Monday, 26 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा दर ९० पूर्णांक २३ शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात गेल्या २४ तासात कोरोना विषाणू संसर्गाचे ४५ हजार १४९ नवे रुग्ण आढळले त्यामुळे देशातल्या कोविडग्रस्त रुग्णांची संख्या ७९ लाख ९ हजार ९६० झाली आहे. यापैकी ७१ लाख ३७ हजार २२९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ४८० रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, देशातला मृतांचा आकडा एक लाख १९ हजार १४ वर पोहचला आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ६ लाख ५३ हजार ७१७ आहे.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयएसीएमआरने काल एका दिवसात ९ लाख ३९ हजार ३०९ नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात दहा कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ चाचण्या झाल्याची माहिती आयएसीएमआरने दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ४८१ झाली आहे. यापैकी ३५ हजार ३७० कोविड बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण १ हजार ५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, एकूण १ हजार ५६ रुग्णांवर जिल्ह्यात सध्या उपचार सुरू आहेत

****

मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार २२२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ५१ हजार २८३ झाली असून एकूण मृतांचा आकडा दहा हजार ६२ वर पोहचला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या पालखी सोहळ्याला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसतानाही पालखी मिरवणूक काढल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती.

****

रायगड जिल्ह्याचं श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज पहाटे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीनं श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली. कोविड प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करत चार तासांतच पालखी मंदिरात परतली. सशस्त्र पोलिसांची मानवंदना दिली जाणारं, हे राज्यातलं एकमेव देवस्थान आहे.

****

नांदेड जिल्ह्यातले उद्योजक डी. बी. पाटील होटाळकर यांचं काल पुणे इथ अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. पाटील हे राज्य कापूस खरेदी महामंडळाचे माजी संचालक होते. तसंच दत्त्त शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्यांनी नायगाव भागात कापूस जिनिंग उद्योग यशस्वी पणे चालवला. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

“स्ट्रीट्स फॉर पीपल” या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत औरंगाबाद शहर सहभागी होत आहे. या अंतर्गत शहरातले तीन मुख्य रस्ते कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पथदर्शी प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे. केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली आहे. शहरातल्यर रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुलांमुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं आणि कोरोना विषाणू संसर्गातून ग्रीन रिकव्हरी करणं, या योजनेचा उद्देश आहे. या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करताना वर नमूद तीन रस्त्यांच्या काठावर पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित जागांची निर्मिती, सौंदर्यीकरण आणि आर्थिक प्रगतीचा विचार करण्यात येणार आहे. शहरातले सिटीझन्स ग्रुप, वास्तुविशारद, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना या प्रकल्पात सहकार्य करण्याचं आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे यांनी केलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने अकोला, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यातले शेतकरी आपला माल येथे विक्रीसाठी आणत आहेत. मध्यरात्रीपासूनच या बाजार समिती समोर मालवाहू वाहनांची लांबच लांब रांग लागलेली दिसत आहे.

****

औरंगाबाद इथं एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांसह एका विधीसंघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली रकमेपैकी दोन लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. चोरट्यांनी या व्यावसायिकाच्या कार्यालयातून सहा लाख २५ हजार रुपये ठेवलेली तिजोरी पळवून नेली होती. या सर्वांना न्यायालयानं २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

****

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद राहणार नाही अशी माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद करण्यात येणार असल्याची अफवा सामाजिक संपर्क माध्यमांवर फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिघोळे यांनी ही माहिती दिली आहे. कांदा उत्पादक संघटनेचा याच्याशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

No comments: