Thursday, 6 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.08.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०६ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोविडग्रस्तांची संख्या १५ हजार ५४० झाली आहे. त्यापैकी ११ हजार ४२१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर ५०३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ५१६ जणांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

अमरावती जिल्ह्यात काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, अमरावती जिल्ह्यात या संसर्गामुळे बळींची संख्या ८० वर पोहोचली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या आता दोन हजार ६७२ झाली आहे.

****

राज्य शालेय शिक्षण विभाग आणि गूगल यांच्यामार्फत राज्यातल्या शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी होणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोफत ओळख क्रमांक उपलब्ध करून देणार आहे. यामुळे शिक्षकांना एकाच वेळी अडीचशे विद्यार्थ्यांची ऑनलाइन तासिका घेता येणार आहे.

****

पालघर जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील नदी-नाले भरुन वाहत असुन रस्ते पाण्याखाली गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हुजूर साहेब नांदेड ते अमृतसर - सचखंड या गाडीच्या परभणी आणि जालना या स्थानकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही गाडी परभणी स्थानकावर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी येवून १० वाजून ३७ मिनिटांनी सुटत होती ती आता १० वाजून ३२ मिनिटांनी येवून १० वाजून ३७ मिनिटांनी सुटणार आहे. जालना इथं ही गाडी दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी येवून १२ वाजून १५ मिनिटांनी सुटत होती. ती आता १२ वाजून १० मिनिटांनी येवून १२ वाजून १५ मिनिटांनी सुटणार असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.

****

सांगली जिल्ह्यात आजही दमदार पाऊस सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असुन सांगली जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी २० फूट इतकी झाली आहे. जिल्ह्यातील वारणा धरण ८० टक्के भरले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा सुमारे चार फूट वरून वाहत आहे. यामुळे नऊ राज्य महामार्ग तसंच अन्य २५ मार्गांवरच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...