Monday, 26 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      खरेदी करतांना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन.

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दसऱ्याचा सण उत्साहात मात्र साधेपणानं साजरा; बाजारपेठेत चैतन्य.

·      वस्तु आणि सेवा कर प्रणाली फसल्याचं सांगत, जुनी प्रणाली लागू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी.

·      राज्यात आणखी सहा हजार ५९ कोविड बाधितांची नोंद, ११२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ५३१ रुग्णांची नोंद.

आणि

·      धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानं साजरा.

****

सणासुदीच्या या काळात खरेदी करतांना जनतेनं स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरून 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. अनेक भारतीय उत्पादनांना जगभरात मागणी आहे, याशिवाय जगातून मागणी येऊ शकेल, अशी आणखी अनेक उत्पादनं आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. खादी हे याचं उदाहरण असून, आजपर्यंत खादी हे सालसतेचं प्रतिक होतं, आता तिला पर्यावरणानुकूल वस्त्राच्या रुपात नवी ओळख मिळाली आहे, कोणत्याही मौसमात खादीचा वापर अनुकूल असल्यामुळे आता परदेशात तिचा वापर वाढत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामानं शिक्षणासाठी आवश्यक पेन्सिल निर्मितीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात दिलेलं योगदान तसंच शेतकऱ्यांचा शेतमाल थेट त्यांच्या शेतातून ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठीच्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात होत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आपल्या संवादात उल्लेख केला. केंद्र सरकारनं अलिकडेच आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं हीत कसं साधलं जाईल हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.

देशातल्या नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देताना, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करायच्या जबाबदारीची आठवणही त्यांनी मन की बातमधून करून दिली. ते म्हणाले –

आनेवाले त्यौहारों की आपको और आपके पुरे परिवार को बहोत बहोत बधाई हो। लेकिन एक बात याद रखिये और त्यौहारों मे जरा विशेष रूप से याद रखिये मास्क पहनना है। हाथ साबुन से धोते रहना है। दो गज की दुरी बनाये रखनी है।

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल राज्यात दसऱ्याचा सण उत्साहात मात्र साधेपणानं साजरा झाला. मात्र बाजारपेठेतले सगळे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिसून आलं. यावरून दिवाळीपूर्वी संपूर्ण बाजारपेठेची एकूण उलाढाल आणि अर्थस्थिती आणखी उंचावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी काल अनेक दुकानांमध्ये खूप गर्दी नसली तरीही वर्दळ दिसून आली. कापड, मिठाई, सजावटीची दुकानं, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात नेहमीपेक्षा कमी मात्र सकारात्मक गर्दी दिसून आली. गर्दी कमी असल्यानं आपोआपच सुरक्षित अंतर पाळलं गेलं. त्यामुळे आगामी काळात बाजारपेठांमधले व्यवहार सुरळीत सुरु होतील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.

****

दसऱ्याच्या सणानिमित्त दरवर्षी होणारे मोठमोठे गर्दी जमवणारे समारंभ यावर्षी झाले नाहीत, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आपले वार्षिक मेळावे आणि सभा यावर्षी ऑनलाईन घेतल्या.

मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन झाला. या मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, वस्तू आणि सेवा कर प्रणाली फसली असल्याचं सांगत, जुनी प्रणाली लागू करण्याची मागणी केली. ही प्रणाली रद्द करण्यासाठी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येण्याचं आवाहनही, मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्याच्या हक्काचा थकित वस्तू आणि सेवा कराचा ३८ हजार कोटी रूपयांचा पैसा केंद्राकडून मिळतं नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षांवरही प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे जोरदार टीका करतांना मुख्यमंत्र्यांनी, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात मंदिरं सुरू करण्यासंदर्भातल्या आंदोलनावरही जोरदार टीका केली. राज्यातलं आपलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी विरोधी पक्षांना दिलं. राज्याच्या एकजूटीला तडा जाईल असं कोणतंही कार्य आपण करणार नसल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, आदिवासी, धनगर, इतर मागासवर्ग आणि मराठा समाजाला न्याय देऊ, असं आश्वासन दिलं.

****

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी दिलेलं दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज पुरेसं नसल्यानं त्यांनी आणखी उदारता दाखवावी, असं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात, त्या काल बोलत होत्या. उसतोड कामगारांच्या समस्या कायम आहेत असं नमूद करताना, उसतोड कामगार महामंडळ कधी होणार, असा प्रश्र्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटाचा उल्लेख करताना, या संसर्गामुळे जनसंपत्ती कमी होऊ नये, हेच आपलं देवाकडे मागणं असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या. आपल्या ऑनलाईन भाषणात पंकजा यांनी राजकीय विरोधकांवरही जोरदार टीका केली.

****

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, काल बीड जिल्ह्यात भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला. ऊसतोड कामगारांची मोठी अडचण होत असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दबावगट निर्माण होणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. सरकारनं विधानसभेत कायदा मंजूर करून घेत माथाडी कामगारांप्रमाणे ऊसतोड कामगारांचं मंडळ निर्माण करा अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे कुटुंब आणि समाजात तणाव वाढण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. परिणामी अपराध, औदासिन्य, आत्महत्या इत्यादी वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी समुपदेशनाची व्यापक आवश्यकता आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरमध्ये रेशीमबाग परिसरात विजयादशमी आणि शस्त्रपूजनाच्या निमित्तानं आयोजित उत्सवात ते ऑनलाईन बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींवर भर दिला. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या असून या काळात स्वदेशीचं महत्त्व वाढलं आहे. शिवाय लोकांना कौटुंबिक व्यवस्थेचं महत्त्व पटलं तसंच लोकांचा पर्यावरण संवर्धनाकडेदेखील ओढा वाढल्याचं त्यांनी सरसंघचालक म्हणाले.

****

नाशिकमध्ये दसरा उत्साहात साजरा झाला असला तरी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही पारंपारिक तसंच सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सकाळी होणारं दसरा संचलन रद्द करण्यात आलं आणि त्याऐवजी ऑनलाइन कार्यक्रम घेऊन कोरोना विषाणू संसर्ग काळात स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली. घर खरेदीच्या नोंदणीसाठी दुय्यम नोंदणी कार्यालयं सुरू ठेवण्यात आली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदीरात काल नवमी आणि विजयादशमीनिमित्त पारंपारिक विधी होऊन घटोत्थापना झाली.

नांदेड जिल्ह्यात माहूर इथंही श्री रेणुका देवीचा नवरात्रोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा झाला. परशुरामाच्या पालखीने सिमोल्लंघन झाल्यावर काल या महोत्सवाची सांगता झाली.

****

नांदेड इथं काल सचखंड गुरूद्वारामध्ये दशहरा महोत्सव पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गामुळे शासनाने अद्यापही धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूद्वारा संस्थानला न्यायालयानं हा महोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली होती.

****

परभणी जिल्ह्यातही दसऱ्याचा सण अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. मंदिरं तसंच धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे नागरिकांनी घरातच राहून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं काल सकाळी गजानन नगरातील विठ्ठल मंदिर परिसरात शस्त्रपूजन करण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेनुसार अगदी मोजक्याच स्वयंसेवकांची उपस्थिती यावेळी होती.

****

यंदाच्या खरीप हंगामात सरकारी धान खरेदीला वेग आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के अधिक धान-खरेदी झाली आहे. ही सर्व खरेदी किमान आधारभूत किमतींन झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलं. कालपर्यंत १४४ लाख टन धान खरेदी झाली असून त्यामुळे १२ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना २७ हजार २९८ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. एकूण खरेदीत सर्वाधिक ६५ टक्के वाटा पंजाब राज्याचा आहे. सुमारे ४५ लाख टनाहून अधिक डाळी आणि  तेलबियांच्या खरेदीलाही चालू खरीप हंगामात मान्यता दिली असून महाराष्ट्रासह तामिळनाड, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेशातून किमान हमी भावानुसार ही खरेदी होणार आहे. 

****

राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार ५९ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ४५ हजार २० झाली आहे. राज्यभरात काल ११२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार २६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल पाच हजार ६४८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ६० हजार ७५५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४० हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ५३१ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १०५ रुग्ण आढळले. नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात नव्या १०१, तर बीड जिल्ह्यात ८० रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यात ९६, लातूर जिल्ह्यात ८२, उस्मानाबाद जिल्ह्यात ४६, परभणी जिल्ह्यात १२ तर हिंगोली जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत काल आणखी एक हजार २२२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४६ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ६५१ नवे रुग्ण, तर नऊ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४३३ रुग्ण आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २३६, सोलापूर १५९, सांगली १५४, पालघर १३६, जळगाव ७२, सिंधुदुर्ग ३४, बुलडाणा ३३, वाशिम २२, तर रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी १३ रुग्णांची नोंद झाली.

****

नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल साधेपणानं साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून धम्म अनुयायांना आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना अर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. काल सकाळी दीक्षाभूमीच्या परिसरातल्या तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसंच मध्यवर्ती स्तुपातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला माल्यार्पण स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आलं.

लातूर इथं ६४ वा अनुप्रवर्तन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येवून बाविस प्रतिज्ञा घेण्यात घेवून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या बुद्धविहारातील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी मोजकेच बौद्ध उपासिका उपस्थित होत्या. औरंगाबाद इथं बुद्ध लेणीवर काल शुकशुकाट जाणवला. सकाळी केवळ भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्म ध्वजवंदन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या बालानगर ते ढोरकीन रस्त्यावर सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि वाहतूक करण्यात येणारं वाहन असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल औरंगाबाद ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकानं ताब्यात घेतला आहे. परवा मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

****

नांदेड शहरातल्या श्रीनगर भागात काल भूकंपाचे २ सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ० पूर्णांक ६ आणि ० पूर्णांक ८ अशी नोंदवण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणामधील ६ दरवाजांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून हे दरवाजे अर्धा फुटानं बंद करण्यात आले आहेत. सध्या धरणातून ३ हजार १४४ धनफूट प्रतिसेकंद या प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडला जात आहे.

****

नांदेडचे माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी कोरोना विषाणूच्या संकटापासून बचाव करण्यासाठी जनतेला मास्क वापरा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा आणि वेळोवेळी हात धुण्याचं आवाहन केलं आहे.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर सरकारनं राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिली असून कालपासून या संदर्भातल्या नियम आणि अटी पाळून अनेक व्यायामशाळा सुरू झाल्या. नांदेडचे जिल्ह्याधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांनी या संदर्भातले आदेश जारी केले असून जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या भागातल्या व्यायामशाळा सुरु करता येणार नाहीत, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

परभणी शहरात संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेतर्फे रस्ता दुरुस्तीसाठी काल होमहवन करुन आंदोलन करण्यात आलं. तालुक्यातील देवगाव फाटा ते जिंतूर आणि औंढा राज्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत होत असलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग-जिंतूर आणि राज्य महामार्ग विभाग-जालना यांच्यातर्फे याबाबत टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे.

****

No comments: