Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
कोविड चाचण्यांच्या शुल्कात पुन्हा एकदा कपात; सुधारित दर खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक
**
हिंगोली इथं कोविड परीक्षण प्रयोगशाळेचं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
**
मराठवाड्यात पायाभूत सुविधा विकासाला शासनाचं प्राधान्य - सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण
आणि
**
मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू
****
राज्यात
खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांच्या शुल्कात पुन्हा एकदा
कपात करण्यात आली आहे. नव्यानं निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, एक हजार
चारशे आणि एक हजार आठशे असा तीन टप्प्यातला दर निश्चित करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले....
आपण
पूर्वीपासून टेस्टिंग भर देण्यासाठी केंद्र शासनानेच ठरवलेले रेट आहेत. आम्ही नेहमी
खाली आणत–आणत चार हजार पाचशे वरून तो बावीसशे वर आणला बाराशे वर आणला आणि आज आम्ही
नऊशे ऐंशी वर टेस्टिंगचा रेट आणलेला आहे. जी टेस्टिंग लॅब ठिकाणी फक्त प्रोसेसिंग करून
रिपोर्ट देते त्यांना नऊशे ऐंशी रुपये मध्ये जे लॅब घरी जाऊन कलेक्शन करतात आणि तुम्हाला
पूर्ण जाण्यायेण्याचा खर्च, पीपीई
किटचा खर्च सगळाचं खर्च करतात त्यांना अठराशे रुपये आणि जे हॉस्पिटल इतर काही
खर्च करतात आणि ते लोक जाऊन घेऊन येतात त्यांना आपण चौदाशे रुपये.
कोविड
संसर्ग तपासणीचे हे सुधारित दर खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असून, यापेक्षा अधिक दर
आकारणं अवैध ठरेल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे
७० हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
****
हिंगोली
जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ विषाणू परीक्षण
संशोधन आणि निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेचं ई-उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा
गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या प्रयोगशाळेत दर दिवशी २०० ते ३०० रुग्णांच्या
आरटी-पीसीआर चाचण्या होणार आहेत. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या
कार्यक्रमात खासदार राजीव सातव, आमदार संतोष बांगर, आमदार बिप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांना आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवार यांना
कोविडचा संसर्ग झाला आहे. आपली प्रकृती ठीक असल्याचं पवार यांनी ट्वीटरवरून सांगितलं
आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन
नांदेडच्या महापौर मोहिनी येवणकर यांनी केलं आहे.
****
मुंबईत
सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे विनामास्क फिरणा-यांवर मुंबई महापालिकेने कारवाई तीव्र
केली आहे. मागील २१ दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या तब्बल ८२ हजाराहून अधिक नागरिकांवर
पालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईत १ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला
असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
****
शिवसेनेचा
कालचा दसरा मेळावा हा विरोधकांचा अपमान करणाऱ्या भाषणापुरता आणि आदित्य ठाकरे यांना
क्लिन चिट देण्यासाठी होता, उर्वरित महाराष्ट्रासाठी या मेळाव्यात काहीही नव्हतं, अशी
टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री
तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात नमूद केलेले मुद्दे तसंच त्यांच्या
भाषा शैलीवरही राणे यांनी टीका केली. कोरोना प्रादुर्भाव, अतिवृष्टी सारख्या मुद्यांवर
मुख्यमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित होतं, असं राणे म्हणाले. या सरकारबद्दल शिवसेनेतही
असंतोष असल्याचा दावा राणे यांनी केला. दरम्यान, भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनीही
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका केली.
*****
मराठवाड्यातल्या
पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचं प्राधान्य असून अति पावसामुळे रस्ते, आणि पूलांच्या
झालेल्या दुरावस्थेच्या दुरूस्तीकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी- अंजनडोह
आणि हर्सुल-जटवाडा इथल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी चव्हाण
यांन आज केली, त्यानंतर ते बोलत होते. पळशी इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या कापूस पिकाच्या
झालेल्या नुकसानीची पाहणीही चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शासनाने
जाहीर केलेली मदत नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला मिळेल, असं आश्वासन चव्हाण यांनी
दिलं. हर्सुल- जटवाडा इथल्या नुकसानग्रस्त रस्त्याची पाहणी करून या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत
चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
****
तुळजापूर
इथल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास
तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती
करुन अहमदनगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर
प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या
साथीनं सर्व धार्मिक विधी करण्यात आले. सीमोल्लंघना नंतर देवीच्या निद्रेला आजपासून
पुन्हा प्रारंभ झाला, कोजागरी पौर्णिमेपर्यंत देवीची निद्रा सुरू राहणार आहे.
****
महाराष्ट्र
आणि अफगणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक
कार्य मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे, ते आज मुंबईत अफगाणिस्तानच्या वाणिज्य
दूत झाकिया वारदाक आणि त्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. अफगणिस्तानातल्या
निसर्गरम्य परिसरात चित्रीकरण करण्याबाबत या बैठकीत प्राथमिक बोलणी झाली. आगामी काळात
वैद्यकीय, सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं देशमुख
यांनी सांगितलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू तालुक्यातली अतिवृष्टीमधून वगळलेली आठ महसूल मंडळे अतिवृष्टीग्रस्त
मंडळामध्ये समाविष्ट करावीत, या मागणीचे निवेदन माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांच्याकडे आज दिलं. परभणी जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे खरीपातील सोयाबीन,
कापूस, तूर, उडीद, हळद, या पिकांसह ऊस आणि फळबाग आदी पिकांचं प्रचंड नुकसान झालं. जिंतूर
तालुक्यातील तीन आणि सेलू तालुक्यातील दोन महसूल मंडळे अतिवृष्टी बाधित घोषित करण्यात
आली. मात्र, जिंतूर तालुक्यातील पाच आणि सेलू
तालुक्यातील तीन अशी एकूण आठ मंडळं वगळण्यात आली आहेत. या आठही मंडळात शेतकऱ्यांच्या
पिकांचं मोठं नुकसान झालं असून या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्तांमध्ये समाविष्ट करावा
अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
****
मोसमी
पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबईतल्या प्रादेशिक हवामान
विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ही माहिती दिली. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र
तसंच मराठवाड्याच्या काही भागातून पाऊस परतून गेला असून, परिस्थिती अनुकूल असल्याने,
पुढच्या २४ तासांत मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण होईल, असं होसळीकर
यांनी सांगितलं.
दरम्यान,
उस्मानाबाद इथं आज दुपारनंतर पाऊस सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
केंद्र
सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी आणि अलीकडेच घातलेल्या साठवणूक मर्यादेच्या पार्श्वभूमीवर
नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधलं सर्व प्रकारचं कामकाज आज बंद ठेवण्यात आलं.
या संदर्भात कोणत्याही प्रकारचं अधिकृत पत्र व्यापारी अथवा कांदा उत्पादकांच्या संघटनांनी
बाजार समित्यांना दिलं नाही. जिल्ह्यातल्या लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा, मनमाड अशा
विविध बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला असला तरी त्याचं प्रमाण
अत्यल्प होतं. दरम्यान, बाजार समित्यांमध्ये कोणत्याही शेतमालाचे लिलाव झाले नसल्याचं
आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
राज्याचे
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या
हस्ते आज मांजरा धरण प्रकल्पातल्या पाणीसाठ्याचं जलपूजन करण्यात आलं. धरणातल्या पाण्याचा
वापर अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन पालकमंत्री मुंडे केलं.
****
नांदेड
शहराजवळ असलेल्या मातासाहेब गुरूव्दारात मातासाहेब देवाजी यांच्या ३३९ व्या जन्मोत्सव
सोहळ्याला आजपासून सुरूवात झाली. या सोहळ्याचे उद्घाटन सचखंड गुरूव्दाराचे मीत ग्रंथी
गुरूमितसिंघ यांच्या हस्ते करण्यात आलं, तीन दिवस हा सोहळा चालणार असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना
जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात वाटूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा टाकणाऱ्या
सहा संशयितांना पोलिसांनी आज अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत
चोरट्यांनी पळवलेल्या तिजोरीसह रोख रक्कम, बँकेतले साहित्य, गुन्ह्यासाठी वापरलेली
हत्यारं आणि तीन वाहने, असा एकूण १४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात
आला आहे.
*******
धुळे
इथल्या ॲक्सिस बँकेच्या शाखेत धुळे विकास सहकारी बँकेचं चालू खातं ऑनलाईन हॅक करून
कोट्यवधी रुपये लुबाडणाऱ्या ५ जणांच्या टोळीला दिल्ली इथून अटक करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment