Friday, 30 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30 OCTOBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

**कांदा लिलाव सुरू, लासलगांवमध्ये क्विंटलला पाच हजार शंभर रुपये भाव

**जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ११३ रुग्ण तर चार रुग्णांचा मृत्यू

**बचत खात्यातून व्यवहारासाठी शुल्क आकारलं जाणार नसल्याची केंद्र सरकारची माहिती

आणि

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची एमफील प्रवेशासाठी २० नोव्हेंबरला परिक्षा

****

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु केल्यानंतर आज पहिल्या दिवशी लासलगाव इथं सरासरी पाच हजार शंभर रुपये क्विंटल तर विंचुर इथं पाच हजार तिनशे रुपये क्विंटल भाव मिऴाला. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर व्यापा-यांनी लिलाव सुरू करावेत असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानं आज सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक प्राप्त झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ११३ रुग्ण आज आढळले असून एकूण रुग्ण संख्या 

दहा हजार ७२९ झाली आहे. यातले नऊ हजार ५७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५८  असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यात या संसर्गावर उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता २८३ झाली आहे.

****

औरंगाबादमध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांना आज उपचार घेऊन बरे झाल्यानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार २३९ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार ९१६ झाली असून एक हजार ६९ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्यास शंभर रुपये शुल्क आकारलं जातं, हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. 

****

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये सुरु असलेल्या वार्तांकनावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. माजी पोलिस अधिका-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त केली.  न्यायालयाप्रमाणे वार्तांकन करणा-या वृत्तवाहिन्यांवरही बंधनं असली पाहिजेत,  एखाद्या तपासावर दबाव पडेल अशी बातमीदारी योग्य नाही. माध्यमांच्या दबावामुळे तपास अधिकारी चुकीच्या व्यक्तीला अटक करू शकतात अशी चिंताही न्यायालयानं व्यक्त केली आहे.

****

योग्य प्रक्रिया न करता शहरातलं सांडपाणी, घनकचरा आणि प्लास्टीक थेट समुद्रात मिसळल्यामुळे झालेल्या पर्यावरण हानी प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादानं मुंबई महापालिकेला २९ कोटी ७५लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई शहरातून समुद्रात, खाडीत अनेक ठिकाणी प्रक्रिया न करता सांडपाणी सोडलं जात असल्यानं पाण्याचं प्रदूषण वाढल्याच्या पार्श्र्वभूमीवर वनशक्ती या पर्यावरण क्षेत्रातल्या संस्थेचे डी. स्टालिन यांनी २०१८ मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका केली होती. त्यावरून हा दंड ठोठावण्यात आला आहे.  

****

भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा राज्याचा भाग कर्नाटकमध्ये गेल्यानं एक नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सीमाभागातला सर्व जाती -धर्माचा मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे या सर्वांचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न आपल्याला अत्यंत महत्वाचे वाटतात. त्यासाठीची आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याची आणि उपलब्ध व्यवस्थेत सर्व मर्यादा लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. या सर्व बाबतीतला तपशील आपण आपल्याला वेळोवेळी कळवत राहूच. ज्या दिवशी हा भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातल्या जनतेचच नव्हे; तर महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण होईल, असंही मंत्री शिंदे आणि मंत्री भुजबळ यांनी या पत्रात नमुद केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात संशोनार्थी एमफिल, पीएचडी संशोधनासाठी राज्यातले सर्वाधिक विद्यार्थी असून, विद्यार्थ्यांची मागणी आणि गौरववृत्तीचं प्रमाण पाहता या शैक्षणिक वर्षात एमफिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभागप्रमुखांची कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एमफिल अभ्यासक्रम प्रवेशासाठी `ऑनलाईन` सामायिक प्रवेश परीक्षा २० नोव्हेंबर रोजी होणार असून, यासाठी एक ते दहा नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. या परीक्षेचा निकाल २१ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या रेल्वे पुलाचं काम संथगतीनं सुरू असून, हे काम जलदगतीनं पूर्ण व्हावं, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड इथून पूर्णामार्गे परभणीला येत असताना चव्हाण यांनी रेल्वेपुलाच्या कामाची पहाणी करून माहिती घेतल्यानंतर या संदर्भातले निर्देश दिले आहेत.

****

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या २८ रूग्णांची आज नोंद झाली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १३ हजार ३८६ वर पोहोचली आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या ३४ रुग्णांना आज घरी सोडण्यात आल्यानं जिल्ह्यात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ७०८ झाली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या ३०४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत नियम पालन करण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी केलं आहे.

****

उस्मानाबाद इथं `ईद  ए मिलाद उन्नबी` निमित्त आज रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यात साठ दात्यांनी सहभाग घेतला. तहसीलदार गणेश माळी, उपविभागिय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते.

****

औरंगाबाज जिल्ह्याच्या वैजापुर तालुक्यातल्या विरगाव पोलिस ठाण्याचा हवालदार  खंडू महादेव मोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना आज लाचलुचपत विभागानं अटक केली. तक्रारदारा कडून मद्याचं अवैध दुकान सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्ता दोन हजार रुपयांची मागणी केली होती.

****

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायम ठेवण्यासाठी जिल्हाभरातली गावं सरसावली आहेत. काल पर्यंत ७१३ गावांनी दारुबंदीच्या समर्थनार्थ ठराव घेऊन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत.  जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी लागू असून बंदी  उठवण्याच्या हालचाली राजकीय नेत्यांकडून होत असल्याच्या पार्श्वभुमिवर हे ठराव घेण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्र सरकारनं मंजूर केलेलं शेतकरी विरोधी विधेयक रद्द व्हावं, शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी आणि कामगारांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी जळगाव शहरात कॉंग्रेस पक्षातर्फे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं.

****

No comments: