Wednesday, 28 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.10.2020 रोजीचे दुपारी 13.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

रिजर्व्ह बँकेने सर्व कर्जदार संस्थांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरची मार्च ते ऑगस्टपर्यंत सहा महिन्यांच्या काळातली व्याजमाफीची रक्कम येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत कर्जदारांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे कर्ज वसुली स्थगित करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यानुसार साधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोन्हीतल्या फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देश रिजर्व्ह बॅंकेने दिले आहेत. शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, वाहनकर्जासह क्रेडीट कार्ड थकबाकीदार, आणि सूक्ष्म-लघु आणि मध्यम कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. या टप्प्यात १६ जिल्ह्यातल्या ७१ मतदार संघात मतदान होत आहे. यापैकी ३५ मतदार संघ नक्षलग्रस्त भागात आहेत. ११ वाजेपर्यंत १८ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच होत असलेल्या या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत २४३ आमदार निवडीसाठी सुमारे दोन कोटी १४ लाखांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ३ नोव्हेंबरला तर तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान ७ नोव्हेंबरला होणार आहे.

****

देशाचा कोविड संसर्गमुक्तीचा दर सुमारे ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी ७२ लाख ५९ हजार ५०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्तीचा दर ९० पूर्णांक ८५ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात या संसर्गाचे ६ लाख १० हजार ८०३ सक्रीय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख २० हजार १० एवढी झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर एक पूर्णांक ५० शतांश टक्के एवढा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल दिवसभरात एकूण दहा लाख ६६ हजार ७८६ नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण दहा कोटी ५४ लाख ८७ हजार ६८० कोविड चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली.

****

टाळेबंदी उठवण्याच्या पुढच्या टप्प्यात ३० सप्टेंबर रोजी जारी केलेले दिशानिर्देश केंद्र सरकारनं ३० नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदी कायम राहणार असून, त्याबाहेरचे सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ६६४ झाली आहे. यापैकी ३५ हजार ६२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार ६३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या ९७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मुंबईत गेल्या २४ तासांत ८०१ कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या २ लाख ५२ हजारावर पोहोचली आहे. आतापर्यंत २ लाख २२ हजारावर रुग्ण संसर्गमुक्त झाले असून १० हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार २९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

****

पालघर जिल्ह्यात आजपर्यंत ३८ हजार १८० रुग्ण कोविडसंसर्ग मुक्त झाले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ४० हजार ३५३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत पालघर ग्रामीण भागात ६११ प्रतिबंधित क्षेत्रं आहेत.

****

नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आज पहाटे चार जणांनी कोविड कक्षाची तोडफोड केली. जुहूगाव इथं राहणाऱ्या एका कोविडग्रस्ताचा या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कोविड कक्षाची नासधुस केली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

****

अहमदनगर इथल्या खासगी रुग्णालयांनी कोविडग्रस्तांकडून आकारलेल्या जादा शुल्काचे २९ लाख १२ हजार ३९० रुपये रुग्णांना तातडीने परत करण्याचे आदेश मनपा आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिले आहेत. ही रक्कम सात दिवसांच्या आत रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा न केल्यास संबंधित रुग्णालयांविरोधात साथ रोग अधिनियमअन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री दिवंगत विनायक पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी पवार त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. पाटील यांचं गेल्या शुक्रवारी निधन झालं होतं.

****

No comments: