Saturday, 24 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी जागतिक तेल आणि गॅस कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.या वर्षी एकूण ४५ प्रमुख तेल आणि गॅस कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

****

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ४७० कोविड रुग्णांची नोंद झाली आहे.यामुळं येथील एकूण रुग्णसंख्या २ लाख ४८ हजारावर पोहचली आहे. आतापर्यंत २ लाख १८ हजारावर रुग्ण संसर्गमुक्त झाले असून ९ हजार ९६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार २४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार २२५ झाली  आहे. यापैकी ३४ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात १ हजार ४८ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या १ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राज्य आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे विनायक पाटील  यांच्या निधनानं आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ  नेतृत्व गमावले असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायक पाटील यांचं काल नाशिक इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते.

****

ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतली जवळपास साडेआठ हजार रिक्त पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी काल या संदर्भातला आदेश जारी केला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर रविवारी लावण्यात आलेली जनता संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानं परिपत्रक जारी करुन काल ही माहिती दिली.

****

सांगली जिल्ह्यातल्या नांद्रे- वसगडे बंधाऱ्याचे बरगे न काढल्यामुळे रुळाखालील भराव वाहून गेला. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सलग ७ दिवस बंद ठेवावी लागल्यानं रेल्वेचं दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं नमूद करत मध्य रेल्वे प्रशासनानं पुणे पाटबंधारे विभागाला नोटीस बजावली आहे.

****

No comments: