Thursday, 29 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणू संसर्गाची लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती देण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एकही भारतीय यापासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी एका प्रसिद्धी माध्यमाला आज दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती, असंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अद्याप कायम असल्यानं अशा परिस्थितीत सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी या मुलाखतीत सांगितलं.   

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ७३ लाख १५ हजार रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० पूर्णांक ९९ शतांश टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे या संसर्गाचे ४९ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ऐंशी लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे ५१७ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २० हजार ५२७ झाली असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

देशात काल कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी १० लाख ७५ हजारांहून अधिक रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं दिली आहे. आतापर्यंत १० कोटी ६५ लाखांहून अधिक नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही या परिषदेनं म्हटलं आहे.

****

दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचं भान ठेवत प्रवाशांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात जिल्हा परिषदांच्या सुमारे ३०० शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून या अंतर्गत शाळांमध्ये शैक्षणिक आणि प्रशासनिक सुधारणा केल्या जाणार आहेत. आदर्श शाळा म्हणून या शाळांना नावारुपास आणलं जाणार आहे. राज्याच्या शिक्षण ‍विभागानं या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी येत्या सहा तारखेपर्यंत विभागाला पाठवावी असे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची आज राजभवनात भेट घेतली. वाढीव विज देयकं, तसंच दूध दरवाढ, मंदिर प्रवेश, अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे प्रश्र्न तातडीनं सोडवले जावेत, यासाठी ही भेट घेतल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

****

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल याचं आज अहमदाबाद इथं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबाद इथल्या स्टर्लींग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

सांगली जिल्ह्यात किसान सन्मान निधी योजनेत चौदा हजार दोनशे ६७ लाभार्थी बोगस असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांनी दहा कोटी ९० लाख रुपये लुबाडल्याचं स्पष्ट झालं आहे. ही रक्कम शासनाला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस जिल्हा प्रशासनानं संबंधीतांना बजावली आहे. 

****

रेल्वे मंडळाकडून किसान रेल्वेतून माल वाहतुक दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. दर रविवार सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी किसान रेल्वे मिरजेतून कुर्डुवाडीमार्गे सुटणार आहे. याआधी पूर्ण भाडे आकारून सेवा देणारी ही गाडी आता यापुढे ५० टक्के अनुदानाच्या तत्वावर धावणार आहे. त्यामुळे सांगली, मिरजसह सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला, कुर्डूवाडी इथल्या शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: