Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाचे पहिले
गृहमंत्री-लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती देशभर एकता दिवस
म्हणून साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी गुजरात राज्यातल्या केवडिया
इथल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली
अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्ध सैनिक
दलाच्या जवान-अधिकारी आणि नागरिकांना एकतेची शपथ दिली. तसंच विविध सुरक्षा दलांच्या
जवानांचं पथसंचलन यावेळी झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामामधे झालेल्या हल्ल्याबाबत
घेतलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षांवर टिका केली आहे. या हल्ल्यात ४० निमलष्करी
दलातल्या जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दु:ख झालं नसल्याचं
ते म्हणाले. ते आज सकाळी गुजरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात
आलेल्या दौडमधील सहभागींना संबोधित करताना बोलत होते. पुलवामामधल्या दुर्घटनेबाबत
सबंध देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले
होते, असंही ते म्हणाले. जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात
आल्यानंतर विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी
म्हणाले. दहशतवादाचा सामुहिक सामना करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला
एकजुट होण्याचं आवाहन देखील यावेळी केलं.
दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केवडिया इथल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘ ते अहमदाबादमधे साबरमती
नदीचा काठ या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या समुद्र विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत. तत्पूर्वी
काल त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं समुद्र पर्यटन करणाऱ्या बोटसेवेचा आणि ३५ हजार
चौरस फुटांवर उभारलेल्या एकता मॉलचं देखिल उद्घाटन केलं.
*****
देशात कोविड १९ संसर्गाचे
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर पोहचलं असल्याचं
सरकारनं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे
झाले आहेत. तर आतापर्यंत या संसर्गातून ७४ लाख ३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले
आहेत. तर केवळ ७ पूर्णांक १६ दशांश टक्के एवढेच रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय
आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ४८ हजार २६८ नवे
रुग्ण आढळल्यानं देशातल्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४८ हजार २६८ झाली असल्याचं
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
माजी पंतप्रधान इंदिरा
गांधी यांची आज ३६ वी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना
अभिवादन केलं. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या
सर्वकालिन महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनीही त्यांना अभिवादन केलं.
****
बंजारा समाजाचे धार्मिक
गुरू तसंच वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथले मठाधिश डॉ.रामराव महाराज यांचं काल
रात्री मुंबई इथं खासगी इस्पितळात निधन
झालं. ते नव्वद वर्षाचे होते. त्यांच्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी रामाराव बापू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही
त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
कृषि उत्पन्न बाजार
समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी
कांद्याची साठवणूक मर्यादा २५ मेट्रीक टनावरून १५०० मेट्रीक टन करण्यात यावी अशी
मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय
ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या
वतीने आजपासून मेगा साफसफाई मोहिम राबविण्यात येणार आहे़ महानगरपालिकेच्या नऊ झोन
कार्यालयामध्ये या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. महापालिकेने एक नोव्हेंबर ते
दिवाळीपर्यंत शहर स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी ‘लव्ह औरंगाबाद’ या
मोहिमेचा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे.
//*************//
No comments:
Post a Comment