Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून एक लाख २६ हजार ९०९ कोटी रुपये कर परतावा जारी
**
कांद्याबाबत केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी - खासदार शरद पवार यांची टीका
**
राज्यातली मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं १ नोव्हेंबर पर्यंत उघडली नाहीत तर टाळे तोडण्याचा
भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
**
दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाचं दररोज १ हजार जादा बस फेऱ्यांचं नियोजन
आणि
**
बनावट नोटा प्रकरणी राज्यात दोन घटनांमध्ये आठ जणांना अटक
****
केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळाने ३९ लाखापेक्षा अधिक करदात्यांना एक लाख २६ हजार ९०९ कोटी रुपये
कर परतावा जारी केला आहे. यामध्ये ३७ लाख २१ हजार आयकरदात्यांचा ३४ हजार ५३२ कोटी रुपये
आयकर परतावा तर एक लाख २९ हजाराहून अधिक प्रकरणांच्या सुमारे ९२ हजार ३७६ कोटी रुपये
कार्पोरेट कर परताव्याचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एक एप्रिल
ते २७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत कर विवरण पत्रं दाखल केलेल्या करदात्यांसाठी हा कर
परतावा जारी करण्यात आला आहे.
****
कांद्याबाबत
केंद्र शासनाची भूमिका परस्परविरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
खासदार शरद पवार यांनी केली आहे. आज नाशिक इथं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी
चर्चा केल्यानंतर पवार बोलत होते. केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक
वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळलं आहे, दुसरीकडे कांदा आयात आणि निर्यातीबाबत शासन
कार्यवाही करत आहे, या दोन्ही बाबी परस्परविरोधी असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं.
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत नाशिकच्या कांद्याला अधिक मागणी असते. त्यामुळे याबाबत काही
चुकीचे निर्णय घेतले तर त्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसतो. या प्रश्नांची
सोडवणूक करायची असेल तर राज्य शासनासोबतच केंद्राने धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक असल्याचं
पवार यांनी नमूद केलं. मार्केट बंद ठेवण्याबाबत व्यापारी वर्गाने फेरनिर्णय घेण्याची
आवश्यकता असून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय
आरोग्य मिशनच्या अंमलबजावणीत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा
आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र
पाठवून फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. या आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात
दूरध्वनी संवादाच्या तीन ध्वनिफिती सुद्धा या पत्रासोबत जोडल्या असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. सरकारमधील कुणाच्या आशीर्वादाने हा प्रकार होतोय, याचीही सखोल
चौकशी करण्यात यावी, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.
****
राज्यातली
मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं १ नोव्हेंबर पर्यंत उघडली नाही तर नाईलाजाने टाळे तोडावे
लागेल, असा इशारा भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीने दिला आहे. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष
आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्चात एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. मंदिरं उघडण्याच्या मागणीकरता
दोन मोठी आंदोलनं करुन सुद्धा राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याचं, या निवेदनात
म्हटलं आहे. या शिष्टमंडळात ग्लोबल महानुभाव संघाचे अध्यक्ष सुदर्शन महाराज कपाटे यांच्यासह
अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधाबाबत नियम पालन करण्याचं आवाहन लातूरचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे
यांनी केलं आहे.
****
स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात
आलं. शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना संसर्गातून
मुक्त होत, सुमारे आठवड्याभराने ते घरी परतले होते. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीनंतर
त्यांनी राज्यात नुकसान पाहणी दौरा केला. दरम्यान, शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याचं
त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या हिमायतबाग इथल्या ५४ वर्षीय कोविडग्रस्त पुरुषाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ६४ झाली आहे. जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची संख्या ३७ हजार ६६४ झाली असून नऊशे ७२ जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात आज नव्याने ९४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आता बाधितांची
एकूण संख्या १८ हजार ९५६ झाली आहे. दरम्यान, बरे झालेल्या ११८ रुग्णांना आज रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १७ हजार ६१६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या
एकूण ७०७ रुग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.
****
दिवाळीच्या
पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीने ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत
दररोज सुमारे १ हजार विशेष जादा बस फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा बस गाड्या राज्यभरातल्या
प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत. या बसगाड्यांचं आरक्षण टप्प्याटप्प्याने उपलब्ध
करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब
यांनी दिली. आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी,
असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी
आवश्यक त्या सर्व सूचना तसंच नियमांचं काटेकोर पालन करत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे
निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत.
****
वसंतदादा
साखर संस्थेचे उपकेंद्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील पखोरा इथं संपादित
केलेल्या जागेवरच उभारण्यात यावं अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऊस
उत्पादक संघर्ष कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवदेन विभागीय
आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असल्याची माहिती कृती समितीचे भाऊसाहेब शेळके यांनी
आकाशवाणीला दिली. १९९० ला वसंतदादा साखर संस्थेच्या उपकेंद्राला तत्कालीन अध्यक्ष शरद
पवार यांनी मंजूरी दिली होती. त्यानुसार पखोरा इथल्या कृषी विभागाच्या ताब्यातील तालुका
बीज गणन केंद्राची दीडशे एकर जमीन महसूल विभागाकडे हस्तांतरित केली होती. मात्र आता
हे केंद्र जालना जिल्ह्यातल्या पाथरवाला या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न होत आहे, याला
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचा, शेळके यांनी
सांगितलं.
****
बुलडाणा
जिल्ह्यात मोताळा तालुक्यातल्या धामणगाव बढे इथं भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत नकली
नोटांचा भरणा करणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कुऱ्हा इथल्या ज्ञानेश्वर
मगनसिंग पेले या व्यक्तीने बँकेमध्ये भरणा करण्यासाठी एकूण दोन लाख ६५ हजार रुपये आणले
होते. या रकमेमधे दोनशे रुपयांच्या १८१ नोटा बनावट असल्याचं बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास
आलं, त्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर पेले, विठ्ठल
सबरु मंझरटे, राहुल गोटीराम साबळे यासह आणखी एकाला अटक केली आहे.
****
धुळे
पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट नोटा प्रकरणी ४ जणांना अटक केली.
शिरपूर तालुक्यातील कळमरे गावात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन संगणक, कलर प्रिंटर,
दोन मोबाईल फोन, आदी साहित्य असा एकूण ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची
माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी आज दिली.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्राचार्य डॉ.शाम सिरसाठ यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment