Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०५ जून
२०२० दुपारी १.००
वा.
****
कोविडग्रस्तांवर
खासगी रुग्णालयात उपचार शुल्कावर नियंत्रण आणण्यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सर्वोच्च
न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. कोविडग्रस्तांवर उपचार आणि सुविधांच्या
एकसमान मानकांसाठी समान शुल्क आकारावं, असं या याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती अशोक
भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सरकारला आठवडाभरात
उत्तर देण्यास सांगितलं आहे. आरोग्य विमा असलेल्या रुग्णांवर रोखरहित उपचार व्हावेत,
तसंच विमा कंपन्यांकडून निश्चित कालमर्यादेत या प्रकरणांचा निपटारा व्हावा, असंही या
याचिकेत म्हटलं आहे.
****
देशात
कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४८ पूर्णांक २७ शतांश टक्के एवढं झालं
आहे. गेल्या २४ तासात देशात ५ हजार ३५५ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ९ हजार ४६२
रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले
९ हजार ८५१ रुग्ण आढळले. त्यामुळे देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख २६ हजार
७७० झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे देशभरात २७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून,
आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ६ हजार ३४८ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी एकोणसाठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोना
विषाणू बाधितांची संख्या आता १ हजार आठशे अठ्ठावीस झाली आहे. यापैकी १ हजार एकशे सव्वीस
कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. औरंगाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे
एका ३० वर्षाच्या गर्भवतीचा मृत्यू झाला. औरंगाबाद इथं या संसर्गामुळे मृतांची ९३ झाली
आहे. औरंगाबादमध्ये सध्या सहाशे नऊ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं
आहे.
आज
आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन 7 मधल्या अयोध्या नगरात ७, समता नगरमध्ये ४, गारखेडा
विजय नगर, जवाहर कॉलनी तसंच बुढीलेन भागात प्रत्येकी ३ रुग्ण, युनूस कॉलनी, औरंगपुरा,
मिल कॉर्नर तसंच मोगलपुरा भागात प्रत्येकी दोन रुग्ण तर भारतमाता नगर, इंदिरानगर न्यू
बायजीपुरा, रोशन गेट भागातली न्यू कॉलनी, भावसिंगपुरा, त्रिमूर्ती चौक, बेगमपुरा, चिश्तिया
कॉलनी, फाझलपुरा, रेहमानिया कॉलनी, गांधी नगर, जुना मोंढ्यातलं भवानी नगर, सिडको एन
6 मधली शुभश्री कॉलनी, सिडको एन 9 मधलं संत ज्ञानेश्वर नगर, सिडको एन 11 मधलं मयूर
नगर, सईदा कॉलनी, गणेश कॉलनी, एसटी कॉलनी, फाजलपुरा, एन आठ सिडको जुना मोंढा, नॅशनल
कॉलनी, बारी कॉलनी, विद्यानिकेतन कॉलनी, देवडी बाजार, सिडको एन 7, सिडको एन १२, आझाद
चौक, टी.व्ही. सेंटर, कैलास नगर, या भागात प्रत्येकी एकेक कोराना विषाणू बाधित रुग्ण
आढळले आहेत. या रुग्णांमध्ये १९ महिला आणि ४० पुरुषांचा समावेश आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात आज सकाळी ६ नवे रुग्ण आढळले, असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
२१
जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा होतो. यंदा मात्र कोविड प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर योगदिनी मोठा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. आयुष मंत्रालयाकडून यानिमित्तानं
माय लाईफ माय योगा ही स्पर्धा तसंच योग प्रशिक्षकांच्या दररोज मार्गदर्शनासह विविध
उपक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकांना आपल्या योगाभ्यासाची तीन मिनिटांची चित्रफीत
तयार करून माय लाईफ माय योगा या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमावर तसंच माय गव्ह ॲपवर
पाठवायची आहे. यासाठी विविध सहा गटांमध्ये एक लाख, पन्नास हजार आणि २५ हजार रुपयांचे
प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार दिले जाणार आहेत. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्रं
दिली जाणार आहेत. नागरिकांनी घरीच योगासनं करून हा दिवस साजरा करावा, असं आवाहनही करण्यात
आलं आहे.
****
मिशन
बिगीन अगेन अंतर्गत मुंबई हळू हळू पूर्वपदावर येण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. सम
विषम प्रमाणात व्यावसायिकांनी दुकानं सुरू केली आहेत. आज अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी
रिक्षा यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात रिकामे असलेले
मुंबईतल्या रस्त्यांवर आज वर्दळ दिसत आहे. मॉल्स आणि व्यापारी संकुलं मात्र बंद च राहणार
आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातही आजपासून काही अटीं आणि शर्तींवर व्यापारी प्रतिष्ठानं सुरु होत आहेत. एक
दिवसाआड एका बाजूची व्यापारी प्रतिष्ठानं सुरु करण्याच्या शासनाच्या निर्णयाला मात्र
व्यापारी महासंघाकडून विरोध होत आहे.
****
No comments:
Post a Comment