Sunday, 25 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

** एक मार्च ते ३१ ऑगस्ट या काळातलं कर्जावरील चक्रवाढ व्याजावरचं व्याज माफ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय; नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ मिळणार

** आयकर विवरणपत्र भरण्याच्या मुदतीत ३१ डिसेंबर पर्यंत वाढ

** राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षांमधल्या अडचणींच्या तपासासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापणार

** राज्यात आणखी सहा हजार ४१७ कोविड बाधितांची नोंद, १३७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

** मराठवाड्यात १७ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ५१० रुग्णांची नोंद

आणि

** काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायक पाटील यांच्या पार्थिवावर नाशिक इथं शासकीय इतमामा अंत्यसंस्कार

****

कोविड १९ च्या परिणामांच्या झळा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजाच्या रकमेमधली फरकाची रक्कम कर्जदारांना परत देण्यासाठी एका योजनेला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या वित्तसेवा विभागानं ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत एक मार्च ते ३१ ऑगस्ट या सहा महिन्यांच्या काळात दोन कोटी रुपयांपर्यंतचे सु्क्ष्म आणि मध्यम उद्योगांचे कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, क्रेडीट कार्डच्या थकीत रक्कमेवरील चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजामधली फरकाची रक्कम देण्यात येणार आहे. मात्र, ज्या कर्जधारकांची बँकेकडील एकूण कर्जाची रक्कम ही दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं वित्तसेवा विभागानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ज्या कर्जदारांनी नियमित कर्जफेड केली, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

****

२०१९-२० या आर्थिक वर्षाचं आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वसामान्य करदात्यांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आयकर विवरणपत्र भरता येईल. पूर्वी ही मुदत ३० नोव्हेंबर २०२० रोजी संपणार होती. ज्या करदात्यांचं लेखा परीक्षण आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ही मुदत ३१ जानेवारी २०२१ करण्यात आली आहे. आंतररराष्ट्रीय तसंच देशांतर्गत आर्थिक व्यवहार करणाऱ्या करदात्यांनाही ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आयकर विवरणपत्र दाखल करता येणार आहे.

२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र दाखल करण्याची मुदतही येत्या ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपणार होती.

****

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या अडचणींच्या तपासासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. या चार सदस्यीय सत्यशोधन समितीत उच्च आणि तंत्रज्ञान या दोन्ही विभागांचे संचालक, एक उपसचिव आणि तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञाचा समावेश असेल. विद्यापीठाचे कुलगुरू, निबंधक आणि परीक्षा मंडळाचे संचालक या समितीत निमंत्रित असतील. या समितीचा अहवाल कुलपतींना सादर झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल असं सामंत यांनी सांगितलं. ऑनलाईन परीक्षा घेताना ज्या गोष्टी घडल्या, ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यासही समिती करेल, असं ते म्हणाले. ज्या ऑनलाईन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या, त्या संबंधित तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना विद्यापीठांना केल्या आहेत.

****

आणि आता ऐकूया आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू तसंच योगअभ्यासक धनश्री लेकुरवाळे यांनी केलेलं कोविड प्रतिबंधात्मक खबरदारीचं आवाहन

****

महाराष्ट्र वक्फ मंडळाचं कार्यालय मुंबईला हलवण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. येत्या सहा महिन्यात वक्फ मंडळाचे सर्व दस्तावेज डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार असून, महामंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार जनतेला कोविडची लस मोफत देणार असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या नमस्ते ट्रंप या दौऱ्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा सतरावा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल, त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संबोधनाचा अनुवाद प्रसारित केला जाईल. या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण केलं जाणार आहे

****

विजयादशमी म्हणजेच दसरा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी देशवासियांना दुर्गापूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सण सुरक्षितपणे साजरा करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनारुपी रावणाचा नाश करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून केलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीची काल महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञात पूर्णाहुती देण्यात आली. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात आज महानवमी निमित्त श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा, घटोत्थापन तसंच रात्री अहमदनगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे. आवश्यक तेवढ्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधविषयक सर्व नियम पाळून दसऱ्यांचं सीमोल्लंघन साध्या पध्दतीनं साजरं होणार आहे.

****

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची काल पुर्णाहुतीने सांगता झाली. तहसीलदार संतोष रूईकर यांच्याहस्ते योगेश्वरी देवीची सपत्निक विधीवत महापूजा करण्यात आली. आज विजयादशमीनिमित्ताने सायंकाळी ६ वाजता सीमोल्लंघनासाठी योगेश्वरी देवीची पालखी मंदिरालाच फेरी मारणार आहे. अत्यंत मोजक्या लोकांत शासकीय नियमांचे पालन करून हा पालखी सोहळा बंद दरवाजाआड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

दरम्यान, देवींच्या मूर्तींचं आज विजयादशमीला साध्या पद्धतीने विसर्जन करावं, मिरवणूक काढू नये, असं आवाहन परभणी महानगरपालिकेनं केलं आहे. सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देवींच्या मूर्तींचे आणि निर्माल्याचं संकलन करून त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेनं सांगितलं आहे.

****

कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी समाजातील नवदुर्गांनी केलेले कार्य संकट मोचक ठरले असून यावर्षीचा दसरा त्यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याचं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या जनतेला शुभेच्छा देत, यंदाचा दसरा साधेपणाने तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून साजरा करावा असं आवाहनही केलं आहे.

****

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा कोविड अहवाल बाधित आला असल्याचं त्यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना विषाणू चाचणी करण्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार ४१७ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ३८ हजार ९६१ झाली आहे. राज्यभरात काल १३७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार १५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ५५ हजार १०७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४० हजार १९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ५१० रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला तर औरंगाबाद जिल्ह्यात १५१ आणि बीड जिल्ह्यात ७७ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर ६७ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५९ नवे रुग्ण आढळले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात ७६, तर परभणी जिल्ह्यात १४ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ५९ तर हिंगोली जिल्ह्यात आणखी सात रुग्णांची नोंद झाली. 

****

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायक पाटील यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं शासकीय इतमामा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं परवा नाशिक इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. विनायक पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा बौद्ध धम्म अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. नागपूर इथं दीक्षाभूमी परिसरात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अनुयायांनी आपल्या कुटुंबासोबत घराघरात बाबासाहेबांना अभिवादन करावं, अशी विनंती त्यांनी केली.

****

प्रधानमंत्री स्व - निधी योजनेचा उस्मानाबाद इथं छोट्या व्यावसायिकांना लाभ होत असल्यामुळे या व्यावसायिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ......

उस्मानाबाद शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या छोट्या विक्रेत्यांना त्यासंबंधी लागणारी कागदपत्र, तसंच नगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि बँकांच्या संबंधी यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंग राणा यांच्या पुढाकारानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे अनेकांच्या व्यवसायाला दहा हजार रुपयांचं कर्ज मिळणे शक्य झालं आहे. या व्यावसायिकांच्या व्यवसायाला या स्वनिधीमुळे हातभार लागले असून लॉकडाऊन काळात ठप्प झालेल्या व्यवसायाला पुन्हा गती येत आहे.यामुळे व्यावसायिकांनी केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.

देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव इथं काल विविध विकासकामांचं उद्घाटन केंद्रीय ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झालं. केंद्राच्या विविध योजनांचा निधी शहराला उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. दानवे यांनी तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

****

कोविड १९ प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे यांनी केलं आहे

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद इथल्या उपकेंद्राअंतर्गत परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येत आहे. एक नोव्हेंबरला देखील ही फेरपरीक्षा घेतली जाणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

****

विश्वहिंदू परिषेदेच्या वतीनं काल राज्यभरात मंदीरं उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. हिंगोली इथं विश्वहिंदू परिषेदेच्या कार्यकर्त्यांनी खटकाळी बायपास इथल्या हनुमान मंदिराचे कुलूप काढून मंदिरात प्रवेश केला. मंदिर बंद ठेवणाऱ्या राज्य सरकारचा यावेळी ढोल वाजवून निषेध करण्यात आला.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी काल विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केलं.

//*************//

No comments: