Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June
2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ जून २०२०
सायंकाळी ६.००
****
·
लोकसेवा
आयोगाची पूर्वपरीक्षा येत्या चार ऑक्टोबरला होणार.
·
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांच्या संख्येत ६५ ने वाढ; नांदेड जिल्ह्यात सात तर हिंगोली
सहा नवे रुग्ण.
·
निसर्ग
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसाना पोटी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून
आज १०० कोटी रुपयांची तात्पुरती मदत जाहीर.
आणि
·
वृक्षारोपणासह
विविध उपक्रमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा.
****
लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा येत्या चार ऑक्टोबरला होणार
आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून आज ही माहीती देण्यात आली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार
ही परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा पुढे
ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगानं घेतला होता. दरम्यान, गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांच्या मुलाखती २० जुलैपासून घेतल्या जाणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं
आहे.
****
राज्यातल्या स्थलांतरित कामगारांकडून मागणी झालेली एकही
रेल्वे प्रलंबित नसल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यासंदर्भात
दाखल एका याचिकेवर राज्य सरकारने एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं, कामगारांकडून रेल्वेची
मागणी झाल्यास, लगेच व्यवस्था केली जाईल, असं सरकारनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
३१ मेपर्यंत ८२२ रेल्वे गाड्यांमधून ११ लाख ८७ हजारावर तर बस गाड्यांच्या ४३ हजार ८४१
फेऱ्यांमधून ५ लाख तीस हजारावर स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवल्याचं
या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. याचिकाकर्त्यानं या याचिकेत केलेल्या, अस्वच्छ निवारागृहं
तसंच जेवण न पुरवल्याच्या आरोपांचं सरकारनं खंडन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारच्या सत्रात सहा तर सकाळी
५९ अशी एकूण ६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं कोरोना विषाणू बाधितांची
एकूण संख्या १ हजार आठशे चौतीस झाली आहे. यापैकी १ हजार १२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे
होऊन घरी गेले असून जिल्ह्यात ९३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता औरंगाबाद
इथं ६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दुपारी आढळलेल्या रुग्णांमध्ये तपशील समता नगर, भोईवाडा, मिल कॉर्नर, चिकलठाणा, रेहमानिया कॉलनी
आणि किल्लेअर्क या भागातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामध्ये पाच महिला तर एक
पुरुष रुग्ण आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नवे ७ कोरोना विषाणूबाधित आढळून आले
आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १८९ कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळले. यापैकी १२६ रुग्ण बरे
होऊन घरी परतले आहेत. तर ५५ रुग्ण रूग्णालयात
उपचार घेत आहेत. तर कोरोना विषाणू संसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज सहा व्यक्तींना कोरोना विषाणूची
लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या सहा रुग्णांमुळे हिंगोली जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू
बाधितांची संख्या १९२ झाली आहे. यापैकी १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या
जिल्ह्यात ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये अंधारवाडी
इथल्या विलगीकरण कक्षातली २८ वर्षीय महिला आणि तिचा अकरा वर्षीय मुलगा, हिंगोलीतल्या
नगर परिषद कॉलनीतला ३३ वर्षीय इसम, तसंच एकाच कुटुंबातला तीस वर्षीय पुरुष, २७ वर्षीय
महिला आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबई तसंच पुण्यातून
हिंगोलीत आले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.
****
लातूर शहरातला पहिला कंटेनमेंट झोन असलेला लेबर कॉलनी
परिसर आजपासून खुला करण्यात आला. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या परिसरातल्या रहिवाशांची
भेट घेऊन प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. आरोग्य विभागाने दिलेल्या
निर्देशांचे नागरिकांनी स्वयंशिस्तीनं पालन करण्याचं आवाहनही महापौरांनी यावेळी केलं.
गेल्या १४ दिवसांत महानगरपालिकेनं राबवलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांनीही समाधान व्यक्त
केलं.
****
धुळे जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
धुळे जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ११९ झाली असून यापैकी
५ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यात सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सांगली जिल्ह्यात आज नवे ११ कोरोना बाधित रुग्ण आढळले.
सिंधुदुर्गात ६, बुलडाण्यात ५, भंडाऱ्यात एक तर अमरावती जिल्ह्यात आज नवीन ११ रुग्ण
आढळले. त्यामुळे आता सांगलीतली कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या १३९, सिंधुदूर्ग
१०५, बुलडाणा ८२, भंडारा ४१ तर अमरावती जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या २७० झाली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी
स्वयंशिस्तीनं विलगीकरण करुन घेणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीच्या सूचना राज्याचे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. थोरात यांनी अहमदनगर इथं आज कोविड-१९
उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी या वेळी जिल्ह्यातल्या सद्यस्थितीचा
आढावा घेतला.
****
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानापोटी
तात्पुरती मदत म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज १०० कोटी रुपयांची मदत जाहीर
केली. अलिबाग आणि थळ इथल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही फक्त तातडीची
मदत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं देखील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदतीचं
आश्वासन दिलेलं असल्याचं ते म्हणाले. पंचनामे करण्याचं काम सुरू असून ते काम पूर्ण
झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल. त्यानंतर पुन्हा मदत केली जाईल असं मुख्यमंत्री ठाकरे
यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
राजभवन परिसरात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान एक रोप लावून
त्याचं संगोपन करावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज अकोला इथं सीड बॉल तयार
करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. भारत कृषक क्रांतीचे प्रणेते षण्मुग नाथन यांच्यातर्फे,
हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. षण्मुग नाथन, यांच्याकडून दरवर्षी हा उपक्रम
राबवला जातो. यावर्षी बारा हजार सीड बॉल तयार असून त्यापैकी दोन हजार सीड बॉल अकोला
शहराच्या विविध भागात त्यांनी टाकले आहेत.
****
पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीनं आपण ऐतिहासिक वळणावर असुन
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. पर्यावरण साखळीत याचं
महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठ परिसरात वड, पिंपळ, उंबर यासारख्या वृक्ष लागवडीवरही
भर देण्यात येत आहे, असं प्रतिपादन कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी केलं आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीनं आज कुलगुरू
डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते वट वृक्षाची लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात
आला. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावात सामाजिक अंतराचं भान ठेऊन मान्यवरांच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात करमाड पोलिस ठाण्यातल्या अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज सटाणा परिसरात १६ वृक्षांचं रोपण करण्यात आलं. महिनाभरापूर्वी
याच परिसरात रेल्वेखाली चिरडून मरण पावलेल्या १६ कामगारांच्या स्मरणार्थ उपविभागीय
पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आलं. या सर्व १६ झाडांचं
उत्तमरित्या संवर्धन होईल असं नियोजन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार
पांडेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची
थर्मल गन आणि ऑक्सिमिटरच्या सहाय्यानं शरीराचं तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासून त्याची
नोंद घेण्यात येत आहे. या तपासणीत एखाद्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आढळून आली तर
त्याला पुढची आरोग्य सहायता देण्यात येणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात आजपासून बाजारपेठ सुरु झाली.
मास्क न लावता बाजारात फिरणाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीनं पाचशे रुपये दंड ठोठावण्यात
येत आहे.
****
पीक कर्जासाठीच्या अर्ज नमुन्यात शेतकऱ्यांना जात विचारली
जात असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत संघटनेचे
हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कर्ज
घेण्यासाठी जात विचारण्याचा प्रकार निंदनीय असून, हे थांबवावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा
इशारा संघटनेनं दिला आहे
****
No comments:
Post a Comment