Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
22 June 2020
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर ‘घरीच योग आणि कुटुंबासह योग’ करत राज्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
साजरा
** लडाखच्या गलवान खोऱ्यातल्या
घटनेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भारतीय सशस्त्र सेनेच्या
तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा
** देशाच्या काही भागात काल
कंकणाकृती तर काही भागात खंडग्रास सुर्यग्रहणाचं दर्शन
** राज्यात तीन हजार ८७०
नवे रुग्ण, तर १७० मृत्यूची नोंद.
** औरंगाबाद शहरातही नवे
१७० रुग्ण तर चार जणांचा मृत्यू
** परभणी वगळता मराठवाड्यातल्या
अन्य सर्व जिल्ह्यातल्या रुग्णांच्या संख्येत वाढ
आणि
** शेतकऱ्याचे रूप धारण करत
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी औरंगाबादच्या खत विक्रेत्याकडून होणारी फसवणूक आणली
उघडकीस
****
राज्यात काल आंतरराष्ट्रीय
योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘घरीच
योग आणि कुटुंबासह योग’ या संकल्पनेनुसार काल राज्यातल्या सर्व जिल्ह्यात योग साजरा
करण्यात आला. यानिमित्त विविध शासकीय-खासगी कार्यालयं, सामाजिक-शैक्षणिक संस्था, संघटनांतर्फे
योगाभ्यास करण्यात आला. सुरक्षाविषयक योग्य काळजी घेत प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांनी योग केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनच्या हिरवळीवर योग वर्गात सहभागी होऊन योगासनं
केली. यावेळी राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योग वर्गात सहभाग घेतला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर खबरदारी
घेण्यात आली.
औरंगाबाद इथं भारतीय वैद्यकीय
संघटना-आय.एम.ए.च्या महिला डॉक्टरांनी ऑनलाईन योगचं आयोजन केलं होतं. भारतीय योग संस्थानतर्फे
आयोजित चार दिवसीय योग शिबीराचा समारोप काल झाला. जवाहर कॉलनी इथल्या आरोग्य केंद्रात
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला. औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी
आणि जिल्हा सायकल संघटनेतर्फे औरंगाबाद लेणी इथं
गिरिभ्रमण मोहिम आणि योग शिबीर घेण्यात आलं. भगवान बालिकाश्रम इथं श्रीनिवास स्पोर्टसतर्फे योग वर्ग घेण्यात आला.
औरंगाबाद इथल्या योग मित्र मंडळातर्फे सहा दिवसीय ऑनलाईन योग विषयक व्याख्यानमाला आणि
योगसाधना करण्यात आली.
बीड जिल्ह्यात पतंजली योग
समितीतर्फे कोरोना विषाणू संसर्गामुळे सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिन साजरा करण्यात
आला. यानिमित्त आयोजित उपक्रमाला शहर आणि ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं
समिती जिल्हाध्यक्ष हेमा विभुते यांनी सांगितलं.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी प्रशासनातल्या निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन योग अंगीकारण्याचा
संदेश दिला.
परभणीतही योगाभ्यासकांसह
नागरिकांनी घरातच योगासनं करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
लातूर जिल्ह्यात विविध मान्यवर
लोकप्रतिनिधी तसंच सामान्य जनतेनं आपल्या कुटुंबासह घरीच योग दिन साजरा केला. शहरातल्या
राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच प्राध्यापकांनी
सामाजिक संपर्क माध्यमातून योग दिनाची प्रात्यक्षिकं आणि सहभाग असं नियोजन केलं होतं.
परभणी, हिंगोली, जालना आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातही उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
****
योग हा शालेय अभ्यासक्रमाचा
भाग बनवण्याच्या प्रकियेला गती देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल
निशंक यांनी, काल ऑनलाइन योग प्रश्नमंजुषा स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेचं आयोजन
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परीषद- एनसीईआरटीनं केलं आहे. देशभरातल्या
सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. विद्यार्थ्यांमध्ये
योगविषयक जागरुकता निर्माण करणं तसंच योगविषयक योग्य माहिती मिळवण्यास त्यांना प्रोत्साहन
देणं हा या स्पर्धेच्या आयोजनामागे हेतू असल्याचं निशंक यांनी यावेळी सांगितलं. स्पर्धेचे
सर्व प्रश्न बहु पर्यायी असतील आणि हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत ते विचारले जातील.
स्पर्धेत सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जातील. ही ऑनलाईन
स्पर्धा २० जुलैपर्यंत सुरू असणार आहे.
****
लडाखच्या गलवान खोऱ्यातल्या
घटनेनंतर भारत आणि चीनदरम्यानच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी
चर्चा केली. या बैठकीला संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल एम.
एम. नरवणे, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया
उपस्थित होते.
चीनच्या प्रत्येक हालचालींना
उत्तर देण्यासाठी लष्करानं तयार राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
या बैठकीत दिल्याचं सांगण्यात आलं.
****
देशाच्या काही भागात काल
कंकणाकृती तर काही भागात खंडग्रास सुर्यग्रहण पाहायला मिळालं. पृथवीपासून चंद्र दूर
गेल्यानंतर त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही, अशावेळी सूर्याच्या
बाहेरीला बाजूच्या कडा दिसतात, तेव्हा आपणास कंकणाकृती सूर्यग्रहणाचं दर्शन होतं. काल
सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून ३२ मिनिटांपर्यंत अशा प्रकारच्या
सूर्यग्रहणाचं उत्तर भारतीयांना दर्शन झालं. इतर भागात मात्र ते खंडग्रासच्या स्वरूपात
पाहायला मिळालं.
या कालावधीत सूर्याचा अंदाजे
७० टक्के भाग चंद्रानं व्यापलेला होता.
सुर्यग्रहणानिमित्त उस्मानाबाद
जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी मातेची मूर्ती पुर्वापार प्रथेप्रमाणं सोवळ्यात,
पांढऱ्या श्वेत कपड्यात ठेवण्यात आली होती.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण
इथं भाविकांनी खंडग्रास सुर्यग्रहणावेळी गोदावरी नदीच्या जलपात्रात, कृष्णकमल, मोक्ष
आणि नागघाटावर जप आणि नामस्मरण केलं. सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात पैठणला
मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यल्प भाविकांनी
गोदावरी पात्रात स्नान केलं.
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात
नेमगिरी परिसरामधील परभणी ॲस्ट्रॉनॉमीक सोसायटीच्या वतीनं काल नागरिकांना सूर्यग्रहण
बघण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.
****
राज्यात काल तीन हजार ८७०
नवे रुग्ण आढळले, यामुळे राज्यातली एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या एक लाख ३२
हजार ७५ एवढी झाली आहे. काल दिवसभरात उपचारानंतर
बरे झाल्यामुळे एक हजार ५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत उपचारानंतर ६५ हजार
७४४ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत, तर सध्या ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात आज १७० नव्या करोना
बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी १०१ रुग्णांचा मृत्यू काल झाला, अन्य
६९ मृत्यू मागील काही दिवसांतले आहेत. त्याची नोंद कालच्या आकडेवारीत घेण्यात आली आहे.
१०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक ४१ मृत्यू मुंबईत झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात
१७० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधितांची संख्या
तीन हजार ५३० झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये
११५ पुरुष आणि ५५ महिलांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ९६८ रुग्ण
या संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. तर, काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत शहरातल्या संजय नगर
मधील ७१ वर्षीय पुरूष, बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील ६६ वर्षीय पुरूष आणि एन आठ मधल्या
यशोधरा कॉलनीतल्या ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात
न्यू बायजीपुरा इंदिरा नगर मधल्या ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू
संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एक हजार
३७१ रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड
इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असल्यानं नगरपरिषदेनं आजपासून तीन दिवस जनता
संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सिल्लोड व्यापारी महासंघानं पाठिंबा दिला
असल्याचं महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांनी सांगितलं. वैद्यकीय सेवा वगळता सर्व
व्यापारी प्रतिष्ठानं या काळात बंद राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल नऊ बाधित
रुग्ण आढळून आले. यामध्ये एक जण लातूर शहरातल्या गवळीनगर भागातला तर एक जण अजिंक्य
सिटीतला रहिवाशी आहे. अन्य सात जण हे औसा शहरातले आहेत. यामध्ये चार जण कालन गल्ली
तर तीन जण हे कारंजे गल्लीतले रहिवाशी आहेत.
दरम्यान, काल आजारातून बरे
झाल्यामुळे पाच जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची
संख्या १५१ झाली असून सध्या ७१ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या आजारामुळे आतापर्यंत
जिल्ह्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
बीड जिल्ह्यात काल पाच जणांचे
अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यातील चार जण हे पाटोदा गावातल्या माळेगल्लीतले
असून एक जण बीड शहरातल्या शहेनशाह नगर भागातला आहे. जिल्ह्यात आता एकूण बाधित रूग्णांचा
आकडा हा १०६ झाला असून यातील ७४ जण हे कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत तर चार जणांचा
मृत्यू झाला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल चार
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातल्या रूग्णांची संख्या ३०८ झाली
आहे. काल दहा रूग्ण विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात आता एकूण २१९ रूग्ण बरे झाले आहेत. तर ७५ रूग्ण उपचार घेत आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल तीन
नवे रुग्ण आढळले. यामध्ये जालना शहरातली गुडलागल्ली, कन्हैयानगर आणि संभाजीनगर भागातला प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
दोन रुग्ण आढळले. हे दोघेही तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्गचे रहिवाशी आहेत. यामुळे
जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या १७७ झाली आहे. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे
तर १३२ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन
लहान मुलींना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं. या मुलींची आजी बाधित झाली
होती, तिच्या संपर्कात आल्यामुळे या दोन मुलींची तपासणी करण्यात आली. यापैकी एक दोन
वर्षाची तर दुसरी आठ वर्षाची आहे.
दरम्यान, उपचार घेत असलेले
दोन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात
सध्या २४० रुग्ण झाले असून त्यापैकी २१२ रुग्ण बरे झाले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात काल दिवसभरात
१८ नवीन रुग्ण वाढले, असून ही संख्या ३०२ इतकी
झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णात संगमनेर तालुक्यातले ७, श्रीगोंदा तालुक्यातले तीन,
अहमदनगर शहरातले पाच पारनेर तालुक्यातले दोन आणि अकोले तालुक्यातल्या एका जणाचा समावेश
आहे.
****
नाशिक शहरात काल १०८ कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले तर सहा जणांचा मृत्यू झाला. शहरातल्या एकूण बधितांची संख्या आता १ हजार २०१ झाली असून आतापर्यंत कोरोना
विषाणूमुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या मालेगाव महापालिका क्षेत्रातली
रुग्णसंख्या नियंत्रित होत असताना नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र रुग्ण संख्या झपाट्यानं
वाढत असून मृत्यूदर कमी करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर निर्माण झालं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल कोरोना
विषाणूचे ६ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १५७ झाली
आहे. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.
****
पुणे शहरात काल दिवसभरात
नव्यानं ६२० रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या १२ हजार, ४७४ एवढी
झाली आहे. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या
रुग्णांची संख्या ५१० वर पोहोचली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी
तीन जण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली. त्यामुळे
जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५ झाली असून सध्या १४ बाधितांवर उपचार
सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
****
धुळे शहर आणि परिसरात २६,
तर शिरपूरला २५ असे एकूण ५१ व्यक्ती काल कोरोना विषाणूबाधित आढळून आल्या. यामुळे धुळे
जिल्ह्यातली रुग्णसंख्या ५४६ वर पोहचली आहे. यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
यवतमाळ इथं काल एका कोरोना
विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यु झाला, त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळं मृत्यू पावलेल्यांची
संख्या आठ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२५ रुग्ण आढळले असून यापैकी १६१ जण
बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
*****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल
१३ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात
बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३० झाली
आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात २५ सक्रीय रुग्ण असल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात काल ३९
कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २ हजार
१२६ झाली आहे. यातील १ हजार ११८ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
सांगली जिल्ह्यात काल ८ जणांचा
अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या २९४ झाली आहे.
****
राज्याचे कृषी मंत्री दादाजी
भुसे यांनी शेतकऱ्याचे रूप धारण करत औरंगाबाद शहरातल्या एका खत विक्रेत्या दुकानदाराकडून
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक काल उघडकीस आणली. उपलब्ध असतानाही जाधवमंडी भागातला नवभारत
फर्टिलायझरचा दुकानदार शेतकऱ्यांना युरिया देत नव्हता. युरियासोबत अन्य माल खरेदी करण्याचा
तो आग्रह करत होता. मंत्री भुसे यांनी अगोदर एक डमी ग्राहक पाठवला, त्यानंतर ते स्वतः
शेतकरी बनून या दुकानात गेले, अगोदर त्यांनी युरियाच्या दहा गोण्या मागितल्या, त्यानंतर
पाच गोण्या देण्याची मागणी केली, मात्र दुकानदारांने त्या देण्यास नकार दिला, त्यानंतर
भुसे यांनी आपली ओळख देत जिल्हा कृषी अधिक्षकांना दुकान तसंच गोदामाची तपासणी करण्याचे
आदेश दिले. सदरील दुकानदाराकडे युरियाचा पुरेसा साठा आढळून आला. याचवेळी भुसे यांनी
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले.
****
मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबरच्या
दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलीसांना हवा असलेला, तहव्वूर राणा याचं अमेरिकेतून भारतात
हस्तांतरण करण्याविषयी आपण केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी म्हटलं आहे. राणा याला अलीकडेच अमेरिकेत अटक झाली आहे. त्याच्यावर मुंबईवर झालेल्या
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यामुळे भारतानं त्याला
फरार म्हणूनही घोषित केलं होतं, याशिवाय विशेष न्यायालयानं त्याच्याविरोधात २८ ऑगस्ट
२०१८ला अटक वॉरंटही जारी केलं होतं.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
काल सलग पंधराव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतीलिटर ३५ पैसे, तर डिझेलच्या
दरात प्रतीलिटर ६० पैसे वाढ नोंदवण्यात आली. १५ दिवसात पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे
७ रुपये ९७ पैसे, तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे आठ रुपये ८८ पैसे वाढ झाली आहे.
****
कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी
आणि शेतकऱ्यांना पिक कर्जाचं वाटप करण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष राज्यभर
आंदोलन करणार असल्याचं काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सांगितलं. राज्यातल्या
महाविकास आघाडी सरकारनं कर्जमुक्ती योजनेची अंशतः अंमलबजावणी केली असून यामुळे लाखो
शेतकरी खरीप हंगामासाठीच्या पिक कर्जापासून वंचित राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन
केलं जाणार असल्याचं पाटील म्हणाले. आंदोलनादरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठीच्या
सर्व नियमांचं पालन केलं जाईल. कापूस, तूर हरभरा आदी धान्य विक्री अभावी शेतकऱ्यांकडे
पडून असल्यामुळे शेतकरी कर्जफेड करू शकले नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
****
ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत
असताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसंच योग्य सावधानता बाळगावी, असं आवाहन
राज्य सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे. विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत विशेष
खबरदारी घेवून कोणत्याही अनोळखी लिंकवर, तसंच कोणत्याही संकेतस्थळावर आपली माहिती,
आपल्या बँक खात्यांची माहिती, डेबिट क्रेडिट कार्ड ची माहिती देऊ नये असं सायबर विभागानं
म्हटलं आहे.
****
पूर्व विदर्भातल्या गोंदिया
जिल्ह्याची शान समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांची गणना या वर्षी १३ जून ते १८ जून दरम्यान
करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गोंदिया, भंडारा जिल्ह्यात तसंच नजीकच्या
बालाघाट जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संख्येत वाढ झाल्यानं, सारस प्रेमींमध्ये आनंदाचं
वातावरण आहे. सारस पक्षाच्या संवर्धनाचं काम करणाऱ्या सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार
यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले......
गोंदिया जिल्हा सोबतच लागलेला
भंडारा जिल्हा आणि मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्हा या तीन जिल्ह्यांमध्ये
आम्ही गणना केली जवळपास एक आठवडा गणना केली यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास ४७
सारस पक्षी यावर्षी आपल्याला गणनेने मध्ये निदर्शनात आले सोबतच बालाघाट मध्ये जवळपास
५८ सारस पक्षी निदर्शनात आले गोंदिया जिल्ह्यामध्ये पाच ते सहा सारस वाढलेल्या आणि
बालाघाट जिल्ह्यामध्ये पण सात ते आठ सारस वाढलेले आपल्याला दिसून येतात
पूर्ण वर्ष भर एक प्रोसेस आहे त्याचा प्रोटेक्शन करणं आणि गणना हा त्या Conservation मधला एक भाग
आहे
****
परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रात
विविध प्रभागातून मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी नगर विकास मंत्रालयानं ५
कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती आमदार डॉ.राहुल
पाटील यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक ४ आणि १० मध्ये पुलाची निर्मिती, रस्त्यांचं
डांबरीकरण तसंच सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकामासाठी हा निधी मंजूर झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी
शहरात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एकाचा मृत्यू झाला. लोकशाहिर अण्णाभाऊ
साठे नगरातील विठ्ठल नेमाजी खिल्लारे पत्रा लागल्यानं गंभीर जखमी झाले होते. उपजिल्हा
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कळमनुरी बुडकी नाल्यात
पुरामुळे वाहून गेलेल्या वयस्क दांपत्यापैकी महिलेचा मृतदेह काल आढळला. शुक्रवारी झालेल्या
या दुर्घटनेत हे दांपत्य बैलगाडीसह वाहून गेलं होतं. यापूर्वी परवा पुरुषाचा मृतदेह
आढळला होता.
नांदेड तालुक्यातल्या लिंबगाव
महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. काल या भागात ७१ मिलीमीटर पाऊस पडल्याचं
सांगण्यात आलं.
****
विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्याबद्दल सामाजिक माध्यमावर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याबद्दल अज्ञात व्यक्ती
विरोधात लातूर जिल्ह्यातले औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा पोलिस ठाण्यात तक्रार
दाखल केली आहे. याप्रकरणी तात्काळ गुन्हेगाराचा शोध घेवून त्याच्याविरूद्ध कारवाई करण्याची
मागणी करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात वार्षिक
सरासरीच्या तुलनेत गेल्या काही दिवसांत १५ टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात आतापर्यंत १३३
पुर्णांक ४३ मिलीमीटर पाऊस झाला.
****
येत्या दोन दिवसांत कोकणात
बहुतेक सर्व ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळ
ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदीतून
वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना आजपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे
आदेश प्रशासनाच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत. अन्य आस्थापना मात्र बंदच राहतील असं
या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीस लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय महावितरणनं
घेतला आहे. विद्युत संचालन-दुरुस्ती यासह विविध विभागात कार्यरत सर्व तांत्रिक-अतांत्रिक,
बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही यात समाविष्ट आहेत.
****
पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द
करण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे काल औरंगाबादच्या पैठण गेट इथं आंदोलन करण्यात आलं. या दरवाढीचा निषेध
नोंदवण्यासह गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना पक्षातर्फे श्रध्दांजली
वाहण्यात आली.
****
यवतमाळच्या घाटंजी येथील
बेलोरा रोडवरील वाघाडी नदीत बुडून काल बापलेकाचा दुदैवी मृत्यू झाला. वाघाडी नदीच्या
काठावरील शनी मंदिरात पूजापाठ-विधी करण्यासाठी मृत बापलेकासह कुटुंबीय गेले असतांना
ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment