Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 06 August 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.
****
देशभरात
गेल्या २४ तासांत कोविड रुग्णांच्या संख्येत ५६ हजार २८२ ने वाढ झाली. रुग्णसंख्येत
५० हजारांपेक्षा वाढ होण्याचा आजचा सलग आठवा दिवस आहे. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या
१९ लाख ६४ हजार ५३६ झाली आहे. यापैकी १३ लाख २८ हजार ३३६ म्हणजेच ६७ पूर्णांक ६२ शतांश
टक्के रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ९०४ रुग्णांचा
या संसर्गामुळे मृत्यू झाला, आतापर्यंत या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या ४०
हजार ६९९ झाली आहे. हा मृत्यूदर आता २ पूर्णांक शून्य सात शतांश टक्क्यांपर्यंत खाली
गेला आहे. सध्या देशात ५ लाख ९५ हजार ५०१ रुग्णांवर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू
आहेत. दरम्यान, देशभरात आतापर्यंत दोन कोटी २१ लाख ४९ हजार ३५१ नमुन्यांची कोविड संसर्ग
चाचणी करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.
****
रत्नागिरी
इथले प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे यांचं आज पहाटे कोविड संसर्गानं निधन झालं.
ते ६६ वर्षांचे होते. जिल्हा रुग्णालयात गेल्या चार महिन्यांत दाखल झालेल्या ४२ कोविडग्रस्त
बालकांवर उपचार करून त्यांना कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त करण्यात डॉक्टर मोरे यशस्वी
झाले होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा
रुग्णालयात उपचार सुरू होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या
एकूण कोविडग्रस्तांची संख्या १५ हजार ५४० झाली आहे. त्यापैकी ११ हजार ४२१ रुग्ण आतापर्यंत
बरे झाले आहेत, तर ५०३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ५१६ जणांवर
उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज सकाळी ३८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यात बऱ्या झालेल्या
रुग्णांची एकूण संख्या आता चार हजार ९३५ झाली आहे.
****
अमरावती
जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच दुसरिकडे सुखावणारी बाब समोर आली आहे.
यामध्ये अमरावतीत रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण आता ६५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.
तसंच लक्षणे नसलेल्या रूग्णांसाठी घरीच उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
असून त्याकरीता शंभर जणांचे अर्ज प्राप्त झाले असुन कोविड बाधित रुग्णासाठी कोणत्याही
सुविधेचा अभाव नसल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं आहे.
****
रिजर्व्ह
बँकेनं आपल्या व्याजदरात काहीही बदल केलेला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी
आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. त्यात रेपो दर तसंच रिव्हर्स रेपो दर कायम
ठेवत असल्याचं सांगितलं. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांसाठी रेपो दर ४ टक्के तर रिव्हर्स
रेपो दर ३ पूर्णांक ३५ शतांश टक्के कायम राहणार आहे.
****
पालघर
इथं जमावाकडून झालेल्या हत्येसंदर्भात तपासाची सद्यस्थिती आणि संबंधित प्रकाराला जबाबदार
पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला अवगत करावं, असे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणी अंतिम अहवाल तपासून पाहण्याची
गरज व्यक्त करत, राज्यसरकारनं खालच्या न्यायालयात सादर केलेलं आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयासमोर
सादर करण्याची सूचना न्यायालयानं केली. या प्रकरणी पुढची सुनावणी तीन आठवड्यानंतर होणार
आहे. १६ एप्रिलच्या रात्री घडलेल्या या प्रकारात दोन साधूंसह तीन जणांचा मृत्यू झाला
होता.
****
जम्मू
काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या वसू काझीगुंड इथले सरपंच भाजप नेते सज्जाद अहमद
खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. आज सकाळी ही घटना घडली. गेल्या
दोन दिवसांतली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. परवा चार ऑगस्टला काझीगुंडजवळ अखरान
इथं भाजप सरपंच आरिफ अहमद यांच्यावरही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यात
आरिफ अहमद हे गंभीर जखमी झाले आहेत.
****
राज्यात
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या विविध शहरात पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई
मध्ये ५, कोल्हापूरला ४, सांगलीत २, सातारा, ठाणे, पालघर आणि नागपूर या ठिकाणी प्रत्येकी
एक तुकडी रवाना करण्यात आली असल्याचं एनडीआरएफनं कळवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या
नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती
निर्माण झाली आहे. दरम्यान, आजही हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यानं
लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यानी केलं आहे.
****
राज्य शालेय शिक्षण विभाग आणि गूगल यांच्यामार्फत राज्यातल्या शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
हस्ते आज दुपारी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment