Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांसाठी तहकूब
**
मराठा आरक्षण प्रकरणापासून राज्य सरकार पळ काढत असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप
**
ऊसतोड कामगारांना सरासरी १४ टक्के दरवाढ देण्याचा साखर संघाचा निर्णय
आणि
**
टाळेबंदी काळातली वीज देयके माफ करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन
****
मराठा
आरक्षण स्थगितीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
आज या प्रकरणी सुनावणी सुरू झाली, त्यावेळी राज्य सरकारचे वकील हजर नव्हते. याचिकाकर्त्यांच्या
वकिलांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची विनंती केल्याचं यावेळी
न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब करत,
या काळात राज्य सरकारला हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची विनंती
सरन्यायाधीशांकडे करण्याची सूचना केली.
****
मराठा
आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसून, या प्रकरणापासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात
दाखल याचिकेवरची सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर पाटील बोलत
होते. शैक्षणिक तसंच नोकऱ्यांच्या क्षेत्रात गोंधळ तसंच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण
झाल्यानं, राज्य सरकारचा निषेध करत असल्याचं पाटील म्हणाले. सरकारी वकिलांनी न्यायालयात
वेळेवर हजर न राहणं, दोन वकिलांमध्ये दुमत असणं, पुरेशी तयारी न करणं, याबाबींमुळे
या प्रकरणाबाबत चिंता वाटत असल्याचं पाटील म्हणाले. अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा
घेणं, ही फक्त खानापूर्ती केली असल्याची टीकाही पाटील यांनी केली.
****
'सर्वोच्च
न्यायालयात सरकारचे वकील मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उपस्थित राहत नाहीत. ही अत्यंत
गंभीर बाब असल्याचं, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरून
त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही
पुराव्यानिशी भक्कम पणे मांडणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.
****
सकल
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने
करण्यात आली. मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीवेळी सरकारी वकील अनुपस्थित राहिले. त्यामुळे
मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार हे फारसे गंभीर नाही, असा आरोप करत क्रांतीमोर्चाच्या
कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
****
ऊसतोड
कामगारांना सरासरी १४ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय साखर संघानं घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या
प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली
पुण्यात वसंत दादा साखर संस्थेत आज बैठक झाली, या बैठकीत कामगारांना १४ टक्के वाढीचा
निर्णय झाला असून, तीन वर्षांसाठी हा करार झाल्याचं, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश
दांडेगावकर यांनी सांगितलं. ऊसतोड कामगारांच्या अनेक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला
उपस्थित होते.
****
कोविड
प्रतिबंधाबाबत नियम पालन करण्याचं आवाहन खासदार फौजिया खान यांनी केलं आहे.
****
रिपब्लिकन
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना
कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत,
मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा
निर्णय आठवले यांनी घेतला आहे.
खासदार
सुनील तटकरे यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तटकरे यांनी काल सोमवारी कोविड
संसर्ग चाचणी केली होती. आज त्यांचा अहवाल बाधित आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत
ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आपल्या
संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोविड संसर्ग चाचणी करुन घेण्याचं आवाहन या दोन्हीही
नेत्यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात वाळूज इथल्या एका ७० वर्षीय कोविडग्रस्त महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू
झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोविड संसर्गामुळे मृतांची संख्या आता एक हजार ५९ झाली आहे.
जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार ५६५ झाली असून एक हजार ३३ रुग्णांवर सध्या
उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातल्या रुग्णवाढीचा आणि मृत्यूचा दर गेल्या काही दिवसात कमी
झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
****
दरमहा
३०० युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची गेल्या सात महिन्यांची
संपूर्ण वीज देयके माफ करण्याची मागणी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीनं करण्यात आली
आहे. यासंदर्भातलं निवेदन महावितरणचे विभागीय संचालक डॉ. नरेश गिते यांना देण्यासाठी
संघटनेचे कार्यकर्ते आज गेले असता, गीते कार्यालयात नसल्यानं त्यांच्या कार्यालयाच्या
दरवाजाला निवेदन देऊन मूक निदर्शने करण्यात आली. वीज देयकांच्या रकमेची भरपाई राज्य
सरकारनं महावितरण आणि संबंधित कंपन्यांना अनुदान स्वरुपात करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे
करण्यात आली आहे.
****
घरगुती
वीज दरवाढी विरोधात सांगली इथं जनता दलाच्या वतीनं आज वीज महावितरण कंपनीच्या कार्यालया
समोर आंदोलन करण्यात आलं. टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज देयकं कमी करण्याची मागणी
यावेळी करण्यात आली. मात्र परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी जनता दलाचे
माजी आमदार शरद पाटील यांच्यासह २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
टाळेबंदी
काळातील वीज देयकं माफ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा जिल्हयात
ठिकठिकाणी महावितरण कार्यालयाला कुलूप लावून टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील
खामगाव, शेगाव, संग्रामपूर, बुलडाणा, या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.
शेगाव इथं संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या ऊमरी इथले साहित्यिक, कथा लेखक प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचं अल्पशा
आजारानं आज निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. मनूरकर यांनी साठ वर्ष शैक्षणिक, सामाजिक,
सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. मनूरकर यांनी कथा, कविता, वैचारिक,
शैक्षणिक असं विपुल लेखन केलं आहे
****
औरंगाबाद
शहरातल्या दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासक आस्तिक कुमार
पांडेय यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यांनी आज दिव्यांगासाठीच्या विविध योजनांची
आढावा बैठक घेतली. या बैठकीत दिव्यांग, बेरोजगारांसाठी भत्ता योजना, सेवानिवृत्ती योजना,
शिक्षणासाठी अर्थ साहाय्य, घरकुलासाठी अर्थसहाय्य, दुकान उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य,
उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, आदि योजना बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
****
परभणी
जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या वालूर महसूल मंडळासह अन्य मंडळातल्या शेतकऱ्यांनाही
अतिवृष्टीच्या नुकसानापोटी सरसकट मदत मिळावी, या मागणीसाठी आज संतप्त शेतकऱ्यांनी सेलू
इथं निदर्शनं केली. तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्यानं खरीप पिकांचं मोठं
नुकसान झालं आहे, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुऴे शासनाने सरसकट मदत करावी अशा
मागणीचं निवेदन आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना सादर केलं.
****
नाशिक
जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव ठप्प होते. केंद्र शासनाने कांदा साठवणूक
करण्यावर मर्यादा घातली असून २५ मेट्रिक टना पेक्षा अधिक कांद्याची साठवण करता येणार
नाही. या निर्णयाने व्यापारी वर्ग नाराज असून, साठवलेला कांदा विकल्याशिवाय नवीन कांदा
लिलाव घेणार नाही, अशी भूमिका व्यापारी वर्गानं घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment