संसर्गाची
रुग्ण संख्या दोन लाख १६ हजार ९१९ झाली असून, आतापर्यंत एक लाख चार हजार १०७ रुग्ण
बरे होऊन घरी परतले आहेत. या आजारामुळे आतापर्यंत सहा हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे.
****
राज्यात काल आणखी दोन हजार
९३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ७७ हजार ७९३
झाली आहे. काल या आजारानं १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत दोन हजार ७१०
जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल राज्यभरात एक हजार ३५२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात
आलं. राज्यात एकूण ३३ हजार ६८१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
मुंबईत काल एक हजार ४४२ नवे
रुग्ण आढळले, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात २४३ नवे रुग्ण सापडले तर १३ जणांचा
मृत्यू झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल चार
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रोशन गेट इथला ८५ वर्षीय पुरुष
आणि ५० वर्षीय महिला, समता नगरमधला ४३ वर्षीय पुरुष आणि कैसर कॉलनीतला ६४ वर्षी्य पुरुषाचा
समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
काल दिवसभरात ६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या
एक हजार ७६९ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन सहा मधल्या संभाजी कॉलनीत
सहा, शिवशंकर कॉलनीत पाच, राजा बाजार चार, सिडको एन सात मधल्या आंबेडकर नगर तसंच गारखेडा
परिसरातल्या अजिंक्य नगरमध्ये प्रत्येकी तीन, बेगमपुरा, रोशन गेट, चेतना नगर, सिडको
एन फोर मधलं समृद्धी नगर, आणि गणेश कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. लेबर कॉलनी, पडेगाव,
बायजीपुरा, हर्सुल, भारतमाता नगर, मुकुंदवाडीतलं संजय नगर, देवळाई चौक, समर्थ नगर,
शिवाजी कॉलनी, सईदा कॉलनी, सिडको एन-सात, एन-टू मधलं विठ्ठल नगर, विनायक नगर, जवाहर
कॉलनी, बारी कॉलनी, गारखेड्यातलं हनुमान नगर, विजय नगर, मील कॉर्नर, सिडको एन फोर,
क्रांती नगर, अयोध्या नगर, न्यू हनुमान नगर, कैलास नगर, सिडको एन वन, पडेगावमधलं सुंदर
नगर, कटकट गेट, नेहरू नगर, जय भवानी नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. अन्य भागातले
सहा रुग्ण आहेत.
दरम्यान, काल औरंगाबाद इथं
१३ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १२६ जण कोरोना
विषाणू मुक्त झाले आहेत, ५५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी
१६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. मंठा तालुक्यातल्या नानशी इथले आठ, केंधळी
इथले दोन आणि वैद्य वडगाव इथं एक, जालना शहरातल्या मोदीखाना इथं चार, खासगी रुग्णालयात
एक, तर जालना तालुक्यात एक रुग्ण आढळला. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १७५
झाली आहे.
दरम्यान, जालना शहरातल्या
लक्ष्मीनारायणपुरा भागातल्या कोरोना विषाणू बाधित साठ वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला.
त्यामुळे जिल्ह्यात या आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
***
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद शहरातल्या काका नगर इथले सात,
कळंब तालुक्यातल्या शिराढोण इथले दोन, तर भूम तालुक्यातल्या सोन्नेवाडी इथला एक रुग्ण
आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. ४६ जण बरे झाले असून,
तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल १३ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर इथून १३ कोविड positive रुग्ण त्यांच्यावर यशस्वी उपचार करुन त्यांना काल discharge केलेलं आज
ही आपल्याकडे २५ रुग्ण आहेत ते treatment घेत आहे या रुग्णांची प्रकृती चांगली आहे.त्यामधील ८ ते १० रुग्णांना
ऑक्सीजन लागत बाकी सगळे व्यवस्थित आहेत वैद्यकीयामध्ये आम्ही २८ च्या २८ व्यक्तीचे
sample negative आलेले आहेत
****
नांदेड जिल्ह्यात काल सात
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या १८२ झाली आहे.
जिल्ह्यात १२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर या संसर्गामुळे आतापर्यंत आठ रुग्णांचा
मृत्यू झाला. सध्या ४८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी
तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. सेनगाव तालुक्यातल्या चोंडी खुर्द इथं
एक, तर वसमत तालुक्यातल्या हयातनगर इथं विलगीकरण कक्षात असलेल्या दोन जणांचे अहवाल
काल बाधित असे आले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १८६ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल दहा
रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत
१६१ रुग्ण विषाणू मुक्त झाले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल आणखी
तीन बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे परभणी जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची संख्या
आता ८९ झाली आहे. या नव्या रुग्णांमध्ये परभणी शहरातल्या मिलिंद नगर इथला एक, पाथरी
तालुक्यातल्या रामपुरी इथं एक, तर सोनपेठ तालुक्यात खपाटपिंप्री इथल्या एका रुग्णाचा
समावेश आहे. रामपुरी तसंच खपाटपिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनानं
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे.
****
सोलापूर मध्ये ६४, सांगली
मध्ये चार, सातारा आठ, वाशिम तीन, धुळ्यात आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली.
****
सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण यांना काल कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात
आलं होतं.
****
राज्यात येत्या जुलै ते डिसेंबर
दरम्यान होणाऱ्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असल्याचं
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. निवडणुकांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर
गर्दी होण्याची शक्यता असल्यानं या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य शासनानं राज्य
निवडणूक आयोगाकडे केली होती, त्यानुसार आयोगानं हा निर्णय घेतला. ज्या ग्रामपंचायतींची
मुदत संपेल त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्याची सूचना आयोगान केली आहे.
यानुसार एप्रिल, मे आणि जून मध्ये मुदत संपलेल्या एक हजार ५६६ ग्रामपंचायतींवरही प्रशासक
नेमण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक
बासू चॅटर्जी यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. वृद्धावस्थेमुळे गेल्या
काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते, काल पहाटे झोपेतच त्यांचं निधन झालं. त्यांच्या
पार्थिवावर सांताक्रूझ इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यमवर्गीयांच्या
दैनंदिन जीवनातला संघर्ष आपल्या चित्रपटातून सजीव करणारे बासू चॅटर्जी यांनी एका दैनिकात
व्यंगचित्रकार म्हणून प्रारंभी काम केलं, राजकपूर आणि वहिदा रहमान अभिनीत 'तीसरी कसम'
या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेले,
चितचोर, पिया का घर, खट्टा मिठा, बातों बातोमें आदी चित्रपट आणि त्यातली सुमधूर गाणी
आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. बासू चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र
मोदी, माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या
उंबडगा इथं मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसानं झालेल्या नुकसानीची औशाचे आमदार अभिमन्यू
पवार यांनी काल पाहणी केली. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरातलं बी बियाणं आणि
खतांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन पुढील कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या
आहेत.
****
औरंगाबाद शहर आणि परिसरात
काल दुपारी मुसळधार पाऊस झाला.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
परवा रात्रीपासून काल पहाटेपर्यंत वाहत असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं
उन्मळून पडली. सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजेचे खांब कोसळले. अनेक घरांवरचे पत्रे
उडाले, यात काही जनावरांना मार लागला, मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
कन्नड तालुक्यात अंधानेर
इथंही विद्युत खांब तसंच झाडं पडल्याचं वृत्त आहे.
औरंगाबाद शहरातही विविध भागात
आठ झाडं पडली, यामुळे काही चारचाकी गाड्यांचं तसंच घरांचं नुकसान झालं. दोन ठिकाणी
विजेच्या खांबांवर झाडं कोसळल्यानं, विद्युत पुरवठा खंडीत झाला
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव
इथं बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी कृषी विभागाच्या मदतीनं ताब्यात
घेतलं आहे. या दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने
दिले आहे .
****
राज्य परिवहन महामंडळानं
बसमधून प्रवासी वाहतुकी सोबतच मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
कळंब, उस्मानाबाद, भूम, परांडा, तुळजापूर, उमरगा या सहा आगारातल्या काही बसमधली आसनं
काढून त्यातून मालवाहतुक केली जाणार आहे. या बसमधून शेतमाल, फळं तसंच किराणा व्यापाऱ्यांच्या
मालाची वाहतूक राज्यात केली जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका आरोग्य
विभागाच्या वतीनं सहा नियंत्रण क्षेत्रातल्या सर्व नागरिकांची ऑक्सिमीटर द्वारे तपासणी
करण्यात येत आहे. ऑक्सिमीटरचा वापर केल्याने अधिक प्रभावी सर्वेक्षण करता येत असल्याची
माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिली.
****
औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा
पुढील काही दिवस विस्कळीत होणार असल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात
नमूद केलं आहे. नक्षत्रवाडी पंपगृह इथला आणि सिडको एन ५ पंपगृह इथला विद्युत पुरवठा
वादळी पावसानं सुमारे अकरा तास खंडीत झाल्यानं पाणी उपसा बंद झाला होता. त्यामुळे पाणी
वितरणावर परिणाम होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
लातूर शहरातल्या सर्व मोठ्या
नाल्यांची सफाई कामं येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश महापौर विक्रांत गोजमगुंडे
आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत
त्यांनी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नालेसफाईसाठी अधिक मनुष्यबळ
वाढवून कामं तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
****
परभणी जिल्ह्यात आगामी पावसाळ्यात
वृक्ष लागवड मोहिम राबवण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
परभणी जिल्हयात वृक्ष लागवडी मोहीम राबविण्यात येणार असून वन
विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने विविध प्रकारची २५ लाख रोप उपलब्ध करण्यात आली आहे यासंदर्भात विभागीय वनाधिकारी
विजय सातपुते म्हणाले
महाराष्ट्र शासनाने यावर्षी सहा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
ठेवले आहे त्यामुळे देशांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी २० लाख ६४ हजार रोपांची लागवड करण्याचे
उद्दिष्ट ठरवून दिलेला आहे त्याच्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने अतिशय
चांगल्या प्रकारे रोपांची निर्मिती करून लागवड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे २५
लक्ष एवढे रोपांची निर्मिती करून आज सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे तया वर्षी पावसाळा
सुरू होतात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन त्यात गतिमानता आणण्याच्या नियोजन केलेले
आहे रोपांची लागवड करण्यासाठी पूर्ण
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
ओमप्रकाश यादव म्हणाले
सन २०२० –२१ या वर्षामध्ये वसंतराव नाईक
हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत परभणी जिल्ह्यातील एकूण ७०४ ग्रामपंचायती मध्ये प्रत्येक
ग्रामपंचायतीमध्ये १ हजार २० झाडाची लागवड
कशा प्रमाणे सात लाख १८ हजार वृक्षांची लागवड यावर्षी करण्यात येणार आहे यावर्षी लागवडीची
पूर्वतयारी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सुरू असून वृक्षाची मागणीसुद्धा सामाजिक वनीकरण
विभागाला करण्यात आलेली आहे
पर्यावरणाचा समतोल राखला जावा म्हणून
वृक्ष लागवड
मोहीमेमध्ये सर्वजण सहभागी होताना दिसून येत आहे आकाशवाणी बातम्यासाठी
परभणीहून विनोद कापसीकर
****
कर्जाची परतफेड करण्यासाठी
तगादा लावणाऱ्या वित्तपुरवठा कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी, भारतीय कम्युनिस्ट
पक्षानं केली आहे. या मागणीचं निवेदन भाकपच्या वतीनं काल औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय
चौधरी यांना देण्यात आलं. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्जाचे हप्ते
वसूल न करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले असूनही,
संबंधित कंपन्या हे निर्देश मानण्यास तयार नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात
कोरोना विषाणूच्या प्रसारास रोखण्याकरता सर्वेक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात
आली असून, हे कर्मचारी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणार आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यास
नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी केलं आहे.
सातारा परिसर वार्ड कार्यालयात काल या सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरबाबत
प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड विभागातल्या गतवर्षीच्या
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून मिळणारी रास्त आणि किफायतशीर रक्कम देण्याची
मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे. सहसंचालकांनी साखर कारखान्यांना ही थकित रक्कम देण्यास भाग पाडावं,
अन्यथा दहा जूनपासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा
इंगोले यांनी दिला आहे.
****
लातूरच्या माजी खासदार रुपा
पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी ५१
जणांनी रक्तदान केलं.
****
नांदेड शहरातल्या रयत आरोग्य
सेवा मंडळानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार रुपयांची मदत केली आहे.
या मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर टाक धानोरकर आणि नगरसेवक बापूराव गजभारे
यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे काल सुपुर्द केला.
****
परभणी शहरात प्रहार जनशक्ती
पक्षाच्या वतीनं विविध वर्तमानपत्राच्या कार्यालयात काम करणारे सेवक आणि संगणक चालकांना
धान्य आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं.
****
कापूस खरेदीसह शेतकऱ्यांच्या
अनेक प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी परभणी इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कापूस टाकून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आमदार
मेघना बोर्डीकर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. कापसाचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावणार
असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment