Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**स्थानिक संस्थांमध्ये
नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
**राज्य परिवहन
महामंडळाची दिवाळीतली हंगामी दरवाढ यंदा रद्द
**परभणीमध्ये कोरोना
विषाणू संसर्गाचे नवे ४१ रुग्ण
आणि
**औरंगाबाद जिल्ह्यातल्या
रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
****
मुदत संपलेल्या आणि कोरोना
विषाणू प्रादुर्भावामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त
प्रशासकांचा कालावधी वाढवण्यात येणार असून, याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवभोजन थाळीचा दर पाच
रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या महिन्यापासून पुढील सहा
महिन्यांसाठी हा दर लागू असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील
विद्युत शाखेचं बळकटीकरण करायला, औरंगाबाद ऑरिक सिटी इथं वैद्यकीय उपकरण पार्क
प्रकल्पाकरता विशेष प्रोत्साहन द्यायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्यातल्या सर्व माजी सैनिकांना घरपट्टी आणि
मालमत्ता कर माफ करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबवण्याचा
निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्य परिवहन
महामंडळातर्फे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना
प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या
बसनं प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक
बांधीलकीचं भान ठेवत प्रवाशांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी
म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्गाचे नवे ४१ रुग्ण आज आढळले आहेत. जिल्यातल्या एकूण रुग्णांची संख्या
आता सहा हजार चारशे श्याहऐंशी झाली आहे. यातले सहा हजार १६ रुग्ण या संसर्गातून
बरे झाले आहेत. आतापर्यंत या विषाणू संसर्गांनं परभणी जिल्ह्यात २६३ रुग्णांचा
मृत्यू झाला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक
अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज
कोरोना विषाणू संसर्गामुळे पाच रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता २७९ झाली आहे.
जिल्ह्यात आज दिवसभरात या संसर्गाचे नवे ६० रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या दहा
हजार ६१६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १८१ रुग्णांना आज सुटी
देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले नऊ
हजार ४१३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत तर ९२५ रुग्णांवर सध्या उपचार
सुरू आहेत.
****
धुळे जिल्ह्यात आज २२ नवे
कोरोना विषाणूबाधीत रुग्ण आढऴले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता १३
हजार ३५८ झाली आहे.तर १२ हजार ६७४ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहे.जिल्ह्यात
आतापर्यंत ३७४ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला असल्याचं प्रशासनानं
कऴवलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू
संसर्गामुळे टाऴेबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत या संदर्भातले दोन लाख एकोणनव्वद
हजार गुन्हे तसंच अवैध वाहतुकीचे एक हजार तीनशे ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून
३५ कोटी १८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल
देशमुख यांनी दिली आहे. या काऴात पोलिस दल, आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांवर
हल्ल्याच्या तीनशे ८१ घटना घडल्या असून यात ९०४ जणांना ताब्यात घेण्यात आलं
असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद - वैजापूर,
औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातल्या सर्व रस्त्यांच्या
दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश उद्योगमंत्री
तसंच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. ते औरंगाबाद इथं
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग
योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग,
शहरातले प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व
संबंधित यंत्रणांना सोपवलेली कामं दिलेल्या वेळत पूर्ण करण्याचे निर्देशही देसाई
यांनी यावेळी दिले.
****
केंद्र सरकारनं कांद्याची
कृत्रिम टंचाई होऊ नये यासाठी कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध आणले असल्याची
माहिती देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या
निर्णयाचं समर्थन केलं आहे. ते आज सांगली
शहरातल्या विकास कामांचा प्रारंभ केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांच्यात आज झालेल्या भेटीमध्ये राज्यपाल त्यांना काय बोलले हे माहीत नाही, पण हे
खरं आहे, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच राज्य चालवत असल्याची प्रतिक्रियाही
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातले कवी
देविदास फुलारी यांना नारायण सुर्वे कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहिर
झाला आहे. सन्मानचिन्ह, मानचिन्ह, ग्रंथ आणि पंचवीसशे रूपये रोख रक्कम असं या
पुरस्काराचं स्वरूप आहे. नेरळ इथं येत्या आठ तारखेला या पुरस्काराचं वितरण होणार
असल्याची माहिती नारायण सुर्वे आकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे यांनी दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या
अर्धापूर तालुक्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या पंचवीसाव्या गळीत
हंगामाचा शुभारंभ सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते आज झाला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक
चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
****
लातूर इथल्या विलासराव
देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार
सतीश चव्हाण यांच्या आमदार निधीतून दहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची
यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली असून आज ती सुपूर्द करण्यात आली. कोरोना विषाणूबाधीत रुग्णांसाठीची ही
यंत्रसामुग्री आमदार चव्हाण यांनी अधिष्ठाता डॉ.मोहन डोईबळे यांच्याकडे सुपूर्द
केली. राज्य शासनानं विशेष बाब म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदी
करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी ५० लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला
होता. त्या अंतर्गत ही खरेदी करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जांब
महसुल मंडळाचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य
बाळासाहेब रेंगे यांच्यासह ग्रामस्थांनी आज परभणी इथं धरणे आंदोलन केलं. यासंबधीचं
निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना सादर करण्यात आलं. परभणी तालुक्यातील
परभणी, सिंगणापूर, पिंगळी या तीन मंडळांचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात आला
असताना जांब मंडळाला हेतुपुरस्सर डावलण्यात येत असल्याचा आरोप रेंगे यांनी केला
आहे. परतीच्या पावसात जांबसह परिसरातल्या १७
गावांतल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पिकांचे पंचनामे करून
शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळवून द्यावी असंही त्यांनी म्हटलं
आहे.
***////***
No comments:
Post a Comment