Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
· कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी लिलाव सुरु करण्याचं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं आवाहन.
· मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं घटनापिठाची स्थापना करून
सुनावणी घेण्याची राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाकडे लेखी मागणी.
· राष्ट्रीय आरोग्य अभियानात कायम नियुक्त्या देण्याच्या
नावाखाली ४०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार.
· राज्यात आणखी सहा हजार ७३८ कोविड बाधितांची नोंद, ९१ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात ११ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ५७१ रुग्णांची
नोंद.
आणि
· दिवाळीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ ११ ते २२ नोव्हेंबर
दरम्यान दररोज एक हजार विशेष जादा बस गाड्या सोडणार.
****
कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव सुरु करावेत, कृषी उत्पन्न बाजार
समित्या बंद ठेऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय
कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं निर्यात बंदी बरोबरच साठवणुकीवर
मर्यादा घातली असून, त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या
बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सर्व लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत. त्या
पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांची कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी भेट
घेतली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्र सरकारकडे वेळ मागून
कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीत घेऊन जाण्याचं आश्वासन, पवार
यांनी यावेळी दिलं. केंद्र शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या
यादीतून कांद्याला वगळलं आहे, दुसरीकडे कांदा आयात आणि निर्यातीबाबत शासन कार्यवाही
करत आहे, या दोन्ही बाबी परस्परविरोधी असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. आंतरराष्ट्रीय
बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते, त्यामुळे याबाबत काही चुकीचे निर्णय
घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो. या प्रश्नांची सोडवणूक करायची
असेल तर राज्य शासनासोबतच केंद्रानं धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.
दरम्यान, पवार यांच्या आवाहनानुसार आज व्यापाऱ्यांची लिलाव
सुरु करण्यासंदर्भात बैठक होणार आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं घटनापिठाची स्थापना करून
मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी, अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारने
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना केली आहे. राज्य शासनाचे वकील सचिन पाटील यांनी
हा अर्ज सादर केला. या अर्जामध्ये सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग - एसईबीसी आरक्षणासंदर्भातला
नऊ सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश तातडीने मागे घेण्याची आवश्यकता असल्याचं नमूद करण्यात
आलं आहे. यापूर्वी सात ऑक्टोबर रोजी सुद्धा राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना
लेखी विनंती केली होती.
****
मागासवर्गीय प्रवर्गातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या
पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना केली आहे. सामान्य प्रशासन विभागानं
काल याबाबतचा शासन निर्णय जारी केला. मुंबई उच्च न्यायालयानं पदोन्नतीतील आरक्षणाचा
कायदा अवैध ठरवल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, या
पार्श्वभूमीवर हा मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ मतदार
संघात काल ५३ पूर्णांक ५४ शतांश टक्के मतदान झालं. गेल्या वेळेच्या तुलनेत हे प्रमाण
अधिक असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. सर्व मतदान केद्रांमधे
कोविड प्रतिबंधाबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली होती.
****
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तिकरण योजनेअंतर्गत
नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या शंभर कुंभार कुटुंबांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते इलेक्ट्रिक चाकं प्रदान करण्यात आली. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
काल हा कार्यक्रम पार पडला. कुंभारांना सक्षम करण्याच्या उद्देशानं हे वाटप करण्यात
आलं असून, या कुंभारांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं दहा दिवसांचं प्रशिक्षणही
देण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या दुर्गम भागातही या योजनेची अंमलबजावणी
केली जाईल असं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं,
वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन औरंगाबादचे साहित्यिक
आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर यांनी केलं आहे.
****
अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठीदेखील
मुंबईत रेल्वेची उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी राज्य शासनानं रेल्वे प्रशासनाकडे
केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सावधगिरी पाळत आणि
ठराविक वेळात उपनगरीय रेल्वेनं सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यासंदर्भातील
पत्र आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कायम नियुक्त्या देण्याच्या
नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री
आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ध्वनिफिती सुद्धा या पत्रासोबत
जोडल्या आहेत. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात मागील शासनानेच तत्कालिन अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची नियुक्ती केली होती, ही कार्यवाही
मागच्या सरकारच्या काळात सुरु झाली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं
आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती
गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती, आपण तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे
पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना या
प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे आणि दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. कर्मचाऱ्यांनी
अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार ७३८ कोविड बाधितांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६० हजार ७६६ झाली आहे. राज्यभरात
काल ९१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार
५५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आठ हजार ४३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ८६ हजार ९२६ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले
असून, सध्या एक लाख २९ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल आणखी ११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला, तर नव्या ५७१ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू, तर नवे ६६ रुग्ण,
औरंगाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ११९ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात दोन
रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ८९ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ तर परभणी जिल्ह्यात नव्या
४१ रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात ९४, जालना जिल्ह्यात ७९, तर हिंगोली जिल्ह्यात
आणखी सहा रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ३५४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७८७ नवे रुग्ण, तर सात मृत्यूंची
नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ३३७ रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात
२६९, सोलापूर २५०, अहमदनगर २३०, सांगली १४८, रायगड १४८, जळगाव १३०, गडचिरोली ११८, गोंदिया
९६, यवतमाळ ६६, बुलडाणा ५६, सिंधुदुर्ग ४०, धुळे २८, वाशिम २७, तर रत्नागिरी जिल्ह्यात
नव्या १३ रुग्णांची नोंद झाली.
****
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ
- एसटीनं ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे एक हजार विशेष जादा बस फेऱ्यांचं
नियोजन केलं आहे. या जादा बस गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बस स्थानकावरून सुटणार आहेत.
या बस गाड्यांचं आरक्षण टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती
परिवहन मंत्री तसंच राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. आरक्षणासाठी
प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन महामंडळानं केलं
आहे.
****
भारतीय कापूस महामंडळ - सी सी आयनं तत्काळ कापूस खरेदी
केंद्र सुरु करावं, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काल महामंडळाच्या औरंगाबाद
इथल्या विभागीय कार्यालयासमोर कापूस फेकून आंदोलन केलं. सणासुदीचे दिवस असल्यानं शेतकरी
खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकत असून, व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचं
प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय कापूस
महामंडळाचे उप - महाव्यवस्थापक अर्जुन दवे यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कापूस
खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन दिलं आहे.
****
परभणी महानगरपालिकेनं नवीन नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांना
३० नोव्हेंबर पर्यंत ३१ मार्च २०२० पर्यंतची थकीत पाणीपट्टी एकरकमी भरल्यास या पाणीपट्टी
करावरील विलंब शास्ती शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त
देविदासराव पवार यांनी काल ही माहिती दिली. नवीन नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांना मालमत्ता
कर भरण्याची अटही शिथील करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे
यांनी स्थानिक विकास निधीतून डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयास
रूग्णवाहिका दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते काल या रुग्णवाहिकेचं
लोकार्पण झालं.
****
बीड जिल्हा रुग्णालयातले निलंबित डॉक्टर बाळासाहेब टाक
यांनी खासगी रुग्णालयात काम केल्यामुळे शहरातल्या गौरी हॉस्पीटलचा परवाना रद्द करण्यात
आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. टाक यांना कोणत्याही
खासगी रुग्णालयात काम न करण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते गौरी हॉस्पीटलमध्ये भीषक
म्हणून रूग्णांना सेवा देत असल्याचं उघडकीस आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात
यांनी सांगितलं.
****
महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी
लावावा, या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं परभणी इथं कालपासून
दोन दिवसीय सामुहिक रजा आंदोलनाला सुरुवात केली. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनीही या
आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी
प्राचार्य डॉक्टर शाम सिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती
भगतसिंग कोश्यारी यांनी सदर नियुक्ती केल्याचं पत्र विद्यापीठाला काल पाठवलं. औरंगाबाद
शहरातल्या विवेकानंद महावि़द्यालयाच्या प्राचार्यपदी डॉक्टर सिरसाठ हे सध्या कार्यरत
आहेत. लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसंच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या
कार्यरत आहेत.
****
कोविड19 प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातलं मांजरा धरण पूर्ण भरलं
असून, आमदार नमिता मुंदडा यांनी काल मांजरा धरणात जलपूजन केलं. यंदाच्या पावदामुळे
जवळपास सर्वच धरणं पूर्ण भरली, मात्र मांजरा धरणाची पाणी पातळी कमीच होती. परतीच्या
पावसानं मात्र हे धरण पूर्ण भरल्याचं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
****
बीड शहरातल्या रस्त्याप्रश्नी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या
उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांच्या
कक्षाच्या दरवाज्यास बांगड्यांचा आहेर करण्यात आला. नगर परिषद प्रशासनाकडून बीड शहरातल्या
खराब रस्त्यांची कुठलीच दुरूस्ती होत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं.
****
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी
काल सोनपेठ तालुक्यातल्या उखळी इथं तीन लाख १८ हजार ९१० रुपयांचा गुटखा जप्त करुन एकाला
ताब्यात घेतलं. पथकानं मिळालेल्या माहितीवरून एका किराणा दुकानात छापा टाकून ही कारवाई
करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment