Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
· पुलवामा हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षांचा खरा चेहरा
जनतेसमोर उघड - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
· केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी संबंधित कायद्यांच्या
विरोधात काँग्रेस पक्षाचं राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन.
· देशात कोविड १९ संसर्गाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण
९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर.
आणि
· लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असल्याशिवाय राज्य पुढे
जात नाही - खासदार संजय राऊत.
****
गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांचा खरा
चेहरा जनतेसमोर उघड झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात
निमलष्करी दलाच्या ४० जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दु:ख झालं
नसल्याचं ते म्हणाले. गुजरातमधल्या केवडियामधे एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दौडमध्ये
सहभागीं झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. पुलवामामधल्या दुर्घटनेवर
सबंध देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले होते,
असंही ते म्हणाले. जेव्हा शेजारी देशाच्या संसदेमधे हे सत्य स्वीकारण्यात आल्यानंतर
आता विरोधी पक्ष उघडे पडले असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दहशतवादाचा सामुहिक
सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्या विरोधात एकजूट करण्याचं आवाहन देखील
त्यांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना १४५ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या
केवडिया इथं जगातल्या सर्वात उंच पुतळा असलेल्या ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पुष्पांजली
अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
आयोजित करण्यात आलेल्या फेरीची पाहणी केली. यानिमित्तानं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
यावर्षीचं सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेचं पुष्प गुंफणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व
वाहिन्यांवरून हे व्याख्यान प्रसारित करण्यात येणार आहे. सरदार पटेल हे देशाचे पहिले
माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९५५ पासून आकाशवाणीवर
या व्याख्यानाचं प्रक्षेपण करण्यात येतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती आणि
प्रसारणमंत्री पियुष गोयल यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.
****
केंद्र सरकारनं लागू केलेल्या
कृषी संबंधित कायद्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन
करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या
पुण्यतिथीनिमित्त, वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर या आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी
बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, महात्माजींनी आम्हाला न्याय
मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच मार्गानं आम्ही जात असून, सर्व धर्मसमभावाची
प्रार्थना करून हे आंदोलन करत असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी
विरोधी तर नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूनं असल्यानं आम्ही त्याचा विरोध करत आहोत,
हा सत्याग्रह शेतकरी, कामगार, बहुजन आणि गरिबांसाठी असल्याचं थोरात यावेळी म्हणाले.
****
देशात कोविड १९ संसर्गाचे
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ३४ दशांश टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ४८ हजार २६८ नवे रुग्ण आढळले असून
५९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत या संसर्गातून एकूण ७४ लाख
३२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात सध्या केवळ सात पूर्णांक १६ दशांश
टक्के एवढेच बाधीत रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं
आहे. आतापर्यंतची देशातल्या रुग्णांची संख्या ८१ लाख ४८ हजार २६८ झाली असल्याचं आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मुंबईतल्या कोविड १९ च्या
रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तसेच लोकांमधील आजाराच्या संक्रमणाचे दुपटीचे
प्रमाण होण्याचा कालावधी देखील वाढत आहे. आता लोकांमधील संक्रमण दुप्पट होण्याचा कालावधी
हा १५७ दिवसांपर्यंत वाढला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी हे लोकांच्या घरोघर जाऊन
रुग्णांची माहिती गोळा करत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर
तालुक्यातल्या आंबेलोहोळ इथं एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा उपचारा दरम्यान
मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक हजार ७१ जणांचा मृत्यू झाला
आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३८ हजार ४३ झाली असून केवळ ५४८ रुग्णांवर
सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या विषाणू संसर्गाच्या रुग्णवाढीची संख्या कमी होत
असून आतापर्यंत ३६ हजार ४२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात आज १९ जणांचे
अहवाल कोरोना विषाणू बाधित आले. यामुळे जिल्ह्यातली एकूण बाधित रुग्णांची संख्या १३
हजार ४०५ झाली आहे. आज २३ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. सध्या ३०० रुग्णांवर
रुग्णालयात उपचार सुरू आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी आज राजभवनात सरदार वल्लभभाई पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यपाल कोशारी यांनी एकता दिनानिमित्त
कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित पोलीस जवानांसह राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले. मातोश्री
निवासस्थानी पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. मुख्यमंत्री
ठाकरे यांनी सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता
दिवसाच्याही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे
यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान तपस्वी डॉ.रामराव महाराज यांनाही श्रद्धांजली वाहिली.
त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ठाकरे
यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष
असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या
मताचा मी आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते आज पुण्यात एका पत्रकार
परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने
आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण तसंच समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी
घातक भूमिका तयार होताना दिसत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री आणि
विरोधी पक्षनेत्यांमध्येही चांगला संवाद असायला हवा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
अखिल भारतीय काँग्रेस व्यापारी
संघ - आयटक या देशातल्या पहिल्या केंद्रीय कामगार संघटनेला आज १०० वर्ष पूर्ण झाली.
या निमित्त औरंगाबाद शहरातल्या खोकडपूरा इथल्या कार्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
अॅडव्होकेट मनोहर टाकसाळ यांच्या हस्ते आयटकच्या झेंड्याचं ध्वजारोहण करण्यात आले.
****
परभणी तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या
आदेशानुसार नदी काठावरील गावातील आणि अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान
झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्यासाठी गावांची सर्वेक्षण यादी तयार करण्यात आली होती.
या यादीत आसोला, कारेगाव, टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, साडेगाव, मिर्झापूर, वाडीदमई,
तट्टूजवळा, ताडलिंबला, पांढरी पोरजवळा, पाथरा, ब्रह्मपुरी, ब्राह्मणगाव, पारवा, कौडगाव,
जांब या नवीन सतरा गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष
आनंद भरोसे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे
शाखेच्या पोलिसांनी आज खानापूर चित्ता इथं वाळू चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकांविरुध्द
कारवाई करत वाळू आणि ट्रॅक्टर असा १७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसंच वाळू
वाहतूक करणारे आणि रेती मालक अशा सहा जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे
अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जिल्हा कॉंग्रेस समितीच्या वतीनं
आजचा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळण्यात आला. धुळे जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल
यांच्या पुतळ्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले तसंच केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना
यावेळी विरोध करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment