Sunday, 4 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 04 OCTOBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** देशात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या सलग तेराव्या दिवशी दहा लाखापेक्षा कमी

** कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन

** २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

** औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू - जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या ३४ हजार १९३

आणि

** अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानाची परभणीत प्रवीण दरेकर यांच्याकडून तर जालन्यात राजेश टोपे यांच्याकडून पाहणी

****

देशात कोविडच्या सक्रीय रुग्णांची संख्या सलग तेराव्या दिवशी दहा लाखापेक्षा कमी राहिल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आज देशात कोविड संसर्ग झालेले ९ लाख ३७ हजार ६२५ सक्रीय रुग्ण आहेत. ही संख्या कालच्या सक्रीय रुग्णांपेक्षा ७ हजार ३७१ ने कमी असल्याचं, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीत नमूद आहे. कोविड चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात आलं असून, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सरासरी साडे अकरा लाख नमुन्यांची कोविड तपासणी केली जात असल्याचं, या बाबतच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

देशातली बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७३ झाली आहे. यापैकी ५५ लाख ९ हजार ९६६ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातलं कोविड संसर्ग मुक्तीचं प्रमाण ८४ पूर्णांक १३ शतांश टक्के एवढं झालं आहे. या संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ७८२ झाला आहे. मात्र संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढा कमी झाला आहे.

****

कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. साप्ताहिक संवाद कार्यक्रमात त्यांनी आज कोविड उपचारासंदर्भातल्या भावी उपाय योजनांची माहिती दिली. देशात कोविड लसीचं परीक्षण तिसऱ्या टप्य्यात असून, लस तयार झाल्यावर पुरवठा आणि साठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी सरकार लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान लोकांना त्यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावासंबंधी मार्दर्शनक सूचनाचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली असून कृषी सुधारणा कायद्यामुळे शेतमालाला मिळणारे हमीभाव बंद होणार नाहीत तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्याही ही बंद होणार नाहीत असं दानवे यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्ष आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी या कायद्याबाबत जनतेत संभ्रम  पसरवत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.

****

केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी हिताच्या कायद्याला फक्त विरोध करायचा म्हणून राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार विरोध करत असल्याचा आरोप केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला आहे. केंद्र सरकारनं केलेले कृषी सुधारणा कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं, जनतेला समजावून देण्यासाठी ते आज वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई शहराला बदनाम करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं असल्याचं म्हटलं आहे. ‘सुशांत सिंह हत्या कि आत्महत्या असं प्रश्नचिन्ह, महाराष्ट्र - मुंबई महानगरपालिका -मुंबई पोलीस यंत्रणा यांच्यावर निर्माण केलं गेलं होतं. ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याच षडयंत्र केलं होतं, त्याचं पितळ उघडं पडलं असून त्यांना ही मोठी चपराक आहे.’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात उद्यापासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल्स आणि अन्य रेस्टॉरंटस सुरू करण्यात येणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत. या दिशा निर्देशांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच, हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ग्राहकांना फक्त शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत, कच्चे पदार्थ देणं टाळावं, संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा, असं या नियमावलीत सुचवण्यात आलं आहे.

****

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ सप्टेंबरला त्यांची कोविड चाचणी बाधित आली होती. रुग्णालयात १० दिवस उपचार घेतल्यावर ते कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना आज सुटी देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या मृतांची संख्या आता ९५५ झाली आहे. जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता ३४ हजार १९३ झाली आहे. यापैकी २८ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या ४ हजार ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडग्रस्तांच्या संख्येमध्ये सातत्यानं घट होत आहे. दिवसाला १५० च्या पुढे रुग्ण आढळत होते, ती संख्या आता शंभरच्या आत आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं असून मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. सध्या जिल्ह्यात ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ८८ पूर्णांक एक शतांश टक्के झालं आहे. मृत्यू दरातही घट झाली असून हा दर एक पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यात मिळून गेल्या २४ तासात १ हजार ९५०

नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर याच कालावधीत १ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

****

अतिवृष्टीने मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानाचे सरसकट पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी केली आहे. दरेकर यांनी आज परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या नावकी शिवारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांची, फळबागांची मोठी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तत्काळ मदत देण्याची मागणी दरेकर यांनी केली. पीकविमा संदर्भातही त्वरीत निर्णय घ्यावेत, असं नमूद करत दरेकर यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजप भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज पाहणी केली. मंठा तालुक्यातल्या हातवन तसंच निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून टोपे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयं सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. बीड इथल्या सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोविड महामारीच्या काळात होमिओपॅथी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक आणि सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती असल्याचं देशमुख म्हणाले.

****

नाशिक जिल्ह्यात देवळाली लष्करी छावणीत अवैधरित्या छायाचित्रण करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. छावणीतल्या रुग्णालयाची छायाचित्रं काढताना काही सैनिकांनी या तरुणाला पकडून त्याचा मोबाईल तपासला असता, त्यानं ही छायाचित्रं पाकिस्तानातल्या एका वॉट्सॲप समूहावर पाठवल्याचं निदर्शनास आलं. संजीवकुमार असं या तरुणाचं नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचा बिहारमधला रहिवासी असलेला हा तरुण देवळाली छावणीत एका बांधकामावर कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

****

सातारा इथल्या तहसीलदारांची शासकीय धनादेश पुस्तिका चोरुन त्यातल्या ३ धनादेशांच्या वापराने शासकीय खात्यातल्या १४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलं आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालायातल्या पुरवठा शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यानं हा अपहार केला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

 

 

No comments: